Header Ads

सामाजिक न्याय पर्वानिमित्त प्रसारमाध्यम प्रतिनिधींची कार्यशाळा संपन्न - Workshop for washim media representatives concluded on the occasion of Social Justice Day

District Information Officer DIO Vivek Khadse


सामाजिक न्याय पर्वानिमित्त  “ सामाजिक न्याय विभागाची नवी दिशा ” या विषयावर प्रसारमाध्यम प्रतिनिधींची कार्यशाळा संपन्न

        वाशिम, दि. 29 (जिमाका) : 26 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर या कालावधीत सामाजिक न्याय पर्व साजरे करण्यात येत आहे. सामाजिक न्याय पर्वाचे औचित्य साधून आज 29 नोव्हेंबर रोजी सामाजिक न्याय भवनातील सभागृहात सामाजिक न्याय विभागाची नवी दिशा या विषयावर प्रसारमाध्यम प्रतिनिधींची कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे  होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष माधवराव अंभोरे, पत्रकार नंदकिशोर नारे, राम धनगर, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या उपायुक्त डॉ. छाया कुलाल व समाज कल्याणचे सहायक आयुक्त मारोती वाठ यांची उपस्थिती होती.


            प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पुजन करुन दिप प्रज्वलन करण्यात आले. अध्यक्षस्थानावरुन बोलतांना श्री. खडसे म्हणाले, राज्यातील मागास व वंचित घटकांच्या कल्याणासाठी समाज कल्याण विभाग काम करतो. मागासवर्गीय घटकांच्या कल्याणासाठी अनेक योजना आहेत. यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, कन्यादान योजना, शिष्यवृत्ती योजना, दादासाहेब गायकवाड स्वाभिमान व सबलीकरण योजनांसह अनेक योजना आहेत. या योजनांच्या लाभातून या घटकातील शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, महिला व लाभार्थ्यांचे मागासलेपण दूर करुन त्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्याचे काम करण्यात येते. हया सर्व योजनांची माहिती लाभार्थी, समाज घटक व नागरीकांपर्यंत पोहोचविण्याचे महत्वपूर्ण काम प्रसारमाध्यमे प्रभावीपणे करतात. योजनांच्या लाभातून मिळालेले यश यशोगाथेच्या माध्यमातून मांडून इतरांसाठी प्रेरणादायी ठरणाऱ्या त्या योजनांचा लाभ इतरही लाभार्थ्यांनी घेण्यासाठी यशोगाथा प्रोत्साहन देण्याचे काम करतात. जिल्हयात समाज कल्याण विभागाच्या योजनांची माहिती लाभार्थी व नागरीकांपर्यंत पोहोचविण्याचे महत्वपूर्ण जबाबदारी प्रसारमाध्यमे पार पाडत असून शासनाच्या विविध विभागांना माध्यमांचे चांगले सहकार्य मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

            श्री. अंभोरे म्हणाले, शासकीय कार्यालये आणि पत्रकार हा महत्वाचा दुवा आहे. हा दुवा कायमस्वरुपी आहे. प्रत्येक कार्यालये आणि पत्रकार यांचा संबंध येतो. शासनाच्या योजनांची प्रसिध्दी देण्यासोबतच शासनाच्या विविध योजनांची माहिती नागरीकांपर्यंत पोहोचविण्याचे काम प्रसारमाध्यमे करतात. सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाकडे असलेल्या योजनांची माहिती माध्यमे समाजातील शेवटच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम प्रभावीपणे करीत आहे. आजचे युग हे डिजीटल मिडियाचे आहे. काही वर्षापूर्वी वृत्तपत्रांना बातम्या पाठविणे हे खर्चीक व वेळेचे काम होते. आज माध्यमांना बातम्या पाठविणे सुलभ आणि सोपे झाले आहे. आज समाजमाध्यमातून देखील बातम्या देणे, ब्रेकींग न्युज देऊन लवकर लोकांपर्यंत पोहोचविणे सोपे झाले असल्याचे ते म्हणाले.

            श्री. नारे म्हणाले, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या योजना लोकाभिमूख करण्यात प्रसारमाध्यमांची महत्वाची भूमिका आहे. लाभार्थ्यांना व नागरीकांना या विभागाच्या विविध योजनांची माहिती लाभार्थ्यांना व्हावी यासाठी या पुढेही व्यापक प्रसिध्दीचे काम प्रसारमाध्यमे करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

        श्री. धनगर म्हणाले, समाज कल्याण ‍विभागाच्या विविध लोक कल्याणकारी योजना आहेत. हया योजना लोकांपर्यंत तसेच लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात प्रसारमाध्यमांचा मोलाचा वाटा आहे. समाज कल्याणच्या योजना लोकाभिमूख करण्यात प्रसारमाध्यमांची भूमिका महत्वाची आहे. लाभार्थ्यांना योजनांची माहिती झाल्यास ते निश्चितपणे त्या योजनांचा लाभ घेऊन आपले जीवनमान निश्चितपणे उंचावतील असे ते म्हणाले.

        श्रीमती डॉ. कुलाल म्हणाल्या, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र वेळेत उपलब्ध करुन देण्यासाठी मंडणगढ पॅटर्ननुसार जिल्हयात काम करीत आहे. महाविद्यालयात जाऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरबाबत देखील मार्गदर्शन करण्यात येते. यासाठी बार्टीच्या समतादूतांची मदत घेण्यात येते. मंडणगढ पॅटर्ननुसार इयत्ता 1 ली ते 10 वीच्या विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र काढण्यासाठी प्रेरीत करण्यात येते. हे प्रमाणपत्र महसूल विभागाकडून काढण्यात येते. इयत्ता 11 वी आणि 12 वीच्या विज्ञान शाखेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक भविष्यासाठी जात वैधता प्रमाणपत्र आवश्यक असते. जिल्हयातील प्रसारमाध्यमे पडताळणी समितीची माहिती वेळोवेळी नागरीकांपर्यंत पोहोचविण्याचे महत्वाचे काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

         प्रास्ताविकातून श्री. वाठ यांनी समाज कल्याण विभागाचे सचिव सुमंत भांगे व आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या संकल्पनेतून समाज कल्याण विभागाच्या विविध योजना प्रभावीपणे राबविण्यत येत असल्याचे सांगितले. समाज कल्याण विभागाच्या योजनांची व कार्यपध्दतीविषयी माहिती त्यांनी दिली. यावेळी समाज कल्याण विभाग, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालय तसेच जिल्हा समाज कल्याण अधिकारी कार्यालयातील विविध अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांच्याकडे असलेल्या विविध योजनांची व जबाबदाऱ्यांची माहिती यावेळी उपस्थित प्रसारमाध्यम प्रतिनिधींना कार्यशाळेतून दिली. कार्यशाळेला विविध प्रसारमाध्यमांचे जिल्हा प्रतिनिधी व प्रतिनिधी, समाज कल्याण विभागातील, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयातील तसेच जिल्हा समाज कल्याण अधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रा. गजानन बारड यांनी केले. आभार समाज कल्याण निरीक्षक संध्या राठोड यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सामाजिक न्याय विभागातील अधिकारी व कर्मचारी तसेच ब्रिक्स प्रा.लि. व क्रिस्टल कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

No comments

Powered by Blogger.