Header Ads

HCL Tech-Bee : IT professional after HSC - बारावी विज्ञान शाखेचे विद्यार्थी होणार आयटी प्रोफेशनल

HCL Tech-Bee : IT professional after HSC - बारावी विज्ञान शाखेचे विद्यार्थी होणार आयटी प्रोफेशनल


HCL Tech-Bee : Be IT professional after HSC

बारावी विज्ञान शाखेचे विद्यार्थी होणार आयटी प्रोफेशनल

टेक-बी प्रोग्रामसाठी ३८ हजारांहून अधिक नोंदणी

एचसीएल टेक’ कंपनीसोबत महाराष्ट्र समग्र शिक्षाचा सामंजस्य करार

मुंबई दि. 7 : आयटी क्षेत्रात जगभरात अग्रगण्य असणाऱ्या ‘एचसीएल टेक’ कंपनी (HCL Technologies Company) सोबत महाराष्ट्र समग्र शिक्षा मार्फत सामंजस्य करार करण्यात आला आहे. याअंतर्गत राज्य शासनातर्फे ‘महाराष्ट्र यंग लीडर ॲस्पिरेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम (Maharashtra Young Leaders' Aspiration Development Programme : MYLAP) राबविला जात आहे. एचसीएल टेक कंपनीच्या ‘एचसीएल टेक-बी’ (HCL Tech-Bee) या उपक्रमांतर्गत ३८ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून २० हजार विद्यार्थ्यांना स:शुल्क प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

‘एचसीएल टेक-बी’ या उपक्रमांतर्गत बारावी गणित विषय असणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच सहा महिने सःशुल्क प्रशिक्षण व सहा महिने लाइव्ह प्रोजेक्टस् (Six Months Live Project) वर काम करण्याची संधी मिळणार आहे. या सहा महिन्यांच्या आंतरवासिता कालावधीमध्ये दहा हजार रुपये प्रशिक्षण भत्ता (स्टायपेंड) मिळेल. एक वर्षाचे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना आयटी प्रोफेशनल (IT Professional) म्हणून पूर्णवेळ नोकरी, पगार व सोबतच उच्च शिक्षण घेण्यासाठीचेही नियोजन केलेले आहे. विद्यार्थ्यांचे बिटस् पिलानी, शास्त्रा, ॲमिटी, आयआयएम-नागपूर व केएल अशा नामवंत विद्यापीठांमधूनच उच्च शिक्षण पूर्ण केले जाईल. उच्च शिक्षण घेण्यासाठी लागणारा खर्च काही प्रमाणात एचसीएल कंपनी स्कॉलरशीप (HCL company Scholarship) स्वरूपात देणार आहे.

अमरावती, औरंगाबाद, कोल्हापूर, नागपूर, नांदेड व पुणे येथील समग्र शिक्षा अभियान (Samagra Shiksha Abhiyan) व जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागामार्फत घेण्यात आलेल्या मार्गदर्शन व नोंदणी कार्यशाळेमध्ये मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे लवकरच मुंबई, ठाणे, रायगड, नाशिक व इतर ठिकाणी कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहेत.

या उपक्रमासाठी सन २०२३ मध्ये बारावी विज्ञान शाखेमधून किमान ६० टक्के व गणित विषयात ६० गुण मिळविलेले विद्यार्थी www.hcltechbee.com  या संकेतस्थळावर निःशुल्क नोंदणी करू शकतात. यासंदर्भात अधिक माहितीसाठी 7020637271 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन ‘समग्र शिक्षा’चे राज्य प्रकल्प समन्वयक समीर सावंत यांनी केले आहे.

No comments

Powered by Blogger.