Header Ads

एप्रिल महिन्याचे धान्य पॉस मशीनवर उपलब्ध


एप्रिल महिन्याचे धान्य पॉस मशीनवर उपलब्ध


·      मे, जून महिन्याचे धान्य त्या-त्या महिन्यात होणार वितरीत
·     सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून धान्य उचलण्याचे आवाहन

वाशिम (जनता परिषद)  दि.०१ : सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय, प्राधान्य कुटुंब योजना आणि एपीएल (शेतकरी) योजनांच्या लाभार्थ्यांना एकत्रित तीन महिन्याचे धान्य उपलब्ध करण्यात येणार होते. मात्र, आता यामध्ये बदल करण्यात आला असून एप्रिल, मे व जून महिन्याचे धान्य त्या-त्या महिन्यात वितरीत केले जाणार आहे. त्यानुसार एप्रिल महिन्याचे धान्य पॉस मशीनवर उपलब्ध करून देण्यात आल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी राजेंद्र जाधव यांनी कळविले आहे.
अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना ३५ किलो धान्य यामध्ये १५ किलो गहू व २० किलो तांदूळ मिळणार आहेत. तसेच प्रधान्य कुटुंब लाभार्थ्यांना प्रती व्यक्ती ३ किलो गहू आणि २ किलो तांदूळ मिळणार आहेत. तसेच एपीएल (शेतकरी) लाभार्थ्यांना प्रती व्यक्ती ४ किलो गहू आणि १ किलो तांदूळ वितरीत केले जाणार आहेत. सर्व लाभार्थ्यांना प्रतिकिलो २ रुपये दराने गहू आणि प्रतिकिलो ३ रुपये दराने तांदूळ मिळणार आहेत. अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना २० रुपये प्रतिकिलो दराने १ किलो साखर मिळणार आहे.
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पात्र लाभार्थ्यांना (अंत्योदय व प्राधान्य कुटुंब) प्रतिव्यक्ती दरमहिना अतिरिक्त ५ किलो तांदूळ शासनाने ३१ मार्च २०२० रोजीच्या शासन निर्णयानुसार मंजूर केले आहेत. हे अतिरिक्त धान्य लाभार्थ्यांना मोफत मिळणार आहे. त्याचे सुध्दा दरमहा वाटप केले जाणार आहे.
जिल्ह्यातील सर्व शिधापत्रिकाधारकांनी एप्रिल महिन्याचे नियमित धान्य आपल्या स्वस्त धान्य दुकानातून गर्दी न करता सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून शासकीय दराने खरेदी करावे. त्यानंतर पुढील आठवड्यापासून अंत्योदय व प्राधान्य कार्डधारकांना चालू महिन्याचे प्रतिव्यक्ती ५ किलो मोफत तांदूळ वाटप करण्यात येईल, असे जिल्हा पुरवठा अधिकारी श्री. जाधव यांनी कळविले आहे.

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.