Header Ads

शेतकरी ते ग्राहक शेतमालाची थेट विक्री


शेतकरी ते ग्राहक शेतमालाची थेट विक्री

जिल्ह्यात सुमारे २ कोटी रुपयांची उलाढाल

·   ९ हजार क्विंटल फळे, भाजीपाला विक्री

·   कृषि विभाग, ‘आत्मा’चा उपक्रम



वाशिम, दि. १९ (जिमाका) : नोवेल कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच वाशिम जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली. या काळात जीवनावश्यक वस्तूंची विक्री सुरळीत सुरु राहावी, यासाठी जिल्हास्तरावर नियोजन करण्यात आले. भाजीपाला, फळे, दुध याचा पुरवठा होण्याबाबत कृषि विभानाने नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी दिल्या. त्यानुसार कृषि विभाग व ‘आत्मा’च्या माध्यमातून शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून शेतमाल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याचा उपक्रम राबविण्यात आला. यामाध्यमातून २३ मार्च ते १६ एप्रिल दरम्यान जिल्ह्यात सुमारे २ कोटी २६ लक्ष रुपयांची उलाढाल झाली असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी तथा ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक शंकर तोटावार यांनी दिली आहे.
जिल्ह्यातील शेतकरी, शेतकरी गट तसेच शेतकऱ्यांच्या कंपनीने उत्पादित केलेला माल थेट ग्राहकापर्यंत पोहचविण्याकरिता तालुका व जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले. जिल्हास्तरावर जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालयातील कृषि उपसंचालक निलेश ठोंबरे, तंत्र अधिकारी समाधान पडघन, मनीषा लंगोटे यांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली. तसेच तालुकास्तरावर कृषि अधिकारी व कृषि सहाय्यक यांची तालुका  नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली. कृषी विभाग व ‘आत्मा’ कार्यालयाकडून सर्वप्रथम जिल्ह्यातील भाजीपाला व फळे उत्पादक शेतकऱ्यांची पिकनिहाय माहिती संकलित करण्यात आली. त्यानुसार या शेतकऱ्यांचे ‘आत्मा’ अंतर्गत गट तयार करून भाजीपाला, फळे थेट ग्राहकांपर्यंत पोहचविण्याचे तालुकास्तरावर नियोजन करण्यात आले.
जिल्ह्यात २७ मार्च पासून हा उपक्रम सुरु करण्यात आला, १६ एप्रिल पर्यंत या उपक्रमाद्वारे सुमारे ९ हजार ६० क्विंटल भाजीपाला व फळांची विक्री झाली. यामधील काही भाजीपाला, फळे इतर जिल्ह्यातही विक्री करण्यात आली आहेत. तसेच नाशिक जिल्ह्यातील काही द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांनी या उपक्रमांतर्गत जिल्ह्यात सुमारे २० क्विंटल द्राक्ष विक्री केली आहे. जिल्ह्यातील मुंगळा येथील संत्रा उत्पादक शेतकरी, बाळखेड येथील शेवगा उत्पादक शेतकऱ्यांनी या उपक्रमांतर्गत वाशिम जिल्ह्यासह अकोला, औरंगाबाद, बुलडाणासह इतर जिल्ह्यातही आपला माल विक्रीसाठी पाठविला आहे.

शेतकरी आणि ग्राहकही समाधानी

कृषी विभाग व ‘आत्मा’च्या शेतकरी ते ग्राहक शेतमालाची थेट विक्री करण्याचा उपक्रम राबविला. त्यामुळे जिल्ह्यातील भाजीपाला व फळांचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना लॉकडाऊन काळात आपला माल ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यास मदत झाली. त्यांच्या शेतमालाला योग्य भावही मिळाला. शिवाय ग्राहकांनाही संचारबंदीमध्ये कोरोनाच्या संकटापासून दूर राहत, आपल्या दारातच चांगल्या प्रतीचा भाजीपाला, फळे वाजवी दरात उपलब्ध झाली. त्यामुळे शेतकरी व ग्राहक यांनी या उपक्रमाबाबत समाधान व्यक्त केल्याची माहिती श्री. तोटावार यांनी दिली आहे.

No comments

Powered by Blogger.