Header Ads

जि.प. वाशिम : स्वच्छाग्रहींना कोविड-१९ बाबत ऑनलाईन प्रशिक्षण

जि.प. वाशिम : स्वच्छाग्रहींना कोविड-१९ बाबत ऑनलाईन प्रशिक्षण

जिल्ह्यातील ४६५ स्वच्छाग्रहींनी घेतला सहभाग 

जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाचा उपक्रम 



वाशिम (का.प्र.) दि. ०३ - कोरोना विषाणू संसर्गजन्य परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागातर्फे जिल्ह्यातील ग्रामपातळीवर काम करीत असलेल्या स्वच्छाग्रही व इतर स्वयंसेककांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणात एकूण सुमारे ४६५ स्वच्छाग्रहींनी आपला सहभाग नोंदवला.
राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग  व युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यात प्रशिक्षण देण्याचा उपक्रम सुरू आहे. त्याच अनुषंगाने वाशिम जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना व उप मुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम इस्कापे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत कार्यरत असलेले स्वच्छाग्रही तसेच इतर ग्रामपातळीवरील कर्मचार्‍यांसाठी ऑनलाईन प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. 
जिल्ह्यात  कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी रुषिकेश मोडक, जि.प. अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, तसेच आरोग्य यंत्रणेसह ईतर विभाग प्रमुख व जिल्ह्यातील विविध पदाधिकार्‍यांच्या समन्वयातून  विविध उपक्रम ग्रामपंचायत स्तरावर राबविले जात आहेत.
कोरोना विरुद्धच्या या लढाईत ग्रामपंचायत स्तरावर पाणी व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम इस्कापे, पंचायत समितीचे सर्व गटविकास अधिकारी, जिल्हा व तालुका कक्षातील सल्लागार, तज्ञ, गट समन्वयक, समुह समन्व्यक व कर्मचारी यांच्या मार्गदर्शनाखाली  स्वच्छताग्रही सक्रिय झालेले असून त्यांचेमार्फत ग्रामसेवक व इतर कर्मचार्‍यांच्या मदतीने गावस्तरावर कोरोनाबाबत  जाणीव जागृती केली जात आहे. ग्रामपातळीवर काम करीत असलेल्या स्वच्छाग्रही, आशा वर्कर, अंगणवाडी कार्यकर्ती, ग्रामपंचायत कर्मचारी, जलसुरक्षक व इतर  स्वयंसेवकांना कोविड-१९   याविषयी अधिकची माहिती मिळावी व या स्वयंसेवकांचा ग्रामपातळीवर सहभाग आणखी वाढावा या उद्देशाने त्यांच्यासाठी दिनांक २ मे   रोजी ऑनलाइन प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रशिक्षणा दरम्यान कोविड संकल्पना, श्वसनसंस्थेची स्वच्छता, शारीरिक अंतर राखणे, अधिक जोखमीचे गट यांनी घ्यावयाची काळजी, मास्क वापर, प्रकार  व मास्क वापरतांना घ्यावयाची काळजी, गाव पातळीवर काम करणार्‍या स्वयंसेवक व्यक्तींनी घ्यावयाची काळजी, कुटुंब व सार्वजनिक स्वच्छता,  पाणी साठवण व स्रोत स्वच्छता, शौचालय वापर, मैला व्यवस्थापन, कोविड संभाव्य बाधित व्यक्तीसंबंधी घ्यावयाची काळजी, विलगीकरण म्हणजे काय, कोविड-१९ या आजाराविषयी असलेले समज-गैरसमज, संसर्ग झालेली व्यक्ती किंवा विलगीकरण केलेल्या व्यक्ती यांची सामाजिक मानहानी व भेदभाव, कोवीड-१९ समज-गैरसमज व संवाद उपक्रम तसेच इतर यंत्रणेचा समन्वय व स्वच्छागृही प्रशिक्षण कार्यक्रम अंमलबजावणी या विषयावर उपस्थित सर्व प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
प्रशिक्षणा दरम्यान अनेक ग्रामपंचायती अंतर्गत अँड्रॉइड मोबाइल नसलेल्या व्यक्तींसाठी ग्रामपंचायतीने ग्रामपंचायत कार्यालयात शारीरिक अंतर ठेवून  प्रशिक्षणाची व्यवस्था केली होती. यामुळे ज्या स्वयंसेवकांकडे मोबाईलची सुविधा उपलब्ध नव्हती अशा स्वयंसेवकांनाही या प्रशिक्षणाचा लाभ घेता आला. प्रशिक्षणा दरम्यान उपस्थित प्रशिक्षणार्थी यांना पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी, युनिसेफचे जयंत देशपांडे, आरोग्यग अधिकारी डॉ. सूर्यवंशी, जिल्हा कक्षातील  क्षमता बांधणी तज्ञ प्रफुल्ल काळे, मनुष्यबळ विकास तज्ञ शंकर आंबेकर, आय.ई.सी. तज्ञ पुष्पलता अफुणे, पाणी गुणवत्ता सल्लागार अभिजित दुधाटे,  माहिती, शिक्षण व संवाद सल्लागार राम श्रृंगारे यांनी मार्गदर्शन केले. प्रशिक्षणास जिल्ह्यातील स्वच्छाग्रही, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, जलसुरक्षक, रोजगार सेवक, ऑपरेटर, ग्रामसेवक, सरपंच व ग्रामपंचायत सदस्य आदींनी सहभाग नोंदविला.

No comments

Powered by Blogger.