Header Ads

महानगरातून आलेल्या प्रत्येक प्रवाशाची तपासणी करावी

महानगरातून आलेल्या प्रत्येक प्रवाशाची तपासणी करावी


-         जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक



वाशिमदि. २१ : जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. जिल्ह्यात पुणे, मुंबई सारख्या महानगरातून परतणाऱ्या व्यक्तींची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. त्यामुळे खाजगी ट्रॅव्हल्स व इतर वाहनांनी येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करण्यासाठी रिसोड, मालेगाव, वाशिम अथवा कारंजा येथील ग्रामीण रुग्णालयात आपली आरोग्य तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी केले. तसेच पुणे, मुंबई व इतर महानगरातून प्रवाशी वाहतूक करणाऱ्या सर्व खाजगी बस, वाहनांच्या चालक, मालकांनी आपल्या वाहनातून आलेल्या प्रत्येक प्रवाशाची तपासणी होण्यासाठी सहकार्य करावे, अशा सूचना दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात आज, २१ मार्च रोजी खाजगी ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी श्री. मोडक बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास सोनटक्के, जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ. अविनाश आहेर, वाशिमचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. पवन बनसोड, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी समरीन सय्यद यांच्यासह खाजगी ट्रॅव्हल्स कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. मोडक म्हणाले, पुणे, मुंबई येथून येणाऱ्या सर्व खाजगी बसेस व वाहने जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर नजीकच्या ग्रामीण रुग्णालयात येणे आवश्यक आहे. याठिकाणी सर्व प्रवाशांची आरोग्य तपासणी करण्यासाठी वैद्यकीय पथके आरोग्य विभागाने सज्ज ठेवावीत. प्रवाशी क्षमतेबाबत परिवहन विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन न करणाऱ्या सर्व खाजगी बसेसवर तातडीने कारवाई करावी. तसेच राज्य महामार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसमध्ये सुद्धा परिवहन विभागाने ठरवून दिल्याप्रमाणे प्रवासी वाहतूक करावी. तसेच सर्व वाहनचालक, वाहक यांना आरोग्याबाबत काळजी घेण्याच्या सूचना द्याव्यात. बस स्थानक परिसरात स्वच्छता ठेवावी. तेथील स्वच्छतागृहे सुध्दा स्वच्छ ठेवावीत. सर्व बसेसचे सातत्याने निर्जंतुकीकरण करावे, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

No comments

Powered by Blogger.