आपला वाचक क्रमांक -

दर्पण दिनानिमित्त विशेष लेख - दर्पण : परिवर्तनाचे शास्त्र व शस्त्र - आद्य संपादक बाळशास्त्री जांभेकर - Patrakar / Darpan Din Lekh

दर्पण दिनानिमित्त विशेष लेख - दर्पण : परिवर्तनाचे शास्त्र व शस्त्र - आद्य संपादक बाळशास्त्री जांभेकर  - Patrakar / Darpan Din Lekh


Darpan Din Lekh

दर्पण दिनानिमित्त विशेष लेख

दर्पण : परिवर्तनाचे शास्त्र व शस्त्र 

आद्य संपादक बाळशास्त्री जांभेकर

 समाज सुधारला तरच राजकीय स्वातंत्र्याला अर्थ प्राप्त होईल असे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे मत होते. सार्वजनिक जीवनात विचारमंथन करण्यासाठी वर्तमानपत्रासारखी मोठी शक्ति आहे. तिचा उपयोग समाज बदलासाठी होऊ शकतो, याचा बाळशास्त्री जांभेकरांना अभ्यास होता. त्यामुळेच त्यांनी तत्कालीन चुकीच्या रुढी परंपरांवर प्रहार केला. धार्मिक व सामाजिक सुधारणांबाबत बाळशास्त्री  हे प्रगमनशील व्यवहारवादी होते. म्हणूनच त्यांनी दर्पणला समाज परिवर्तनाचे शास्त्र व शस्त्र म्हणून वापरले. जांभेकरांनी मुंबई येथे ६ जानेवारी १८३२ रोजी दर्पण या इंग्रजी आणि मराठी भाषेतील पाक्षिकाची सुरूवात करून मराठी वृत्तपत्राची मुहूर्तमेढ रोवली. दर्पण दिनानिमित्त विशेष लेख.. (Patrakar / Darpan Din Lekh )

६ जानेवारी १८३२ रोजी दर्पण हे पाक्षिक सुरु करुन मराठी वृत्तपत्र युगाची जी मुहूर्तमेढ बाळशास्त्रींनी रोवली. आज त्या घटनेस १९१ वर्षे पूर्ण झाली. त्यांच्या या महान कार्याची आठवण म्हणून प्रतिवर्षी ६ जानेवारी रोजी राज्यात ‘दर्पण दिन’ साजरा करण्यात येतो.

बाळशास्त्रींनी त्याकाळी सुरु झालेल्या मुद्रणालयाचा यथार्थ उपयोग करून घेतला आणि दर्पणरुपी ज्योत समाजप्रबोधनासाठी तेवत ठेवली. दर्पणच्या माध्यमातून त्यांनी शिक्षण व मनोरंजन यांचा समन्वय साधला. दर्पण हे इंग्रजी विद्येचा मराठी सार सांगणारे ठरले. २५ जून १८४० यावर्षी दर्पणचा शेवटचा अंक प्रकाशित झाला. मराठीतील आद्यसंपादक होण्याचा बहुमान जांभेकरांना मिळाला. दर्पण वृत्तपत्राची निर्मितीच नव्हे तर समाजसुधारणेचे कार्यही बाळशास्त्रींनी केले. किंबहुना सामाजिक सुधारणेच्या बाबतीत ते आग्रही होते.

सामाजिक सुधारणेवर भर

आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी समाजसुधारणा, शिक्षण आणि वृत्तपत्र प्रसारासाठी केलेले कार्य हे अलौकिक असे आहे. त्यांच्या या कार्याचा सन्मान म्हणून मुंबईचे तत्कालीन गर्व्हनर सर जेम्स कॉर्नोक यांनी १८४० यावर्षी जस्टीस ऑफ पीस अशी पदवी देऊन बाळशास्त्रींचा गौरव केला. आज वर्तमानपत्राची भव्यता पाहता झालेली प्रगती लक्षात येते. परंतु त्याकाळी अत्यंत बिकट स्थितीमध्ये वर्तमानपत्र चालविण्याचे कार्य बाळशास्त्रींनी केले. बाळशास्त्रींबद्दल न्यायमूर्ती ना. ग. चंदावरकर यांनी म्हटले आहे की, “बाळशास्त्री अव्वल इंग्रजी अंमलातील एक थोर विद्वान तसेच ज्ञानाच्या विविध क्षेत्रात लिलया संचार करणारे पंडित होते. न्यायमूर्तींचे उपरोक्त विधान बाळशास्त्रींच्या शैक्षणिक कार्याचे संक्षिप्त वर्णन आहे. तर आचार्य अत्रे यांनी बाळशास्त्रींबद्दल खूपच महत्त्वपूर्ण अशी टिपणी केली आहे. ते लिहितात की, बाळशास्त्री हे बोलके नव्हे तर कर्ते सुधारक होते. केवळ प्राध्यापक म्हणून अध्ययनच न करता बाळशास्त्रींनी आपल्या दर्पण मधून सामाजिक सुधारणेवर भर दिला. मुंबई महानगरीच्या सामाजिक व सांस्कृतिक जीवनामध्ये त्यांनी मोलाची भर टाकली, असेही अत्रे यांनी म्हटले आहे.

लोककल्याण आणि लोकशिक्षण

वृत्तपत्रांचा इतिहास हा जनतेचा आणि चळवळींचा इतिहास असतो. वृत्तपत्रे सामाजिकीकरणाच्या प्रक्रियेला गती देतात. त्याद्वारे लोकांना सामाजिक संकेत, कार्यात्मक भूमिका आणि मूल्य याबाबतचे शिक्षण दिले जाते, असे सुप्रसिध्द माध्यम तज्ज्ञ ए. ए. बेर्जर यांनी म्हटले आहे. त्यानुसार जांभेकरांनी केवळ लोककल्याण आणि लोकशिक्षण असाच उदात्त हेतू नजरेसमोर ठेऊन ‘दर्पण’ प्रकाशित केले. १८३२ चा काळ, अर्थातच इंग्रजांच्या अधिपत्याचा काळ होता. राष्ट्रभक्तीसाठी समाजास प्रबोधनाची मोठी गरज होती. इंग्रजांच्या हातात आपले राष्ट्र असताना आपल्या मनात राष्ट्रप्रेमाची भावना जागृत करुन, परिस्थितीची जाणीव करुन देण्यासाठी एखादे वृत्तपत्र असावे, असे बाळशास्त्रींना वाटले आणि त्यांनी दर्पण सुरु केले. ‘दर्पण’मध्ये एकही जाहिरात त्यांनी छापली नाही. अगदी स्वत:चे पैसे टाकून सुमारे आठ वर्षे लोकांसाठी वृत्तपत्र सुरु ठेवले. भाऊ महाजन यांच्या सहकार्याने मराठी तर स्वत: इंग्रजी मजकुराची बाजू ते ‘दर्पण’साठी सांभाळत. त्यामुळे ‘दर्पण’ मधील मजकुराचा दर्जा उच्च होता.

पहिले प्रपाठक – शिक्षणसंचालक

वयाच्या ११व्या वर्षी संस्कृतचे शिक्षण पूर्ण करुन जांभेकरांनी मुंबई गाठली होती. मुंबईत इंग्रजी भाषेचा सखोल अभ्यास करुन त्यांनी विविध विषयांचे ज्ञान मिळविले. या ज्ञानाचा उपयोग आपल्या समाजाला कसा होईल याकडे त्यांचा ओढा होता. जांभेकरांनी सतत परिश्रम करुन त्याकाळच्या जवळपास नऊ देशी – विदेशी भाषा आत्मसात केल्या होत्या. तसेच भारतातील पहिले प्रोफेसर म्हणजे प्रपाठक होण्याचा बहुमान १८३४ यावर्षी बाळशास्त्रींना मिळाला. पुढे ते १८४५ यावर्षी ते शिक्षण विभागाचे संचालक झाले. त्यांनी विविध विषयांवर ग्रंथ लिहिले. यात प्रामुख्याने भूगोल,इतिहास, भौतिकशास्त्र, गणित,  खगोलविद्या, मानसशास्त्र आदी विषयांचा समावेश आहे. सोप्या आणि साध्या मराठी भाषेत सर्वांना समजतील, असे हे ग्रंथ आहेत. याच बरोबर त्यांनी बालव्याकरण, भूगोलविद्या, सारसंग्रह आणि नीतीकथा हे चार ग्रंथ लिहिले आहेत. एलिफिन्स्टनकृत हिंदुस्थानाच्या आधारे त्यांनी इतिहास रचला. हिंदुस्थानचा प्राचीन इतिहास हा ग्रंथ १८५१ यावर्षी त्यांच्या निधनानंतर प्रसिद्ध झाला. बाळशास्त्री त्यांच्या विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय होते. त्यांचा शिष्यांच्या यादीत दादाभाई नौरोजी, डॉ. भाऊ दाजी, नारायण दाजी, प्रा. केरो लक्ष्मण छत्रे, डॉ. आत्माराम पांडूरंग, नाना नौरोजी, नौरोजी बेहरामजी, रामचंद्र बाळकृष्ण, वासुदेव पांडूरंग, अर्देसर फ्रान्सिस मूस, दफ्तदार केशवराव नरसिंह आदी मान्यवरांचा समावेश आहे.

आद्य संपादक, समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ अशा बहुआयामी व्यक्त‍िमत्त्वाचे ते धनी होते. आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी त्याकाळी केलेल्या कष्टाची जाणीव निश्चितच आजची माध्यम क्रांती पाहून होते. त्यांच्या या महान कार्यास शतश: प्रणाम…

– डॉ. राजू पाटोदकर,

उपसंचालक (माहिती), पुणे विभाग, पुणे

Share on Google Plus

About Janta Parishad

    Blogger Comment
    Facebook Comment

Translate : हिंदी - ENGLISH - Other