Header Ads

Rashtra Sant Tukdoji Maharaj Mahiti / Information / Nibandh / Lekh / Karya - प्रबोधनाचा समृद्ध वारसा : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या कार्याविषयी माहिती

Rashtra Sant Tukdoji Maharaj Mahiti / Information / Nibandh / Lekh / Karya - प्रबोधनाचा समृद्ध वारसा : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या कार्याविषयी माहिती

प्रबोधनाचा समृद्ध वारसा 

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या कार्याविषयी माहिती

Information About Rashtra Sant Tukdoji Maharaj and his work

(लेख : विभागीय माहिती कार्यालय, अमरावती द्वारा)

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतांना आपण मागे वळून पाहिल्यास आपणाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्यावेळेच्या संपूर्ण पिढीने स्वत:ला वाहुन घेतले होते. त्यामध्ये संत-महंतांचाही मोलाचा वाटा होता. त्यांच्या मार्गदर्शन व प्रबोधनाने स्वातंत्र्यलढा अधिक प्रभावी होत गेला होता. त्याच अनुषंगाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या कार्याविषयी ही माहिती (Information About Rashtra Sant Tukdoji Maharaj and his work) ….

स्वातंत्र्यसंग्रामाच्या काळात अनेक संत-महंतांच्या कार्याचा, प्रबोधनाचा वारसा आपल्या देशाच्या सर्वसामान्य जनतेला मिळाला आहे. त्यापैकी एक होते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज (Rashtrasant Tukdoji Maharaj). ग्रामोन्नती व ग्रामकल्याण हा त्यांच्या विचारसरणीचा केंद्रबिंदू होता. स्वातंत्र्यसंग्रामातील त्यांचे योगदान अमूल्य आहे.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा जन्म (Birth) अमरावती जिल्ह्यातील यावली या गावी 30 एप्रिल 1909 रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव बंडोपंत आणि आईचे नाव मंजुळा होते. ते ब्रम्हभट वंशातले होते. भट शब्दाचा अपभ्रंश होऊन त्यांना भात म्हणत. बारश्याला दिनांक 11 मे 1909 रोजी आकोटचे श्री हरीबुवा, माधानचे प्रज्ञांचक्षु  श्री संत गुलाब महाराज व याव्लीचे महाराज यांनी मुलाचे नाव ‘माणिक’ (Manik) ठेवले आणि आशीर्वाद देवून निघुन गेले. त्यांचे प्राथमिक शिक्षण चांदूर बाजार येथे झाले. श्री संत आद्कोजी महाराजांनी त्यांचे नाव ‘तुकड्या’ (Tukdya) ! ठेवले होते.

इ.स.1925 मध्ये त्यांनी ‘आनंदामृत’ (Anandamrut) ग्रंथाची रचना केली. ते स्व:त भजन,कीर्तन, प्रवचन करू लागले. त्यांनी खंजेरी वर उत्तम भजने गायली. पुढे त्यांचा गांधीजींशी सहवास झाला. 28 ऑगष्ट 1942 रोजी स्वातंत्र्य संग्राम चळवळीत भाग घेतल्याने त्यांना अटक झाली. आणि डिसेंबर मध्ये सुटका झाली. 1943 मध्ये विश्वशांतीनाम सप्ताह झाला. 5 एप्रिल 1943 रोजी श्री गुरुदेव मुद्रणालयाची निर्मिती करून गुरुदेव मासिकाचे प्रकाशन केले. 19 नोहेंबर 1943 रोजी अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाची स्थापना केली. सर्वांसाठी त्यांनी मन्दिरे खुली केली. ते म्हणत गावा गावासी जागवा।  भेदभाव समूळ मितवा” उजळा ग्रामोन्नतिचा दिवा । तुकड्या म्हणे।”

संत रामदासांनी ‘दासबोधा’तील एका समासात ‘कसं लिहावं?’ हे सांगितलं आहे तर संत तुकडोजी महाराजांनी ‘काय वाचावं?’ नि ‘कशासाठी वाचावं?’ हे त्यांच्या ‘ग्रामगीते’च्या चाळिसाव्या अध्यायात सांगितलं आहे. या अध्यायाचं नाव आहे ‘ग्रंथाध्ययन. (Granthadhyayan)

सामान्य माणसानं चांगलं जीवन कसं जगावं, याचं प्रतिपादन ज्या ग्रंथात केलं आहे, ते वाचावेत. फार अवजड तत्त्वज्ञानाच्या शाखोपशाखांचे तपशील सांगणारे ग्रंथ पंडितांसाठी उपयुक्त असले, तरी सामान्य माणसांसाठी त्यांचा काय उपयोग? म्हणून आपली आकलन क्षमता किंवा ग्रहण करण्याची शक्ती लक्षात घेऊन आपण ज्या प्रकारचं जीवन जगतो, त्यासाठी उपयुक्त असे ग्रंथच वाचनासाठी निवडावेत. आपण जे वाचतो, त्याचं मर्म आपल्याला कळायला हवं. त्यामुळे ज्ञान आणि सुसंस्कार यांच्याबरोबर आपल्याला मन:शांतीही मिळते. योग्य वाचन केल्यानं असे लाभ होतात. वाचन हे फक्त परमार्थासाठीच नसतं, तर सध्याचं जीवन जगण्यासाठीही आवश्यक असतं.

संत तुकडोजींचे कार्य

भारत हा खेड्यांचा देश आहे, हे लक्षात घेऊन ग्रामविकास झाला की राष्ट्राचा विकास होईल, अशी तुकडोजी महाराजांची श्रद्धा व विचारसरणी होती. समाजातल्या सर्व घटकांतील लोकांचा उद्धार कसा होईल, याविषयी त्यांनी अहर्निश चिंता केली. ग्रामोन्नती व ग्रामकल्याण हा त्यांच्या विचारसरणीचा जणू केंद्रबिंदूच होता. भारतातील खेड्यांच्या स्थितीची त्यांना पुरेपूर कल्पना होती. त्यामुळे त्यांनी ग्रामविकासाच्या विविध समस्यांचा मूलभूतस्वरूपी विचार केला व त्या समस्या कशा सोडवाव्यात, याविषयी उपाययोजनाही सुचविली. या उपाययोजना त्यांच्या काळाला तर उपकारक ठरल्याच पण त्यानंतरच्या काळालाही उचित ठरल्या. हे आज तीव्रतेने जाणवते. अशा गोष्टींतूनच राष्ट्रसंतांचे द्रष्टेपण दिसून येते.

अमरावतीजवळ मोझरीच्या गुरुकुंज आश्रमा (Mozari Gurukunj Ashram) ची स्थापना हे तुकडोजींच्या आयुष्यातील जसे लक्षणीय कार्य आहे, त्याचप्रमाणे ग्रामगीतेचे लेखन हाही त्यांच्या जीवनकार्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. ग्रामगीता (Gramgita) ही जणू तुकडोजी महाराजांच्या वाङ्‌मयसेवेची पूर्तीच होय. स्वत:ला ते तुकड्यादास म्हणत कारण भजन म्हणतांना ते जी भिक्षा घेत, त्यावरच आपण बालपणी जीवन कंठिले, ह्याची त्यांना जाणीव होती.

खेडेगाव स्वयंपूर्ण कसे होईल, याविषयीची जी उपाययोजना तुकडोजी महाराजांनी सुचविली होती, ती अतिशय परिणामकारक ठरली. ग्राम हे सुशिक्षित व्हावे, सुसंस्कृत व्हावे, ग्रामोद्योग संपन्न व्हावेत, गावानेच देशाच्या गरजा भागवाव्यात, ग्रामोद्योगांना प्रोत्साहन मिळा्वे, प्रचारकांच्या रूपाने गावाला नेतृत्व मिळावे, असा त्यांचा प्रयत्‍न होता. त्याचे प्रतिबिंब ग्रामगीतेत उमटले आहे. देवभोळेपणा, जुनाट कालबाह्य अंधश्रद्धा नाहीशा व्हाव्यात, याविषयी त्यांनी अविरत प्रयत्‍न केले. सर्वधर्मसमभाव हेही या राष्ट्रसंताच्या विचारविश्वाचे एक वैशिष्ट्य होते. त्यासाठी तुकडोजी महाराजांनी सामुदायिक/सर्वधर्मीय प्राथनेचा आग्रहपूर्वक पुरस्कार केला.

गुरुकुंजाशी संबंधित असलेले हे सर्व निष्ठावंत कार्यकर्ते आजही त्यांचे हे कार्य अखंडव्रतासारखे चालवीत आहेत. महिलोन्नती हाही तुकडोजी महाराजांच्या विचारविश्वाचा एक लक्षणीय पैलू होता. कुटुंबव्यवस्था, समाजव्यवस्था, राष्ट्रव्यवस्था ही स्त्रीवर कशी अवलंबून असते, हे त्यांनी आपल्या कीर्तनांद्वारे समाजाला पटवून दिले. देशातले तरुण हे राष्ट्राचे भावी आधारस्तंभ. ते बलोपासक असावेत म्हणजे ते समाजाचे व राष्ट्राचे संरक्षण करू शकतील. ते नीतिमान व सुसंस्कृतयुक्त कसे होतील, याविषयीचे उपदेशपर व मार्गदर्शनपर लेखन तुकडोजींनी केले. या राष्ट्रसंताने आपल्या लेखनातून व्यसनाधीनतेचा तीव्र निषेध केला.

जनजागृतीचा जागर

ते आपल्या भजनातून जाती भेद पाळू नका, अस्पृश्यता गाडून टाका, दारू पिवू नका, देशावर प्रेम करा असा उपदेश करीत.  प्रत्येक भजनाच्या प्रारंभी थोडे गुरु स्मरण व अंधश्रद्धा, वाईटरूढी, व्यसने यांचा त्याग करा. अश्या आशयाचे थोडावेळ भाषण केले की, हातातील खन्जरीच्या वेगवान ठेक्यावर त्यांचे पहाडी आवाजातील व सुंदर चालीतील मराठी-हिंदी पदांचे भजन सुरु होई व त्यात कुठल्याही थरातील वा धर्मातील श्रोता तल्लीन होवून जाई. सर्व पंथांचे व धर्माचे लोक त्यांचे अनुयायी बनले. व त्यांना राष्ट्रसंत तुकडोजी या नावाने संबोधू लागले.       ‘ग्रामगीता’ लिहून गावाचे व लोकांचे कल्याण कशात आहे हे समजाविले. भारत कृषी प्रधान देश आहे. म्हणून कृषी उद्योगात सुधारणा सुचविली. सामुदायिक प्रार्थना करावी.  सर्वांशी प्रेमाने वागाव. गोवंश बंदी व पशु संर्वधन करावे हे शिकविले.

चीन युद्ध (1962) व पाकीस्तान युद्ध (1965) झाले तेव्हा सैन्यास धीर देण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी  (Rashtra Sant Tukdoji Maharaj) स्व:त सीमेवर जाउन वीरगीते गाईली, व सैन्याचे धैर्य वाढविले. ते फ़ार प्रयत्नवादी होते. तन,मन,धनाने त्यांनी राष्ट्राची सेवा केली. ते खरे राष्ट्र संत होऊन गेले. दिनांक 11 आक्टोंबर 1968 रोजी हे वंदनीय राष्ट्रसंत ब्रम्हलीन झाले. त्यांचे चरणी आपले शत: शत: प्रणाम.

SOURCE

No comments

Powered by Blogger.