Header Ads

अमृत भारत रेल्वे स्टेशन - Amrit Bharat Railway Station : दूरदृश्यप्रणालीद्वारे प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते आधुनिकीकरणाची पायाभरणी - Prime Minister Modi laid the foundation of modernization online

अमृत भारत रेल्वे स्टेशन - Amrit Bharat Railway Station : दूरदृश्यप्रणालीद्वारे प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते आधुनिकीकरणाची पायाभरणी - Prime Minister Modi laid the foundation of modernization online

अमृत भारत रेल्वे स्टेशन : दूरदृश्यप्रणालीद्वारे प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते आधुनिकीकरणाची पायाभरणी 

वाशिम रेल्वे स्टेशनच्या आधुनिकीकरणावर 20 कोटी रुपये होणार खर्च 

वाशिम दि.०६ (जिमाका / www.jantaparishad.com) - अमृत भारत रेल्वे स्टेशन (Amrit Bharat Railway Station) योजने अंतर्गत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज देशातील ५०८ रेल्वे स्थानकांच्या आधुनिकीकरणाची पायाभरणी करण्यात आली.राज्यातील ४४ रेल्वे स्टेशनचे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे.यामध्ये वाशिम रेल्वे स्टेशनच्या आधुनिकीकरणावर 20 कोटी रुपये या योजनेतून खर्च करण्यात येणार आहे.

वाशिम रेल्वे स्टेशन येथे आयोजित कार्यक्रमाला खासदार भावना गवळी, आमदार सर्वश्री ऍड.किरणराव सरनाईक, लखन मलिक, राजेंद्र पाटणी पद्मश्री नामदेव कांबळे, ज्येष्ठ साहित्यिक बाबाराव मुसळे, श्याम बढे, राजू पाटील राजे, महादेव ठाकरे, विजय खानजोडे, नांदेडच्या दक्षिण मध्य रेल्वेचे सहाय्यक विभागीय अभियंता के शंकर, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक सी.जे. फ्रान्सिस, अकोलाचे सहाय्यक विभागीय इंजिनियर डी. शरद बाबू, स्टेशन व्यवस्थापक रामभजन मीणा,मुख्य वाणिज्य निरीक्षक कमलनयन मृणाल यांची प्रमुख उपस्थिती होती.

वाशिम येथील रेल्वे स्थानकाच्या आधुनिकीकरणाचे काम अमृत भारत रेल्वे स्टेशन योजनेतून २० कोटी रुपये निधी खर्च करून करण्यात येणार आहे. सौंदर्यात्मक वास्तुकलांसह रेल्वे स्टेशनच्या दर्शनी भागाला आधुनिक रूप देण्यात येणार आहे.प्रशस्त परिभ्रमण क्षेत्र,सुरळीत प्रवासी वाहतुकीमध्ये सुधारणा,फलाटावर अतिरिक्त कव्हरशेड, आधुनिक प्रवासी प्रतीक्षालय, प्रवासी अनुकूल चिन्हांची तरतूद, वृद्ध व दिव्यांगांसाठी लिफ्ट व सरकते जिन्याची सुविधा, वायफाय सुविधा, वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था,प्रशस्त दुकाने, वैद्यकीय सुविधा येथे उपलब्ध करून दिल्या जातील. रेल्वे स्थानकाच्या या आधुनिकीकरणामुळे पर्यटनाला चालना मिळणार आहे. प्रवाशांची ये-जा सुलभ होऊन रेल्वे प्रवाशांना उत्तम रेल्वे सुविधा उपलब्ध करून देताना रोजगाराच्या संधी वाढतील. तसेच रेल्वे स्टेशनच्या आधुनिकीकरणामुळे या भागातील लोकांच्या सामाजिक व आर्थिक विकासाला गती मिळण्यास मदत होणार आहे.

खासदार भावना गवळी यांनी प्रातिनिधिक स्वरूपात रेल्वे स्टेशनच्या आधुनिकीकरणाची पायाभरणी यावेळी केली.

याप्रसंगी बोलताना श्रीमती गवळी म्हणाल्या,आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून वाशिम रेल्वे स्टेशनचा कायापालट होणार आहे.आता एवढ्यावरच न थांबता आता येथून अयोध्येसाठी रेल्वे सुरू करणे,इथून मुंबईला जाणाऱ्या रेल्वेच्या वेळा कशा बदलता येईल यासाठी प्रयत्न करण्यासोबतच येथून हिंगोली, जालना, संभाजीनगर व जळगावमार्गे मुंबईला नवीन रेल्वे गाडी सुरू करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येत आहे. हा मार्ग ब्रॉडगेज, विद्युतीकरण केल्यामुळे अनेक गाड्या या मार्गाने सुरू करण्याचे नियोजन केले आहे. इंग्रजांच्या ताब्यात असलेल्या शकुंतला रेल्वेचा करार संपला आहे. आता हा रेल्वे मार्ग रेल्वे विभागाकडे आल्यामुळे त्यासाठी देखील विशेष निधी मिळण्यासाठी रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा करण्यात येईल. रेल्वेचे जाळे विणल्याशिवाय आपला विकास होणार नाही. स्थानिक उत्पादित मालाला रेल्वेच्या माध्यमातून थेट दिल्ली व अन्य बाजारपेठेत पोहोचवता येईल. सुविधा देण्याचे काम रेल्वे विभाग करणार आहे. इथल्या फलाटाची लांबी वाढली पाहिजे तसेच या मार्गावरून गाड्यांच्या फेऱ्या वाढल्या पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

आमदार ऍड. सरनाईक म्हणाले, वाशिमच्या रेल्वे इतिहासात आजचा दिवस महत्त्वाचा आहे. वाशिम हे मध्यवर्ती ठिकाण आहे. दळणवळणाची सोय नसताना नॅरोगेज, ब्रॉडगेज, विद्युतीकरण व आता रेल्वे स्टेशनच्या आधुनिकीकरणाला सुरुवात होत आहे. वाशिम रेल्वे स्थानकाच्या आधुनिकीकरणाचा लाभ जिल्ह्यातील जनतेला होणार आहे.रेल्वे स्टेशनला लागून असलेल्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या क्षेत्रात चांगले उद्योगधंदे सुरू करण्यासाठी प्रशासनाची मदत घेतली तर जिल्ह्याच्या उद्योग विकासाला चालना मिळण्यास मदत होणार आहे. असे त्यांनी सांगितले.

 आमदार पाटणी बोलताना म्हणाले, आपली अर्थव्यवस्था जगात पाचव्या क्रमांकावर आहे.आपली अर्थव्यवस्था आगामी २५ वर्षात जगात दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकासाठी स्पर्धेत राहणार आहे. विकासामध्ये सर्वांचा सहभाग आवश्यक आहे. एका व्यक्तीमुळे देशाचा विकास होणार नाही तर त्यासाठी सर्वांचे योगदान महत्त्वाचे आहे. देशाला व राज्याला पुढे नेण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक असल्याचे ते म्हणाले. 

आमदार मलिक म्हणाले, वाशिम रेल्वे स्टेशनचा विकास व्हावा ही सर्वांची इच्छा होती.आजच्या या कार्यक्रमातून इथल्या रेल्वे स्टेशनच्या विकासाला गती मिळणार आहे. आधुनिकीकरणाच्या कामामुळे रेल्वे प्रवाशांना चांगल्या रेल्वे सुविधा येथे उपलब्ध होण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 यावेळी मान्यवरांच्या हस्ते वाशिमच्या शिवाजी महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या निबंध व चित्रकला स्पर्धेतील विद्यार्थ्यांना पुष्प, प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.निबंध स्पर्धेतील सानिका, वानखेडे, वैष्णवी थोरात,ज्ञानेश्वरी वाघ, चित्रकला स्पर्धेतील ऋषीराज श्रृंगारे, निकिता हिरवे व ज्ञानेश्वरी आढाव या विजेत्यांचा समावेश होता. 

प्रास्ताविकातून श्री.फ्रान्सिस यांनी वाशिम स्टेशनच्या आधुनिकीकरणाची माहिती दिली.मोठ्या प्रमाणात रेल्वे प्रवाशांना चांगली सुविधा या स्टेशनवर उपलब्ध होणार आहे. या स्टेशनला वर्षाकाठी दहा कोटीचे उत्पन्न मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. 

कार्यक्रमाचे संचालन प्रा.गजानन वाघ यांनी केले.उपस्थितांचे आभार के. शंकर यांनी मानले.कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती, सुपखेला येथील यशवंतराव चव्हाण सैनिक स्कूल, केंद्रीय विद्यालय,श्री शिवाजी महाविद्यालय तसेच अन्य विद्यालयाचे विद्यार्थी, रेल्वे प्रवासी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडल करेंगे, राम सारसकर,शशिकांत धोपे, मनोहर पुतळे व शुभम भिवंडे यांच्यासह रेल्वेच्या अन्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

No comments

Powered by Blogger.