Header Ads

लघु तृणधान्य - बर्टी : ओळख आणि महत्त्व - Barnyard Millet : Introduction & Importance in Marathi

लघु तृणधान्य - बर्टी : ओळख आणि महत्त्व - Barnyard Millet : Introduction & Importance in Marathi


लघु तृणधान्य - बर्टी : ओळख आणि महत्त्व

Barnyard Millet : Introduction & Importance in Marathi

        कृषि क्षेत्राच्या विकास कार्यात लघु तृणधान्य पिके (राळा, वरई, बर्टी, नाचणी, कोडो, बाजरी व इतर ) बऱ्याच प्रमाणात दुर्लक्षितच राहिली होती. परंतु या पिकांतील पौष्टिक मूल्यांचा विचार करता सद्यपरिस्थितीत उत्तम आरोग्यासाठी आणि आहारविषयक जनजागृतीमुळे या पिकाचे महत्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. या सर्व गोष्टींचा विचार करता केंद्र शासनाने राळा, नाचणी, बर्टी, कोडो, बाजरी आणि ज्वारी इ. पिकांचा त्याच्यातील पौष्टिक गुणधर्मामुळे पौष्टिक तृणधान्य (Nutri Cereals) या वर्गात समावेश करुन अधिसूचित केले आहे.

            येणाऱ्या काळात सर्व जनतेला जुन्या पिढीतील लोकांप्रमाणेच आरोग्य संपन्न, पौष्टिक शाकाहार उत्तमरित्या मिळण्याकरिता या दुर्लक्षित झालेल्या पौष्टिक तृणधान्य पिकांची ओळख आणि महत्व ( Introduction and Importance) घेऊन सुधारित पद्धतीने लागवड करुन उत्पादकता वाढवणे ही काळाची गरज आहे.

बर्टी (Barnyard Millet) in marathi, hindi, gurjrati 

        बर्टी या पिकास सावा, शमुल, सावऱ्या या नावानेही ओळखतात. इंग्रजीमध्ये याला बार्नयार्ड मिलेट म्हणतात. गुजरात – सया, हिंदी – झंगोरा, तमिल – कुधिरवालि तर कन्नडमध्ये ओडलु या नावाने बर्टी परिचित आहे.

        बर्टी हे एकदल वर्गातील पीक असून वाणानुसार 50-130 सें.मी. सरळ उंच वाढते. पिकास 4-7 फुटव्याची  संख्या असते. पाने गवताच्या पात्याप्रमाणे असून बारिक लव पानावर असते. हे पीक दुष्काळजन्य तसेच अतिपर्जन्यमान असलेल्या भागात तग धरुन राहते. बर्टी या लघु पौष्टीक तृणधान्याची लागवड धान्य आणि चारा अशा दुहेरी उददेशासाठी केली जाते. भारतात उत्तराखंड, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, आसाम, ओरिसा, तमिलनाडु, गुजरात आणि महाराष्ट्रात लागवड केली जाते. भारतात 0.93 लाख हेक्टर क्षेत्र या पिकाखाली असून 0.73 लाख टन उत्पादन मिळते. सरासरी उत्पादकता 758 किलो प्रति हेक्टर एवढी आहे.

        उपवासासाठी बर्टीचा वापर भाताप्रमाणे शिजवून केला जातो. नवरात्रीमध्ये तसेच इतर उपवासाच्या दिवशी पचन्यास हलके अन्न पदार्थ म्हणूनही अनेकांची पसंती बर्टी भगरीला असते.

आहारातील महत्त्व :

धान्याचे पोषण मुल्यद्रव्ये प्रति 100 ग्रॅम मध्ये प्रथिने         6.3, स्निग्ध पदार्थ 2.2, कार्बोदके 65.5, तंतुमय पदार्थ 9.8,    खनिज द्रव्ये   4.4, झिंक 3.0 मि.ग्रॅ., लोह 15.0 मि.ग्रॅ.,  फॉस्फरस 280 मि.ग्रॅ., नियासिन 4.20 मि.ग्रॅ. असे आहे.

        बर्टी धान्य हे प्रथिनाचा चांगला स्त्रोत असून हे प्रथिने सहज पचण्याजोगे आहेत. पिष्टमय पदार्थाचे प्रमाण कमी असून शरीरात त्यांचे सावकाश पचन होत असल्यामुळे आधुनिक जीवनशैलीत कमी श्रमाचे किंवा बैठे काम करणाऱ्यांसाठी बर्टी धान्य वरदान आहे. यातील नियासिन घटकामुळे त्वचेचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. बर्टी धान्यात असलेल्या लिनोलिक, पाल्मेटिक आणि ओलिक या असंपृप्त स्निग्धाम्ले मुळे हृदयरोग व मधुमेहासाठी उपयुक्त आहार. रक्तातील साखरेची आणि लिपीडची पातळी कमी करण्यासाठी बर्टीचे सेवन प्रभावी ठरते. बर्टी धान्य ग्लुटेनमुक्त असल्यामुळे ग्लुटेनची ॲलर्जी असणाऱ्यांना उपयुक्त आहार आहे.

सुधारित लागवड तंत्रज्ञान :

जमीन : हलकी ते मध्यम जमीन उपयुक्त. पाणी धरुन ठेवण्याची क्षमता उत्तम.

हवामान : उष्ण व समशितोष्ण प्रदेशात येणारे पीक. समुद्रसपाटीपासून 2700 मी. उंचीपर्यंतच्या भागात पीक लागवड वार्षिक पर्जन्यमान 200 ते 400 मिमि आवश्यक.

हंगाम : खरीप हंगाम.

पेरणी : बर्टीची लागवड पेरणी पद्धतीने केली जाते. जास्त पावसाच्या प्रदेशात रोप लागवड करतात.

पेरणी अंतर :  30 सें.मी. x 10 सें.मी.

बियाणे : 3 ते 4 कि. प्रति हेक्टरी.

आंतर पिक पद्धती : बर्टी + राजमा (4 : 1) प्रमाणात फायदेशीर.

पिक संरक्षण : खोड माशीचा प्रादूर्भाव पीक सहा आठवड्याचे झाल्यापासून जास्त होतो. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला जास्त प्रमाणात दिसतो. क्विनॉलफॉस 2 मिली प्रति लिटर या प्रमाणात फवारावे. मावा आणि लष्करी अळीसाठी क्लोरोपायरिफॉस 50 टक्के प्रवाही 20 मिली प्रति 10 लिटर पाण्यात सायंकाळच्या वेळेस फवारावे.

काढणी व मळणी : पक्व झालेले पीक जमिनीलगत कापावे किंवा वाळलेली कणसे पीक उभे असताना कापावे. उन्हामध्ये वाळवून बडवावे किंवा मशिनद्वारे मळणी करुन स्वच्छ धान्य उन्हात वाळवून साठवण करावी.

उत्पादन

  1. धान्य – 18 – 20 क्विंटल प्रति हेक्टरी.
  2. कडबा – 20 – 25 क्विंटल प्रति हेक्टरी.


- डॉ. दिनेश गोपीनाथ कानवडे, - डॉ. चंद्रकांत पंढरीनाथ जायभाये,
कृषि संशोधन केंद्र, बुलडाणा.

***********************************************************************************
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
***********************************************************************************

No comments

Powered by Blogger.