Header Ads

कोविड हेल्थ सेंटरमध्ये १०० बेडची व्यवस्था

जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी केली कोविड हेल्थ सेंटरची पाहणी

कोविड हेल्थ सेंटरमध्ये १०० बेडची व्यवस्था

डॉक्टर्स, परिचारिका, वार्ड बॉय यांची तात्पुरत्या स्वरूपात राहण्याची व्यवस्थाही तेथेच 


     वाशिम, दि. २९ (जिमाका) :  जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून कोरोना विषाणू संसर्गाची मध्यम स्वरूपाची लक्षणे आढळून येणाऱ्या व्यक्तीवर उपचार करण्‍यासाठी चिखली रोडवरील नव्यानेच बांधलेल्या जिल्हा महिला रुग्णालय तयार करण्यात येत असलेल्या कोविड हेल्थ सेंटरची पाहणी जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी आज, २९ एप्रिल रोजी केली.
     कोविड हेल्थ सेंटरमध्ये आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी श्री. मोडक यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. कळमकर यांना दिले. यावेळी उपजिल्हाधिकारी रमेश काळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास सोनटक्के, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर व उपविभागीय अभियंता श्री लुंगे प्रामुख्याने उपस्थित होते.
      महिला रुग्णालयात तयार करण्यात येणाऱ्या कोविड हेल्थ सेंटरमध्ये १०० बेडची व्यवस्था राहणार आहे. पहिल्या मजल्यावर १०० बेड राहणार असून दुसऱ्या मजल्यावर रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर्स, परिचारिका, वार्ड बॉय यांची तात्पुरत्या स्वरूपात राहण्याची व्यवस्था असेल.
     पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर स्वच्छ शौचालय आणि पुरेसे पाणी पिण्यासाठी व वापरण्यासाठी उपलब्ध करून दयावे. या इमारतीत कायम स्वच्छता राहील, याकडे विशेष लक्ष द्यावे, असे सांगितले.
     तसेच इमारतीची प्रलंबित कामे संबंधित कंत्राटदाराकडून तातडीने पूर्ण करुन घ्यावीत. इमारतीच्या अन्य कामासाठी निधीची आवश्यकता असल्यास जिल्हा नियोजन समितीमधून निधी उपलब्ध करून देण्यात येईल. वरिष्ठांकडे पाठपुरावा करून  सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रलंबित निधी उपलब्ध करून घ्यावा. जिल्हा शल्य चिकित्सक यांना तातडीने १०० बेड कोविड हेल्थ सेंटरसाठी उपलब्ध करून देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी श्री. मोडक यांनी यावेळी दिले.

No comments

Powered by Blogger.