Header Ads

कायद्यासाठी कठोर असलेले पोलिस प्रशासनाचे मानवतेचे रुप

कायद्यासाठी कठोर असलेले पोलिस प्रशासनाचे मानवतेचे रुप

६०-७० कोरकू मजूरांना केले अन्न व भाजीपाल्याचे वाटप  

सहाय्यक पोलिस अधिक्षक डॉ.बन्सोड व सहकार्यांनी दिली मदत व केले मार्गदर्शन 
वाशिम (जनता परिषद) दि.१५ - कोरोनाच्या या वैश्‍विक महामारीचे काळात परदेशातून पोटाची खळगी भरण्यासाठी मजूरी कामासाठी आलेल्या कोरकू समाजाचे ६०-७० मजूर अन्नावाचून आहे ही माहिती मिळताच कठोर समजले जाणारे पोलिस विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी यांचेपर्यंत पोहोचून त्यांना अन्नधान्य व भाजीपाला चे वाटप केले. जिवघेण्या रोगाचे या संसर्गजन्य वातावरणात जिव मुठीत घेऊन आजमितीला कठोरपणे काम करणारे पोलिस प्रशासनातील अधिकारी व कर्मचार्‍यांचे मानवतेचे रुप त्यांचेप्रती श्रद्धा उत्पन्न करणारे ठरते. 
पोलिस स्टेशन शिरपूर हद्दीमध्ये ग्राम नावली येथे रस्त्यावर पुलाचे काम सुरु असून येथे मध्यप्रदेशातील खंडवा जिल्ह्यातील कोरकू जमातीचे ६० ते ७० लोक मजूरी काम करीत असून त्यांचेकडील अन्नधान्य संपले व त्यांचेवर उपासमारीची वेळ आली असल्याबाबत माहिती प्राप्त झाली. सदर मजूर हे मध्यप्रदेश राज्यातील रहिवासी असल्याने, त्यांचे ओळखीचे कोणीही नाही. त्यामुळे त्यांचे अन्नावाचून हाल होेत असल्याचे समजताच, आज दि.१५ एप्रील रोजी सहाय्यक पोलिस अधिक्षक डॉ.पवन बन्सोड, गोवर्धनाचे बिट जमादार पोहेकॉ दामोधर ईप्पर, कार्यालयीन पोलिस कर्मचारी रवि सैबेवार, आत्माराम राठोड, राजू वानखेडे, विजय घुगे, संतोष पाईकराव, गंगाराम बडेराव, अभिजित बांगर, रोहीत ठाकरे, मनिष बिडवे, गजानन ब्राम्हण, विठ्ठल शिंदे, चंचल वानखेडे, मिनाक्षी भाकरे यांनी ग्राम नावली येथे जाऊन सदर ठिकाणी काम करणारे मजूर कुटुंबीयांची विचारपूस केली असता, त्यांनी त्यांचेकडील अन्नधान्य संपले असल्याचे सांगितले. त्यांना गहू, तांदुळ, डाळ, मिरची व भाजीपाला साहित्य वाटप केले. तसेच त्यांना कोव्हिड १९ (कोरोना) या आजाराविषयी माहिती देवून नियमीत हात साबणाने धुण्याबाबत व सोशल डिस्टन्स पाळण्याबाबत माहिती दिली. 
संपूर्ण जग सद्या कोव्हिड -१९ (कोरोना) नावाच्या आजाराशी झुंज देत आहे. प्रगतशिल देशामध्ये सुद्धा हजारोंच्या संख्येने लोक मृत्यूमुखी पडले आहेत. कोरोना हा आजार दिवसेंदिवस उग्र रुप धारण करीत आहे. लोकांना शासनाचे वतीने घरामध्ये राहा सुरक्षित राहा असा संदेश देण्यात येत असून सुद्धा लोक विनाकारण रस्त्यावर फिरतांना दिसून येत आहेत. वाशिम जिल्ह्यामध्ये कोव्हिड १९ या आजाराने ग्रासलेला एक रुग्ण मिळून आला असून, त्याचेवर योग्य ते उपचार सुरु आहेत. 
वाशिम जिल्ह्यामध्ये रुग्णांचे संख्येत वाढ होवू नये याकरीता वाशिम जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व पोलिस अधिक्षक यांनी कठोर पावले उचलून यांचे आदेशानुसार जिल्ह्याच्या सर्व सिमा सिल करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात बाहेरील कोणत्याही व्यक्तीस प्रवेश दिला जात नसून जिल्ह्यातून कोणीही व्यक्ती बाहेर जाणार नाही याची खबरदारी घेण्यात येत आहे. तसेच जिल्ह्यात कलम १४४ फौजदारी प्रक्रिया संहिता लागू असून नियमांचे उल्लंघन करणार्‍या व्यक्तीवर कठोर कारवाई करण्यात येत आहे. जिल्ह्यात संचारबंदी लागू असून गोरगरीब जनतेस अन्नधान्यापासून हाल होणार नाही याची दक्षता घेतली जात आहे. संपूर्ण वाशिम जिल्ह्यामध्ये सर्व पोलिस स्टेशन कडून दररोज गरजू लोकांना मदत केली जात आहे. 
वाशिम जिल्ह्यामध्ये महसुल व पोलिस प्रशासन संचारबंदीचे काळात कोणाचीही उपासमारी होणार नाही याची काळजी घेत आहेत. तसेच वाशिम जिल्ह्यातील सर्व जनतेस आवाहन करण्यात येते की, आपल्या घराचे बाहेर जाण्याचे टाळून आपले व आपले कुटुंबियांचे जिवाचे स्वत:च रक्षण करावे. संचारबंदी पाळा, कोरोना टाळा असा संदेश उपविभाग वाशिमचे सहाय्यक पोलिस अधिक्षक डॉ.पवन बन्सोड यांनी दिले आहे. 

No comments

Powered by Blogger.