महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना


महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना

वाशिम जिल्ह्यातील सर्व नागरिकांना मिळणार लाभ 
जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांची माहिती

 --- जिल्ह्यातील १३ रुग्णालयात घेता येतील उपचार

--- ९९६ उपचार पद्धतींचा लाभ मिळणार     वाशिम, दि. ०२ (जिमाका) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व नागरिकांना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ देण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला असून २३ मे २०२० रोजी त्यासंदर्भात शासन निर्णय देखील जाहीर करण्यात आला आहे. यामुळे आता या योजनेच्या अंगीकृत असलेल्या सर्व रुग्णालयांमध्ये जिल्ह्यातील सर्व नागरिकांना मोफत उपचार घेता येणार आहेत. तरी जिल्ह्यातील नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी केले आहे.

     महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत ९९६ उपचार व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत १२०९ उपचार पुरविले जातात. या अंतर्गत राज्यातील सुमारे ८५ टक्के लोकसंख्येचा समावेश होतो. तथापि, राज्यातील कोरोनाची सद्यस्थिती पाहता महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत समाविष्ट नसलेल्या राज्यातील नागरिकांनासुद्धा महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत अनुज्ञेय ९९६ उपचार पद्धतींचा लाभ मान्यता प्राप्त दराने सर्व अंगीकृत रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ३१ जुलै २०२० पर्यंत ही योजना अंमलात राहील. त्यानंतर त्याबाबत आढावा घेऊन मुदतवाढीबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे.

     राज्यात करोनाच्या रुग्णांची वेगाने वाढणारी संख्या लक्षात घेऊन आगामी काळात खाटा कमी पडू नयेत व करोना नसलेल्या रुग्णांनाही व्यवस्थित उपचार मिळावे, यासाठी सर्वच नागरिकांचा समावेश या योजनेत करण्यात आला आहे. तरी वाशिम जिल्ह्यातील नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा. योजनेच्या अधिक माहितीसाठी अंगीकृत रुग्णालयातील आरोग्य मित्र अथवा १५५३८८ किंवा १८०० २३३ २२०० या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. मोडक यांनी केले आहे.

शासकीय रुग्णालयांकरिता राखीव १२० उपचार आता मिळणार खाजगी रुग्णालयात

शासकीय रुग्णालयांकरीता राखीव असलेल्या १३४ उपचारापैकी सांधा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया व श्रवणयंत्राचा उपचार वगळता १२० उपचार अंगीकृत खाजगी रुग्णालयांमध्ये ३१ जुलै २०२० पर्यंत मान्यता प्राप्त दराने करण्यात येतील. महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत उपलब्ध नसलेल्या काही किरकोळ व मोठे उपचार आणि काही तपासण्या अंगीकृत रुग्णालयांमध्ये सर्व लाभार्थ्यांना सीजीएचएस, एनएबीएच/एनएबीएल च्या दरानुसार उपलब्ध करून देण्यात येत आहेत. सदर खर्चाची प्रतिपूर्ती संबंधित रुग्णालयास राज्य शासनाद्वारे राज्य आरोग्य हमी सोसायटी, वरळी, मुंबई यांच्यामार्फत करण्यात येईल.

योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

     या योजनेचा लाभ घेण्यासाठी रहिवासी पुरावा म्हूणन वैध पिवळी, केशरी, पांढरी शिधापत्रिका, तहसीलदार यांचा दाखला व अधिवास प्रमाणपत्र यांपैकी कोणतेही एक कागदपत्र पुरावा म्हणून सादर करावा लागेल. त्याबरोबरच आधारकार्ड अथवा शासनमान्य फोटो ओळखपत्र देणे आवश्यक राहील. कोरोनाच्या साथीचे गांर्भीय आणि उपचाराची तातडी पाहता आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांबाबत शिथिलता देण्याचे अधिकार राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

योजनेसाठी अंगीकृत असलेली जिल्ह्यातील रुग्णालये

शासकीय रुग्णालये (३) : जिल्हा सामान्य रुग्णालय, वाशिम, उपजिल्हा रुग्णालय, कारंजा लाड, ग्रामीण रुग्णालय, मंगरूळपीर.

खाजगी रुग्णालये (१०) : बिबेकर हॉस्पिटल, देवळे हॉस्पिटल, कानडे बाल रुग्णालय, माँ गंगा बाहेती रुग्णालय, डॉ. वोरा हॉस्पिटल, लाइफलाईन हॉस्पिटल, वाशिम क्रिटिकल केअर, लोट्स हॉस्पिटल, बाजड हॉस्पिटल व प्रसूतिगृह, गोल्डन सेकंड इनिंग खराट बाल रुग्णालय (सर्व वाशिम).

*****
Share on Google Plus

About Janta Parishad

    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

एक टिप्पणी भेजें

साप्ताहिक जनता परिषद अंक - ४३ वर्ष - ४४ दिनांक - २४ नोव्हेंबर २०२२ Janta Parishad E-43 Y-44 24-11-2022

  साप्ताहिक जनता परिषद अंक - ४३     वर्ष - ४४    दिनांक - २४ नोव्हेंबर २०२२    Weekly Janta Parishad    Edition : 43      Year : 44     Date...