Header Ads

शेतकरी बांधवांनो, पेरणीची घाई करू नका - कृषि विभागाचे आवाहन

शेतकरी बांधवांनो, पेरणीची घाई करू नका - कृषि विभागाचे आवाहन

जिल्ह्यात सध्या पडत असलेला पाऊस हा अवकाळी

पेरणीसाठी ७५ ते १०० मिमी पाऊस आवश्यक



     वाशिम, दि. ०८ (जिमाका) : जिल्ह्यात सध्या पडत असलेला पाऊस हा अवकाळी आहे. मृग नक्षत्राच्या पावसाची अद्याप सुरुवात झालेली नाही. पुरेसा पाऊस पडण्यापूर्वी पेरणी केल्यास बियाणे अंकुरण्याची शक्यता कमी होते. परिणामी, शेतकऱ्यांचे नुकसान होते. पेरणीसाठी किमान ७५ ते १०० मिमी पाऊस होणे आवश्यक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार यांनी केले आहे.
     सध्या वाशिम तालुक्यात ३१.११ मिमी, रिसोड तालुक्यात २४.८१ मिमी, मालेगाव तालुक्यात २५.६० मिमी, मंगरूळपीर तालुक्यात २७.८६ मिमी, मानोरा तालुक्यात ३६.५३ मिमी व कारंजा तालुक्यात ३७.१० मिमी पावसाची नोंद झाली आहे. महसूल मंडळनिहाय विचार केल्यास अनसिंग मंडळात ४८.५० मिमी, वाकद मंडळात ४४.७५ मिमी, मुंगळा मंडळात ५०.२५ मिमी, मंगरूळपीर मंडळात ४४.५२ मिमी, मानोरा मंडळात ५२.२५ मिमी व उंबर्डा बाजार मंडळात ६०.०० मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील एकाही महसूल मंडळात ७५ मिमी पाऊस झालेला नाही.  तरीही शेतकऱ्यांनी कापूस व इतर पिकांच्या पेरणीस सुरुवात केली आहे.
     बियाणे उगविण्यासाठी जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असणे आवश्यक आहे. त्यामुळे ७५ ते १०० मिमी पाऊस पडून जमिनीतील ओलावा संतृप्त झाल्याशिवाय पेरणी करण्यात येवू नये, असा कृषि विद्यापीठाचा संदेश आहे. ७५ मिमी पेक्षा कमी पावसावर शेतकऱ्यांनी पेरणी केल्यास जमिनीमध्ये पुरेसा ओलावा उपलब्ध नसल्याने जमिनीत असणाऱ्या उष्णतेमुळे पेरलेल्या बियाण्याचे कमी प्रमाणात अंकुरण होवून बियाणे जळण्याची दाट शक्यता असते. तसेच पेरणीनंतर पावसाचा खंड पडला तर उपलब्ध असलेल्या ओलाव्यावर बियाण्याची उगवण समाधानकारक होवू शकत नाही. त्यामुळे पेरणी उलटण्याची किंवा दुबार पेरणी करण्याची पाळी शेतकऱ्यांवर येते. यामुळे बियाणे व पेरणीवरील खर्चात दुप्पट वाढ होते. पिकाचा कालावधी सुद्धा कमी झाल्यामुळे त्याचा एकत्रितरित्या विपरीत परिणाम उत्पादनावर होवून उत्पादनात घट होते.
     नैऋत्य मान्सूनचा पाऊस गोव्याच्या उंबरठ्यावर येवून मुंबईत दाखल झाल्यानंतरच विदर्भात पोहोचतो, असे मान्सूनच्या पावसाचे मार्गक्रमण असते. पेरलेल्या पिकाची उगवण समाधानकारक होण्यासाठी काळी कसदार व भारी जमिनीकरिता १०० मिमी व हलक्या जमिनीकरिता ७५ मिमी पावसाची नोंद झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. तसेच जमिनीमधील व हवेतील तापमान तसेच पावसाची आर्द्रता यांचे समीकरण जुळल्याशिवाय बियाण्याची उगवण समाधानकारक होत नाही, असे श्री. तोटावार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

Farmers, do not rush to sow - the appeal of the Department of Agriculture

The current rainfall in the district is untimely

75 to 100 mm of rainfall is required for sowing

No comments

Powered by Blogger.