Header Ads

कारंजा नगर परिषद चे वतीने पंचप्रण शपथ ग्रहण समारंभाचे आयोजन संपन्न - Karanja lad Nagar Parishad organised Panchpran Shapath Grahan Samarambh at At Jhansi Rani Chowk

कारंजा नगर परिषद चे वतीने पंचप्रण शपथ ग्रहण समारंभाचे आयोजन संपन्न - Karanja lad Nagar Parishad organised Panchpran Shapath Grahan Samarambh at At Jhansi Rani Chowk


देश समृद्ध होणेसाठी प्रत्येकाने कर्तव्य पालन करणे गरजेचे - जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस

कारंजा येथे " माझी माती माझा देश " अभियान निमित्त पंचप्रण शपथ ग्रहण समारंभ संपन्न 

वाशीम दि.१२ (जिमाका) - लोक आपले हक्क जाणतात मात्र कर्तव्याची जाणीवही तेथे असायला हवी. आपला देश समृद्ध होण्यासाठी प्रत्येकाने आपल्या कर्तव्याचे पालन करायला हवे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.यांनी येथे केले. आज स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या सांगता समारोहाच्या निमित्ताने ' माझी माती माझा देश ' अभियान निमित्त कारंजा येथील झाशी राणी चौकात आयोजित पंचप्रण शपथ ग्रहण समारंभात प्रमुख अतिथी म्हणून त्या बोलत होत्या.

कारंजा नगर परिषदेच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी ललित वऱ्हाडे व मुख्याधिकारी दीपक मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

श्रीमती बुवनेश्र्वरी यांनी  'माझी माती माझा देश ' अभियानाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेणाऱ्या कारंजा नगर परिषदे च्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.याप्रसंगी त्यांनी स्वच्छतेविषयी देखील मार्गदर्शन केले.शहरातील सर्व नागरिकांनी स्वच्छतेची सवय लावून घ्यावी. केरकचरा कुठेही न टाकता तो घरापर्यंत येणाऱ्या घंटागाडीतच टाकावा.असे आवाहनही त्यांनी यावेळी उपस्थित नागरिकांना केले.   

पंचप्रण शपथ ग्रहण कार्यक्रमाला उपस्थित विद्यार्थ्यांना उद्देशून बोलताना जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्वरी म्हणाल्या की, विद्यार्थ्यांना शाळेत जे शिकवले जाते त्या गोष्टीचे त्यांनी समाजात  वावरताना पालन करणे आवश्यक आहे. यावेळी त्यांनी नगरपरिषदेने आयोजित केलेल्या पंचप्रण शपथ ग्रहण समारंभाला भरभरून प्रतिसाद देणाऱ्या शहरातील सर्व सामाजिक व स्वयंसेवी संस्था, पत्रकार संघटना, गो ग्रीन फाउंडेशन, माजी सैनिक संघटना, बचत गटातील महिला व सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांचे अभिनंदन केले.

प्रारंभी जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्वरी यांच्या हस्ते कार्यक्रमस्थळी ध्वजारोहण करण्यात आले.या कार्यक्रमाला उपस्थित सर्वांनी पंचप्रण शपथ घेतली. 

कार्यक्रमाच्या निमित्ताने श्री.गवळीकर यांनी महात्मा गांधी यांची आणि श्री.राउत यांनी संत गाडगेबाबा यांची वेशभूषा केली होती. कार्यक्रमात शहरातील विश्वभारती विद्यालयातील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर देखाव्यावर नृत्य सादर केले.विद्यार्थ्यांच्या या नृत्याने उपस्थित सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

याप्रसंगी जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.यांच्या हस्ते माजी सैनिक एकघरे व मधुकरराव खाडे यांचा सपत्निक सत्कार करण्यात आला. कार्यक्रमासाठी शहरातील सरकारी व खाजगी शाळांचे विद्यार्थी, शिक्षक,मुख्याध्यापक तसेच विविध क्षेत्रातील व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होते.

karanja nagar parishad shilalekh in memories of freedom fighter


झाशी राणी चौकातील पंचप्रण शपथ ग्रहण समारंभानंतर शहरात विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली.या रॅलीत सहभागी सरकारी व खाजगी शाळांच्या विद्यार्थ्यांनी " माझी माती माझा देश " अभियानाच्या निमित्ताने नागरिकांमध्ये जनजागृती केली. दरम्यान कारंजा नगरपरिषद कार्यालयासमोर झालेल्या एका कार्यक्रमातून स्वातंत्र्य सैनिकांना समर्पित शीलाफलकाचे अनावरण मुख्याधिकारी दीपक मोरे, माजी सैनिक एकघरे, मधुकरराव खाडे व अन्य मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. दरम्यान या ठिकाणी उपस्थित सर्वानी पंचप्रण शपथ घेतली. 

शिलाफलक अनावरण कार्यक्रमानंतर उपस्थित सर्व माजी सैनिकांचा सपत्नीक सत्कार शहरातील पत्रकार आणि सामाजिक संघटना, स्वयंसेवी संस्था, गो ग्रीन फाउंडेशन व सामाजिक कार्यकर्त्यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. याप्रसंगी वीर पत्नींना देखील मान्यवरांचे हस्ते सन्मानित करण्यात आले. 

कार्यक्रमाचे संचालन प्रा.अनुप नांदगावकर यांनी केले. संघरत्न नरवाडे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला शहरातील नागरीक, नगर परिषदेचे कर्मचारी, अधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.    

मुख्याधिकारी दिपक मोरे यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आलेल्या या कार्यक्रमासाठी नगर परिषदेच्या विविध विभागाचे अधिकारी,कर्मचारी तसेच नगरपरिषद शाळांचे मुख्याध्यापक,शिक्षक आणि पत्रकार संघटना व शहरातील सामाजिक तसेच स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते प्रामुख्याने सहभागी होते.

No comments

Powered by Blogger.