Header Ads

सर्व नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकांनी दवाखाने सुरु ठेवण्याचे आदेश

सर्व नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकांनी दवाखाने सुरु ठेवण्याचे आदेश


* औषधी दुकाने, लॅब यांनाही आदेश लागू

* आदेशाचे उल्लंघन केल्यास होणार कारवाई

              वाशिम, दि. २७ : जिल्ह्यातील खासगी दवाखाने बंद असल्याने नागरिकांची गैरसोय होत असून त्यांना आजारांवर उपचार मिळण्यात अडचणी येत आहेत. कोरोन विषाणू संसर्गामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत लोकांना त्यांच्या आजारावर उपचार मिळणे व त्यांचा आत्मविश्वास कायम राहणे आवश्यक असल्याने जिल्ह्यातील सर्व नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकांनी आपले दवाखाने सुरु ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष हृषीकेश मोडक यांनी दिले आहेत. औषधी विक्री केंद्र, प्रयोगशाळा (लॅब) यांनाही हे आदेश लागू राहणार आहेत.

                कोरोना विषाणू संसर्गामुळे आपत्कालीन स्थिती निर्माण झाल्याने राज्यात साथरोग नियंत्रण अधिनियम १८९७ लागू करण्यात आला आहे. त्यानुसार कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात येत असून या प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे. या उपाययोजनांचा भाग म्हणून जिल्ह्यातील नागरिकांना त्यांच्या आजारावर उपचार मिळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकांनी आपले दवाखाने सुरु ठेवावेत. तसेच औषधी विक्री केंद्र, प्रयोगशाळा (लॅब) सुध्दा सुरु ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी श्री. मोडक यांनी दिले आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव संपेपर्यंत हे आदेश लागू राहणार असून खासगी दवाखाने, औषधी विक्री केंद्र, प्रयोगशाळा (लॅब) यामधील सर्व मदतनीस, नर्स, रिसेप्शनिस्ट यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांना सुद्धा हे आदेश लागू राहणार आहेत.

               आदेशाचे पालन न करणाऱ्या व्यक्ती, संस्था अथवा समूह यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कलम ५१, तसेच साथरोग नियंत्रण अधिनियम १८९७ चे कलम २ नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे समजून पुढील कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

****

No comments

Powered by Blogger.