Header Ads

अमरावती पदवीधर मतदारसंघ निवडणूक - Amravati Division Graduate Constituency Election

अमरावती पदवीधर मतदारसंघ निवडणूक - Amravati Division Graduate Constituency Election


अमरावती पदवीधर मतदारसंघ निवडणूक 

पदवीधर उमेदवारांनी नमुना 18 मध्ये 7 नोव्हेंबरपर्यंत पदनिर्देशित अधिकाऱ्यांकडे सादर करण्याचे आवाहन 

         वाशिम, www.jantaparishad.com दि. 19 (जिमाका) : अमरावती पदवीधर मतदार संघाचे विधान परिषद सदस्य यांची मुदत 7 फेब्रुवारी 2023 रोजी संपत आहे. त्यामुळे पदवीधर मतदारसंघ निवडणुक 2024 च्या अनुषंगाने मतदार याद्या तयार करण्याचा कार्यक्रम 1 ऑक्टोबर 2022 पासून सुरू झाला आहे. 1 नोव्हेंबर 2022 या अर्हता दिनांकावर आधारीत पदवीधर मतदारसंघासाठी मतदार यादीचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने घोषीत केला आहे. पदवीधर मतदारसंघाच्या मतदार याद्या प्रत्येक निवडणुकीपूर्वी नव्याने तयार करणे आवश्यक असल्याने पात्र पदवीधरांना 7 नोव्हेंबर 2022 पर्यंत विहीत नमुना 18 मध्ये पदनिर्देशीत अधिकाऱ्यांकडे आवश्यक कागदपत्रे सादर करावी.

           या मतदार नोंदणी कार्यक्रमांतर्गत विभागीय आयुक्त, अमरावती हे मतदार नोंदणी अधिकारी असून सहायक मतदार नोंदणी अधिकारी जिल्हाधिकारी, वाशिम हे आहेत. मतदार नोंदणीचे अर्ज हे पदनिर्देशीत अधिकारी, उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार यांच्याकडे वर नमूद केल्याप्रमाणे वेळापत्रकानुसार सादर करता येतील. मतदार नोंदणीसाठी प्रथमच नमुना क्रमांक १८ अर्जात आधार क्रमांकासाठी रकाना उपलब्ध करून देण्यात आला आहे. आधार क्रमांक सादर करणे हे मतदाराच्यावतीने ऐच्छीक आहे, असेही आयोगाने स्पष्ट केले आहे. भारताचा नागरीक असलेली व्यक्ती आणि त्या मतदारसंघातील सर्वसाधारण रहिवासी आहे आणि ती १ नोव्हेंबर २०२२ पूर्वी किमान ३ वर्षे आधी भारताच्या राज्यक्षेत्रातील विद्यापीठाचा पदवीधर असेल किंवा त्याच्याशी समतुल्य असलेली अर्हताधारण करीत असेल अशी प्रत्येक व्यक्ती मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी पात्र आहे. ३ वर्षाचा कालावधी हा ज्या दिनांकास अर्हता पदवी परीक्षेचा निकाल जाहिर करण्यात आला असेल, आणि तो विद्यापीठ किंवा अन्य संबंधीत प्राधीकरण यांच्याकडून प्रसिध्द करण्यात झाला असेल त्या दिनांकापासुन मोजण्यात येईल.

       पदवीधर मतदार यादीमध्ये नोंदीकरीता मतदारांना नमुना १८ अर्ज इंग्रजी किंवा मराठीमध्ये सादर करता येईल. हा अर्ज तहसिल कार्यालयात तसेच मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य रांच्या https://ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर डाऊनलोड फॉर्म 18.pdf  (download 18.pdf) येथे सुध्दा उपलब्ध आहे. संबधीत शैक्षणिक पात्रता दर्शविणारा पुरावा/ कागदपत्रे पदनिर्देशीत अधिकारी/ सहायक पदनिर्देशीत अधिकारी/ संबंधित जिल्हयातील राजपत्रित अधिकारी/ नोटरी पब्लिक यांच्याकडून प्रमाणीत केलेली असणे आवश्यक आहे. एकत्रित स्वरूपात अर्ज प्रत्यक्ष किंवा टपालाद्वारे स्विकारण्यात येणार नाही. संस्था प्रमुख त्यांच्या संस्थेतील पात्र पदवीधर कर्मचाऱ्यांचे अर्ज एकत्रितरित्या सादर करू शकतात. जेथे वरील कार्यपध्दती अनुसरण्यात आलेली नाही असा कोणताही अर्ज अपूर्ण समजून मतदारनोंदणी अधिकाऱ्यांकडून तातकाळ नाकारण्यात येईल. या मतदार नोंदणी कार्यक्रमांतर्गत जास्तीत जास्त पात्र व्यक्तींनी मतदार नोंदणी करावी. असे आवाहन जिल्हाधिकारी तथा सहायक मतदार नोंदणी अधिकारी षण्मुगराजन एस. यांनी केले आहे.

No comments

Powered by Blogger.