Header Ads

जि.प. सिईओ श्रीमती वसुमना पंत यांचे आवाहन - Appeal by Vasumana Pant (IAS) ZP CEO Washim



महिला बचत गटांनी उत्पादीत केलेल्या तीन दिवसीय विभागीय प्रदर्शन व विक्रीचा जिल्हावासियांनी लाभ घ्यावा

जि.प. सिईओ श्रीमती वसुमना पंत यांचे आवाहन 

पत्रकार परिषदेत वर्‍हाडी जत्रेची दिली माहिती

            वाशिम दि/18 - विभागीय आयुक्त कार्यालय अमरावती व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जि.प. वाशिमच्या संयुक्त विद्यमाने येत्या १८ ते २० मार्च पर्यत स्थानिक जिल्हा क्रीडा संकुल मैदानावर होवू घातलेल्या महिला बचत गटांनी उत्पादीत केलेल्या वस्तु व खाद्यपदार्थाच्या भव्य विभागीय प्रदर्शन व विक्री अर्थात वर्‍हाडी जत्रेला जिल्हावासीयांनी बहूसंख्येने भेट देवून लाभ घेण्याचे आवाहन जि.प. सिईओ श्रीमती वसुमना पंत (ZP Washim CEO (IAS) Vasumana Pant) यांनी केले.

  १६ मार्च रोजी जिल्हा परिषदेच्या सभागृहात आयोजित पत्र परिषदेत त्यांनी पत्रकारांना या उपक्रमाची सविस्तर माहिती दिली. यावेळी जि.प.चे अति. मुख्य कार्यकारी अधिकारी सुनिल निकम, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक किरण गणेश कोवे, राम श्रृंगारे आदींची उपस्थिती होती.

  पुढे बोलतांना श्रीमती पंत म्हणाल्या की, महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तू, मालाला व्यासपिठ उपलब्ध करून देणे, बचत गटांची उत्पादने अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचविणे, सांस्कृतिक विरंगूळा साधण्यासाठी या उद्देशातून ही प्रदर्शनी ठेवण्यात आली आहे. या प्रदर्शनीत महिला बचत गटाचे १०० स्टॉल, सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवाणी आणि बच्चे कंपनीसाठी घसरगुंडीही राहणार आहे. विभागातील पाचही जिल्ह्यातील बचत गटांचा सहभाग राहणार आहे. पालकमंत्री संजय राठोड यांच्याहस्ते प्रदर्शनीचे उद्घाटन होणार आहे. अध्यक्षस्थानी जि.प. अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे राहतील. तर प्रमुख अतिथी म्हणून अमरावतीचे विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय, जि.प. उपाध्यक्ष चक्रधर गोटे, महिला व बालकल्याण सभापती श्रीमती वैशाली लळे, अर्थ व बांधकाम सभापती सुरेश मापारी, कृषी व पशुसंवर्धन सभापती वैभव सरनाईक, समाजकल्याण सभापती अशोक डोंगरदिवे यांची उपस्थिती राहील.

  प्रदर्शनीदरम्यान लहान मुलांना खेळण्यासाठी घसरगुंडी आणि उड्या मारण्यासाठी जम्पींग जाळीही राहणार आहे. पहिल्या दिवशी बंजारा सांस्कृतिक नृत्य, सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत गोंधळ, पोतराज, वासुदेव यांच्या भूमिकेत कार्यक्रमांची धमाल, सायंकाळी ६ ते ८ विनोद कार्यक्रम आणि रात्री ८ ते १० या वेळेत पंकजपाल महाराजांचे समाजप्रबोधनपर किर्तन राहणार आहे. दुसर्‍या दिवशी १९ मार्च रोजी भारूड, पोवाडा, लोकगित, एकांकिका, दिव्यांग कलावंत आर्केष्ट्रा व रात्री ८ ते १० या वेळेत सप्तखंजिरीवादक डॉ. रामपाल महाराज यांचे समाजप्रबोधनपर कीर्तन होणार आहे. शेवटच्या दिवशी २० मार्च रोजी सकाळी १०.३० ते ११ या वेळेत सांस्कृतिक कार्यक्रम, सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत अ‍ॅड. दिपाली सांबर (श्रृंगारे) यांचे व्याख्यान आणि दुपारी २ वाजतानंतर उत्कृष्ट बचत गटांचा सत्कार व प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमाने तीन दिवशीय प्रदर्शनीचा समारोप होईल. अशा प्रकारचे विभागीय प्रदर्शन वाशिम जिल्ह्यात पहिल्यांदाच होत आहे. त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा पुर्ण उत्साहाने कामाला लागली आहे. या भव्य सरस प्रदर्शनीचा जिल्हावासीयांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्रीमती पंत यांनी पत्रपरिषदेत बोलतांना केले.

प्रदर्शनीमध्ये बचत गटांचे १०० स्टॉल

  विभागीय प्रदर्शनीमध्ये बचत गटांचे एकुण १०० स्टॉल राहणार आहेत. यापैकी ८० स्टॉल हे बचत गटांनी तयार केलेल्या हस्तकला व शोभेच्या वस्तु, विविध प्रकारची पापड, लोणचे, उच्च दर्जाचे बेसन लाडू, पिठाची खारीक, शेवगा पावडर यांसह अन्य वस्तूंचे तर २० स्टॉल हे खाद्य पदार्थाचे राहणार आहेत. एकुण १०० पैकी ६० स्टॉल हे वाशिम जिल्ह्यातील बचत गटाचे आणि प्रत्येकी १० या प्रमाणात ४० स्टॉल हे इतर चार जिल्ह्यांतील राहणार आहेत.

No comments

Powered by Blogger.