Header Ads

मेरी माटी मेरा देश - येथे कर माझे जुळती - Meri Maati Mera Desh - Yethe Kar Mazhe Judati

लेख : मेरी माटी मेरा देश - येथे कर माझे जुळती - Article : Meri Maati Mera Desh - Yethe Kar Mazhe Judati


 मेरी माटी मेरा देश - येथे कर माझे जुळती

(लेख - विवेक खडसे, जिल्हा माहिती अधिकारी, वाशिम)

(Article By Vivek Khadse, District Information Officer, Washim)

देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि देशातील अंतर्गत सुरक्षेसाठी प्राणपणाने लढणाऱ्या स्वातंत्र्य सैनिक, केंद्रीय संरक्षण दलातील भारतीय सैनिक व पोलीसांना वंदन करण्यासाठी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचा सांगता समारोह “मेरी माटी मेरा देश”  (Meri Maati Mera Desh) या अभियानाच्या माध्यमातून साजरा करण्यात येत आहे. या भूमीसाठी या देशासाठी लढणाऱ्या सैनिकांप्रती “येथे कर माझे जुळती” (Yethe Kar Mazhe Judati) असेच म्हणावे लागेल.

‘मेरी माटी मेरा देश’ हे अभियान (Meri Maati Mera Desh Abhiyan) संपुर्ण देशभर देशाचा अभिमान बाळगून राबविण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये स्वातंत्र्य सैनिक, भारतीय जवान व ज्या पोलीसांनी देशाच्या स्वातंत्र्य लढयात व देशाच्या सुरक्षेसाठी आपल्या प्राणाची आहुती दिली, त्यांचे हे स्मारक शिलाफलक लावण्यात येणार आहे. त्यामुळे देशासाठी हौतात्म पत्करणाऱ्या स्वातंत्र्य सैनिक व भारतीय जवान यांच्या कार्याची ओळख होवून त्यापासून प्रत्येक भारतीयाला प्रेरणा घेण्यास मदत होणार आहे. शिलाफलकाच्या उभारणीसाठी गावातील संस्मरणीय असलेल्या अशा एका ठिकाणाची निवड करण्यात येणार आहे. यामध्ये अमृत सरोवर/ शाळा/ ग्रामपंचायत या ठिकाणी शिलाफलकाची उभारणी करण्यात येणार आहे. शिलाफलकाचे बांधकाम करण्यासाठी ग्रामपंचायतचा ठराव घेवून त्याची उभारणी ग्रामपंचायतीच्या स्वनिधीतून करण्यात येणार आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये उभारण्यात येणाऱ्या शिलाफलकाचा आकार हा निश्चित ठरविण्यात आला आहे. ग्रामपंचायतमार्फत उभारण्यात येणाऱ्या शिलाफलकाचा सांभाळ करण्याची जबाबदारी ही संबंधित ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांवर सोपविण्यात येणार आहे. ज्या गावामध्ये हुतात्म्यांची नावे उपलब्ध नाही तेथे शिलाफलकाच्या डाव्या भागात अमृत महोत्सवाचे बोधचिन्ह, ग्रामपंचायत किवा शहराचे नांव व तारीख नमुद करण्यात येईल. मध्यभागी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा “जीवनाचा प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण आणि प्रत्येक श्वास, मातृभूमिसाठी जगणे हीच स्वातंत्र्य सैनिकांना आपली खरी आदरांजली असेल”. हा संदेश राहणार आहे. स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी आणि मातृभूमीच्या अभिमानासाठी ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. अशा थोर विभुतींना विनम्र अभिवादन हे वाक्‍य उजव्या बाजूला लिहावे लागेल.

9 ऑगस्ट रोजी प्रत्येक जण पंचप्रण प्रतिज्ञा घेतील. ही प्रतिज्ञा घेतांना हातात माती घेवून, मातीची दिवे घेवून ग्रामपंचायतस्तरावर सर्व अधिकारी-कर्मचारी, लोकप्रतिनिधी व गावकऱ्यांना घेवून शेल्फी काढायची आहे. त्यानंतर ही शेल्फी https://yuva.gov.in/meri_maati_mera_desh यावर अपलोड करुन राष्ट्र उभारणीसाठी वचनबध्द होण्यासाठी ही पंचप्रण शपथ घ्यायची आहे. पंचप्रण शपथमध्ये मी अशी शपथ घेतो की, भारताला २०४७ पर्यंत विकसित देश बनविण्याचे स्वप्न साकार करायचे आहे. गुलामगिरीची मानसिकता मुळापासून उखडून टाकायची आहे, देशाच्या समृद्ध वारसाचा अभिमान सदैव बाळगण्याच आहे. एकता व एकजूटता यासाठी कर्तव्यदक्ष राहायचं आहे, नागरिकांचे कर्तव्य बजावायाचे आहे, तसेच देशाचे रक्षण करणाऱ्यांचा कायम आदर ठेवायचा आहे.

वसुधा वंदनच्या माध्यमातून प्रत्येक गावात दिर्घकाळ टिकणाऱ्या 75 स्वदेशी रोपांची लागवड करुन पृथ्वी मातेचे नुतनीकरण व भरभराट करण्यासाठी गावातील योग्य ठिकाण निवडून शक्यतो शिलाफलकाजवळ वंदन म्हणून 75 देशी रोपांची लागवड करुन अमृत वाटीका तयार करण्यात येणार आहे. यासाठी सामाजिक वनीकरण विभागाची रोप वाटीका किंवा हर घर नर्सरीमधील रोपांचा वापर करावा. या रोपांचे जतन व उभारणी करण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीचे काम रोजगार सेवक/ग्रामपंचायत कर्मचारी याची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करायची आहे.

15 ऑगस्ट रोजी ज्यांनी निस्वार्थपणे देशाची सेवा केली व देशासाठी सर्वोच्च बलिदान दिले. अशा विरांना वंदन करण्यासाठी त्यांच्याबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी स्वातंत्र्य सैनिक, सेवानिवृत्त संरक्षण कर्मचारी, केंद्रीय शस्त्र पोलीस दलाचे कर्मचारी, राज्य पोलीस दलाचे कर्मचारी आणि स्वातंत्र्य सैनिक किंवा त्यांचे कुटूंब यांचा सन्मान करण्यात येणार आहे.

13 ते 15 ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगा हे अभियान राबविण्यात येणार आहे. 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2023 रोजी मागील वर्षीप्रमाणे याही वर्षी प्रत्येक घरोघरी तिरंगा या अभियानाचे योग्य ते नियोजन करुन हर घर तिरंगा फडकविण्यात येणार आहे. हर घर तिरंगा 2.0 मोहिमेअंतर्गत सर्व नागरीकांना घरोघरी राष्ट्रध्वज फडकविण्यात सहभागी होण्यासाठी नागरीकांनी गेल्यावर्षीचे सुस्थितीत शिल्लक असलेले राष्ट्रध्वज वापरावे. तसेच ग्रामपंचायतीकडे जमा असलेल्या राष्ट्रध्वजाचाही वापर करावा. आवश्यकता असल्यास राष्ट्रध्वज विविध ठिकाणी असलेल्या ध्वजविक्री केंद्रातून खरेदी करावे. हर घर तिरंगा अभियानामध्ये शक्यतो घरोघरी महिला, सुन, माता, मुली यांच्या हस्ते ध्वजवंदन करावे.

9 ऑगस्ट रोजी विद्यार्थी, शेतकरी व महिला यांच्यामार्फत शेतातील मुठभर माती जमा करावी. जमा केलेली माती 1 लिटर आकाराच्या तांब्याच्या कलशामध्ये एकत्रित करुन शिलाफलकजवळ कलश पूजन करावे. सायंकाळी हुतात्म्याच्या स्मृतीनिमित्त होणाऱ्या अभिवादन कार्यक्रमात कलश सन्मानपूर्वक ठेवण्यात यावा. 10 ऑगस्ट रोजी कलश सन्मानपूर्वक पंचायत समितीस्तरावरील समन्वयक अधिकारी यांच्याकडे सोपावावा. पंचायत समितीस्तरावर प्रत्येक गावातील आणलेली माती 5 लिटर आकाराच्या तांब्याच्या 2 कलशामध्ये गोळा करावी. या कलशावर तालुका, जिल्हा व राज्याचे नांव पेंट करुन लिहावे. हा मातीचा कलश 12 ऑगस्ट रोजी जिल्हा कक्षाकडे युवकामार्फत पाठविण्यात यावा.

         कार्यक्रमात काढण्यात आलेले शेल्फी फोटो अपलोड करण्याकरीता https://merimaatimeradesh.gov.in या संकेतस्थळावर जावे. त्यानंतर बाजूचे होमपेज दिसेल. वैयक्तिक शेल्फी फोटो अपलोड करावयाचे असल्यास प्रतिज्ञा लेवर क्लिक करुन पुढील येणाऱ्या पेजवर आपले नांव, मोबाईल क्रमांक, राज्य व जिल्हा प्रविष्ठ करावा. व त्यानंतर पुढील पेजवर काढलेला फोटो/शेल्फी अपलोड करावा. माहिती सबमीट केल्यानंतर आपले प्रमाणपत्र प्राप्त होईल.

9 ते 30 ऑगस्ट 2023 दरम्यान मेरी माटी मेरा देश या अभियानात गाव आणि गटस्तरावर स्थानिक शहरी संस्था तसेच राज्य आणि राष्ट्रीयस्तरावरील कार्यक्रमांचा समावेश राहणार आहे. दिल्लीत अमृत वाटीका तयार करण्यासाठी देशाच्या विविध भागातून 7500 कलशांमध्ये माती घेवून अमृत कलश यात्रा काढण्यात येणार आहे. ही अमृत वाटीका “एक भारत श्रेष्ठ भारत” या वचनबध्दतेचे प्रतिक असणार आहे. या अभियानातील विविध उपक्रमांची संबंधित माहिती नसणारे तरुण या संकेतस्थळावर शेल्फी आणि रोपे लावण्यासाठी उपक्रम अपलोड करुन https://yuva.gov.in/meri_maati_mera_desh या पोर्टलव्दारे मोहिमेत सामिल होवू शकतात. ‘मेरी  माटी मेरा देश’ या अभियानात प्रत्येकाने सहभागी होवून देशासाठी प्राणपणाने लढणाऱ्या स्वातंत्र्य सैनिक, भारतीय जवान यांना श्रध्दांजली देण्यासाठी त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एकत्र येऊया आणि म्हणूया “येथे कर माझे जुळती”.                                                                                           

No comments

Powered by Blogger.