Header Ads

संत सेवालाल महाराजांची जयंती उत्साहात साजरी - Sant Sevalal Maharaj Jayanti Pohradevi news

संत सेवालाल महाराजांची जयंती उत्साहात साजरी - Sant Sevalal Maharaj Jayanti Pohradevi news


तीर्थक्षेत्र पोहरादेवी, उमरीगडाचा कायापालट होणार : ७२३ कोटींचा प्रकल्प

संत सेवालाल महाराजांची जयंती उत्साहात साजरी

मंत्री, खासदारांनी घेतले दर्शन ; भाविकांची मोठी गर्दी

वाशिम दि १५ (www.jantaparishad.com / जिमाका) : देशभरातील बंजारा समाजाची काशी असलेल्या तीर्थक्षेत्र पोहरादेवी आणि उमरीगडाच्या विकासासाठी मुख्यमत्री एकनाथ शिंदे यांनी ७२३.९८ कोटींच्या प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. येत्या काळात तीर्थक्षेत्र पोहरादेवी, उमरीगडाचा कायापालट होणार असल्याचे प्रतिपादन मृद व जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री संजय राठोड यांनी आज पोहरादेवी येथे केले. श्री संत सेवालाल महाराज यांच्या जयंती (Sant Sevalal Maharaj Jayanti) निमित्त पोहरादेवी (Pohradevi) येथे जयंती महोत्सव आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. 


या कार्यक्रमाला पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे, खासदार डॅा. श्रीकांत शिंदे, कबिरदास महाराज, जितेंद्र महाराज, सुनिल महाराज, रायसिंग महाराज, मोहिनीताई इंद्रनिल नाईक, वरिष्ठ अधिकारी, भाविक मोठ्यासंख्येने उपस्थित होते. यावेळी हा जयंती महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.

पालकमंत्री संजय राठोड पुढे म्हणाले, पोहरागड आणि उमरीगड हे केवळ तीर्थक्षेत्रच नव्हे तर येत्या काळात पर्यटनस्थळ, शिक्षणाचे हब म्हणून ओळखले जाणार असून मोठे प्रकल्प याठिकाणी येणार आहेत. धर्मगुरु महंत रामराव महाराज यांनी यापूर्वी मी मंत्री असतांना माझ्यावर पोहरादेवीच्या विकासाची जबाबदारी दिली होती. या तीर्थक्षेत्र विकासासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला असता त्यांनी तात्काळ कोट्यवधींच्या प्रस्तावांना मंजुरी दिली. तसेच समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक विषय मार्गी लावले असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.

समाजातील गरजू विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, आधार योजना, मोदी आवास योजनेत विजाभजचा समावेश, ग्रामपंचायतीसाठी लोकसंख्येची अट शिथिल करणे, मुंबईत पाच एकर जागेत सेवालाल भवन बांधणे असे अनेक समाजोपयोगी निर्णय राज्य सरकारने घेतले आहे, असेही पालकमंत्री संजय राठोड यांनी यावेळी सांगितले.

पोहरदेवी विकासाच्या पर्वाला सुरुवात - मंत्री गुलाबराव पाटील

पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त पोहरादेवीच्या दर्शनाची संधी मिळाली. तीर्थक्षेत्र पोहरदेवीच्या विकासाच्या पर्वाला सुरुवात झाली आहे. येणाऱ्या १५ फेब्रुवारीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहरादेवीला येतील. बंजारा समाज हा न झुकणार आणि संस्कृती जपणारा समाज आहे. समाजाच्या विकासासाठी नेहमी मदत करणार असल्याची ग्वाही मंत्री श्री पाटील यांनी दिली.

बंजारा समाजाचा सर्वांगीण विकास होणार - मंत्री दादाजी भुसे

सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे यांनी जयंतीनिमित्त शुभेच्छा देत म्हणाले, पोहरादेवी परिसराच्या विकासासाठी जे जे करण्याची गरज असेल ते केले जाईल. प्रतिकुल परिस्थितीत कष्ट करणाऱ्या बंजारा समाजाच्या प्रगतीसाठी मंत्री संजय राठोड सातत्याने पाठपुरावा करतात. त्यांना समाजाच्या विकासासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची नेहमी साथ असते. येणाऱ्या काळात बंजारा समाजाचा सर्वांगीण विकास होईल, असा विश्वास मंत्री दादाजी भुसे यांनी व्यक्त केला.

पोहरादेवीच्या विकासासाठी मुख्यमंत्री निधी कमी पडू देणार नाही - खासदार डॅा. श्रीकांत शिंदे 

खासदार डॅा. श्रीकांत शिंदे म्हणाले, पहिल्यांदाच पोहरादेवीला येण्याची संधी मिळाली. येथील विकासकामांच्या पाहणीसह संत सेवालाल महाराजांचे दर्शन मिळाले. तीर्थक्षेत्र पोहरादेवीच्या विकासासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी भरीव निधी उपलब्ध करुन दिला. विकासाचे काम सुरु झाले आहे. येत्या काळात या भागाचा विकास होणार आहे. नंगारा भवनाच्या माध्यमातून बंजारा संस्कृती, इतिहास जोपासण्याचे मोठे कार्य होत आहे. हे कार्य भावी पिढीपर्यंत नेण्यासाठी तीर्थक्षेत्र बळकट करावे लागेल. राज्य सरकारने सातशे कोटीहून अधिक निधी दिला. महाराष्ट्रातील तीर्थस्थळांसाठी भरीव निधी दिला जात आहे. पोहरादेवीच्या विकासासाठी मुख्यमंत्री निधीची कमी पडू देणार नाहीत, अशी ग्वाही खा.डॅा शिंदे यांनी यावेळी दिली.


यावेळी पालकमंत्री संजय राठोड, मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री दादाजी भुसे आणि खासदार डॅा. श्रीकांत शिंदे यांनी श्री संत सेवालाल महाराज मंदिर व समाधीस्थळाच्या कामांची पाहणी करुन महाराजांचे दर्शन घेतले. यावेळी त्यांचा बंजारा पारंपरिक पद्धतीने सत्कार करण्यात आला. तसेच बंजारा समाजाच्या परंपरेनुसार अरदास व पाळणा गीत गायन करण्यात आले.

No comments

Powered by Blogger.