Header Ads

Madh Kendra Yojana / Scheme - मध केंद्र योजना


Madh Kendra Yojana / Scheme - मध केंद्र योजना


व्यावसायिक मधपाळ निर्माण करणारी मध केंद्र योजना

Madh Kendra Yojana / Scheme

        मधमाशा पालन हा एक वैशिष्ट्यपूर्ण बहुउद्देशिय उद्योग आहे. मधमाशा पालन उपक्रमास उद्योग म्हणून चालना देण्यासाठी राज्यात राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळा (Maharashtra State Khadi & Village Industries Board) मार्फत मध केंद्र योजना (Madh Kendra Yojana / Scheme) राबविण्यात येत आहे. राज्यातील मध उद्योगाच्या विकासासाठी असणारे पोषक वातावरण लक्षात घेता व्यावसायिक तत्वावर मध उद्योगाचा व्यवसाय करणारे मधपाळ निर्माण करणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.

        मध उद्योग (Honey industry) हा केवळ शेतीपुरक व्यवसाय व जोडधंदा म्हणून न करता एक मुख्य उद्योग म्हणून केल्यास त्यातून ग्रामीण रोजगार निर्मितीला चालना मिळत आहे. मधमाशा पालन योजना (madhmashi palan yojana) महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत राबविण्यात येत असून यासाठी महाबळेश्वर येथे मध संचालनालय कार्यरत आहे. या संचालनालयामार्फत लाभार्थीना प्रशिक्षण देणे, मधमाशा वसाहतींसह मधपेट्या तसेच अन्य साहित्याचे वाटप करणे, मध संकलन करुन त्यावर प्रक्रिया करुन विक्री करणे, ग्रामोद्योगी उत्पादनाची विक्री करणे आदी कामे करण्यात येत आहेत.

केंद्रचालक प्रगतीशील मधपाळ :

        मधमाशापालन योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी राज्यात मोठ्या प्रमाणावर मधमाशांच्या प्रजननाद्वारे वसाहतीची निर्मिती करणे, मधमाशापालन व्यवसाय करू इच्छिणाऱ्या लाभार्थ्याना प्रशिक्षण देणे, प्रशिक्षित लाभार्थ्यांना माशांच्या वसाहती मंडळाने ठरविलेल्या किमतीस उपलब्ध करून देणे, लाभार्थ्यांनी व्यवसाय सुरु केल्यानंतर त्यांना या केंद्रामार्फत वेळोवेळी मार्गदर्शन व सहाय्य करणे या वसाहतीमधून उत्पादीत झालेल्या मधाचे संकलन करणे ही कामे केंद्रचालक मधपाळ यांची असतील.

        मधमाशा वसाहतीचे प्रजनन व पालन करणारे उद्योजक व केंद्रचालक मधपाळ तयार करण्यासाठी सर्वसाधारण उद्योजक संस्था यांच्याकडून खादी व ग्रामोद्योग मंडळ यांच्याकडून जाहिरातीद्वारे अर्ज मागविण्यात येतात. कृषि व फलोत्पादन विभाग, वन विभाग तसेच ग्रामसेवक, विविध कार्यकारी सहकारी ग्रामोद्योग संस्था यांच्यामार्फत मंडळाचे तांत्रिक कर्मचाऱ्यामार्फत योजनेची प्रचार व प्रसिद्धी करुन जास्तीत जास्त लाभार्थीचा सहभागी करुन घेण्यात येत आहे.

वैयक्तिक केंद्रचालक :

        वैयक्तिक केंद्रचालकासाठी अर्जदार किमान दहावी उत्तीर्ण, वय २५ वर्षांपर्यंत असावे. तसेच अशा व्यक्तींच्या नावे अथवा त्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तींच्या नावे किमान एक एकर शेतजमीन किंवा भाडेतत्वावर घेतलेली शेतजमीन, आणि लाभार्थीकडे मधमाशापालन, प्रजनन व मध उत्पादनाबाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता व सुविधा असाव्यात.

संस्था :

        अर्जदार संस्था असल्यास नोंदणीकृत संस्था असावी, संस्थेच्या नांवे मालकीची किंवा दहा वर्षांसाठी भाड्याने घेतलेली कमीत कमी १ एकर शेत जमीन असावी, प्रशिक्षण केंद्र चालविण्यासाठी संस्थेच्या नावे अथवा भाड्याने घेतलेली किमान १ हजार चौ. फूट क्षेत्राची सुयोग्य इमारत असावी.  संस्थेकडे मधमाशापालन, प्रजनन व संघ उत्पादन बाबतीत प्रशिक्षण देण्याची क्षमता असलेले सेवक असावेत.

        लाभार्थी मध उद्योग करणाऱ्या परिसरात मधमाशांना उपयुक्त फुलोरा असणाऱ्या वनस्पती, शेती पिके फळझाडे असणाऱ्या परिसरातील लाभार्थीची निवड करण्यात येईल. केंद्रचालक मधपाळ, संस्था ही मंडळ व मधपाळ शेतकरी यांच्यामधील दुवा म्हणून काम पहाणार आहे. यामध्ये मधपाळांकडून माहिती गोळा करणे, त्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्यांना मार्गदर्शन करणे आदी कामांचा समावेश आहे.

        मधमाशा पालन व्यवसाय करणाऱ्या मधपाळांना त्यांचा व्यवसाय यशस्वी करण्यासाठी सतत मार्गदर्शन करणे आवश्यक असल्याने केंद्रचालकांकडून या मधपाळांना तांत्रिक मार्गदर्शन देण्यात यावे, निष्कासन, मधाची साठवणूक व निगा, मधमाशांची संख्या वाढविणे, वसाहतीचे स्थलांतर करणे आदी बाबीवरील मार्गदर्शन केंद्रचालकांनी करावे.

        वैयक्तिक मधपाळ पात्रतेच्या अटी पुढीलप्रमाणे आहेत :  अर्जदार साक्षर असावा. स्वतःची शेती असल्यास प्राधान्य येईल. अर्जदाराचे वय १८ वर्षापेक्षा जास्त नसावे. अर्जदाराने मंडळाचे मान्यता प्राप्त प्रशिक्षण केंद्रात १० दिवसाचे प्रशिक्षण घेणे अनिवार्य राहील.

केंद्रचालक मधपाळ किंवा संस्थेच्या सभासदास, कर्मचाऱ्यास मध संचालनालय, महाबळेश्वर येथे २० दिवसांचे निवासी प्रशिक्षण देण्यात येते तर मधपाळास मध संचालनालयामार्फत किंवा संचालनालय ठरवेल त्या संस्था, व्यक्तीमार्फत १० दिवसाचे निवासी प्रशिक्षण देण्यात येते.

योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना देण्यात येणारे लाभ: या योजनेअंतर्गत मंडळाकडून देण्यात येणारे पूर्ण अर्थसहाय्य हे साहित्य स्वरुपात असून याअंतर्गत मधपेट्या, मधयंत्रे आदी आवश्यक असणारे साहित्य लाभार्थीस पुरविण्यात येतात. या साहित्याच्या किमतीच्या ५० टक्के रक्कम ही अनुदान स्वरुपात व ५० टक्के रक्कम ही लाभार्थीचा हिस्सा म्हणून कर्जाच्या स्वरुपात देण्यात येते. कर्जाची रक्कम ही मुद्रा योजना अथवा वित्तीय संस्थाकडून लाभार्थ्यास उपलब्ध करून देण्यात येते. अथवा रोखीने स्वगुंतवणूक म्हणून भरता येईल. मंडळामार्फत ज्या लाभार्थ्यांना मध उद्योगाचे प्रशिक्षण प्रमाणपत्र देण्यात आलेले आहे ते वित्तीय संस्थाकडून कर्ज घेण्यास पात्र असतील.

- संकलन : जिल्हा माहिती कार्यालय, धुळे

No comments

Powered by Blogger.