Header Ads

प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या हस्ते आभासी पद्धतीने वाशीम येथील आकाशवाणी रिले केंद्राचे उद्घाटन - Akashwani FM Radio Station Centre Washim Inauguration by PM

प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या हस्ते आभासी पद्धतीने वाशीम येथील आकाशवाणी रिले केंद्राचे उद्घाटन - Akashwani FM Radio Station Centre Washim Inauguration by PM


 प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या हस्ते आभासी पद्धतीने वाशीम येथील आकाशवाणी रिले केंद्राचे उद्घाटन

 सर्वसामान्यांना योजनांसह विविध माहिती मिळण्यास मदत होणार -  खासदार भावना गवळी

            वाशिम दि.२८ (जिमाका / www.jantaparishad.com) - आकाशवाणीच्या या रिले केंद्राची रेंज संपूर्ण जिल्ह्यात मिळाली पाहिजे. कमी अंतर संपविले पाहिजे. आकाशवाणीच्या माध्यमातून शेतकरी,युवक,महिला व सर्वांनाच आकाशवाणीवरून वेगवेगळ्या योजनांच्या माहितीसह इतरही माहिती मिळण्यास मदत होणार आहे. असे प्रतिपादन खासदार भावना गवळी यांनी केले.


   आकाशवाणी‌ मुंबई केंद्राच्या विविध भारतीचे कार्यक्रम वाशीम जिल्ह्यातील श्रोत्यांना व्यवस्थित ऐकायला मिळावे. यासाठी वाशीम येथील दूरदर्शनच्या पुर्व लघु प्रक्षेपण केंद्राच्या परिसरात आकाशवाणीचे एफ.एम.ट्रान्समीटर (100 वॅट) प्रक्षेपण केंद्र (Akashwani FM Radio Station Centre Washim) उभारण्यात आले.या रिले केंद्राचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आभासी पद्धतीने आज उद्घाटन करण्यात आले.वाशिम येथे आयोजित  कार्यक्रमाला खासदार भावना गवळी,आमदार ऍड.किरणराव सरनाईक,आमदार लखन मलिक, माजी आमदार ऍड.,विजय जाधव, सहायक जिल्हाधिकारी मिन्नू पी.एम.,ज्येष्ठ पत्रकार माधवराव अंभोरे व दिलीप जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती.

                 श्रीमती गवळी म्हणाल्या, अनेक  क्षेत्रातील व्यक्तींच्या मुलाखती या केंद्रावरून प्रसारित झाल्यास त्याचा उपयोग सर्वसामान्य व्यक्तीला होणार आहे.श्रोत्यांच्या मागणीनुसार कार्यक्रमाचे प्रसारण या केंद्रातून झाले पाहिजे.या प्रक्षेपण केंद्राची रेंज नक्कीच वाढवण्यात येईल.जिल्ह्यात पासपोर्ट ऑफिस झाले पाहिजे, यासाठी पत्रव्यवहार केला आहे. जिल्हा आकांक्षित आहे.जिल्ह्यातील नागरिकांच्या आकांक्षा बऱ्याच आहेत. त्या पूर्ण झाल्या पाहिजे यासाठी आपण संसदेत वेळोवेळी सातत्याने विविध विषयाच्या माध्यमातून मागणी करत असल्याचे त्यांनी सांगितले.

           आमदार मलिक म्हणाले,हे रिले केंद्र सुरू झाले ही जिल्ह्यासाठी निश्चितच आनंदाची बाब आहे. सर्वप्रथम आपण आमदार झालो असताना काही मित्र व कार्यकर्ते यांनी टीव्ही टॉवरची मागणी केली होती. आमदार म्हणून निवडून आल्यानंतर तत्कालीन खासदार स्वर्गीय भाऊसाहेब फोन कर यांच्या माध्यमातून ही मागणी वाशिम साठी मंजूर करून घेतली नागरिकांनी या केंद्राचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले   

         आमदार ऍड.सरनाईक म्हणाले, सर्वसामान्य माणूस देखील आकाशवाणीचा श्रोता आहे.आजच्या धकाधकीच्या जीवनात अनेक प्रकार माणसाला अनुभवाला येतात.कुठेतरी माणसाला विरंगुळ्याचे असला पाहिजे. रेडिओ हे आजही दुर्गम भागात करमणुकीचे साधन म्हणून बघितले जाते.आजच्या डिजिटल युगात रेडिओचे महत्त्व ओळखून प्रधानमंत्री मोदी यांनी देशातील ८५ जिल्ह्यात ९१ केंद्र आज सुरू केले आहे.

              अनेक व्यक्तींना अनेक प्रकारचे छंद असतात. रेडिओच्या माध्यमातून देशातील दुर्गम भागात देश व विदेशातील घटना पोहोचवण्याचे काम आजही केले जाते.जिल्ह्यातील नागरिकांना एक करमणुकीचे व माहिती मिळण्याचे साधन या केंद्राच्या माध्यमातून उपलब्ध झाल्याची श्री.सरनाईक यांनी सांगितले. 

                 श्री.जाधव म्हणाले, वाशिमच्या श्रोत्यांना आकाशवाणीचे दर्जेदार कार्यक्रम या केंद्रामुळे ऐकायला मिळतील.एवढेच नाही तर कार्यक्रमात देखील सहभागी होता येईल.आकाशवाणीच्या माध्यमातून आपणाला दूरपर्यंत पोहोचता येते. या केंद्रामुळे जिल्ह्यातील कलावंत तसेच विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना एक व्यासपीठ या माध्यमातून उपलब्ध झाले आहे. आकाशवाणी प्रत्येकाच्या मनामनात आहे.आकांक्षित असलेला वाशिम जिल्हा पुढे येत आहे.या जिल्ह्याला पुढे नेण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे.प्रामाणिकपणे जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील व्यक्तींनी काम केले तर जिल्ह्याला आकांक्षीत म्हणून लागलेला डाग पुसला जाईल.

            श्री. अंभोरे म्हणाले,पूर्वी रेडिओला महत्त्व होते. ते आजही आहे.आता ते आणखी वाढले पाहिजे. प्रधानमंत्री मोदी यांनी आज केलेल्या उद्घाटनावरून त्याचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.वाशीम या आकांक्षीत जिल्ह्याला या निमित्ताने एक चांगली सुविधा उपलब्ध झाली आहे. केंद्र सरकारने वाशिमसारख्या मागास जिल्ह्याकडे या माध्यमातून लक्ष दिले असल्याचे ते म्हणाले.    

         यावेळी श्री.जोशी,रेडिओ श्रोता संघाचे अध्यक्ष किशोर रंधवे,पी.टी. निरगुडकर यांनीही मनोगत व्यक्त केले.

        प्रास्ताविक सहाय्यक अभियंता श्रीकृष्ण गावंडे यांनी केले. संचालन दिगंबर घोडके यांनी तर आभार आकाशवाणीचे जिल्हा वार्ताहर सुनील कांबळे यांनी मानले.    

              कार्यक्रमाला आकाशवाणी केंद्र अकोला व वाशीम येथील अधिकारी,कर्मचारी तसेच श्रोत्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.  कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वाशिम आकाशवाणी केंद्र प्रभारी अशोक काळे,सहाय्यक अभियांत्रिकी सचिन कोकणे,तंत्रज्ञ तसलीम खान,सुनील कांबळे,दूरदर्शनचे प्रतिनिधि राम धनगर यांनी परिश्रम घेतले.

No comments

Powered by Blogger.