Header Ads

पशुधनावरील लम्पी चर्मरोगावर नियंत्रणासाठी प्रशासन अलर्ट मोडवर - administration on action mod on lampi virus



पशुधनावरील लम्पी चर्मरोगावर नियंत्रणासाठी प्रशासन अलर्ट मोडवर

पशुंचे लसीकरणासोबत गोठयांमध्ये फवारणी करण्यासोबतच स्वच्छता ठेवण्याचे निर्देश

जिल्हयात या आजाराला प्रतिबंध करण्यासाठी 10 हजार लस प्राप्त

     वाशिम, दि. 09 (जिमाका) : जिल्हयात काही ठिकाणी विशेषत: रिसोड तालुक्यातील सवड व खडकी (सदार) येथे जवळपास 20 जनावरे लम्पी चर्मरोगाच्या संसर्गाने बाधित झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे जिल्हयात या रोगाचा फैलाव होणार नाही याची दक्षत घेवून आवश्यक त्या उपययोजना करण्यासोबतच पशुंचे लसीकरण, गोठयांची फवारणी करण्यासोबतच गोठयांची स्वच्छता ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी दिले.

         आज 9 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृह येथे लम्पी चर्मरोग सनियंत्रणासाठी जिल्हास्तरीय समितीची सभा जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. सभेला दुरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, उपविभागीय अधिकारी वाशिम, कारंजा व मंगरुळपीर तसेच सर्व तहसिलदार सहभागी झाले होते. तर सभेला जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. बोरकर, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. वानखेडे, सर्व गटविकास अधिकारी व तालुका पशुसंवर्धन अधिकारी उपस्थित होते.

         श्री. षण्मुगराजन म्हणाले, ज्या गावांमध्ये या रोगाने बाधित जनावरे आढळून आली आहे, त्या गावाच्या पाच किलोमिटर परिघात येणाऱ्या गावातील गोठयांची फवारणी करुन गुरांचे लसीकरण करण्यात यावे. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून जिल्हयात या रोगाचा संसर्ग रोखण्यासोबतच प्रतिबंध करण्यासाठी औषधी व लस खरेदी करण्यात येईल. बाहेरच्या जिल्हयातून जिल्हयात जनावरे विक्रीसाठी येणार नाही, याबाबतची दक्षता घेण्यात यावी. जिल्हयातील सर्व गुरांचे बाजार बंद करण्याबाबत आदेश काढण्यात येईल. एखादया पाळीव जनावराला लम्पी सदृश्य आजाराची लक्षणे दिसत असतील तर संबंधित पशुपालकाने जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात त्या पशुला घेऊन जावे व आवश्यक ते औषधोपचार करुन घ्यावे. या आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासोबतच प्रतिबंधाबाबत पशुपालकांमध्ये जाणीव जागृती गावपातळीवर करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने ग्रामपंचायतीची मदत घ्यावी. असे ते म्हणाले.

         गरीब लोकांची अर्थव्यवस्था ही पाळीव जनावरांवर अवलंबून असल्याचे सांगून श्री. षण्मुगराजन म्हणाले, त्यामुळे तातडीने या पाळीव जनावरांचे लसीकरण करुन लम्पी चर्मरोग हया गुरांना होणार नाही याबाबत पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी दक्ष राहून काम करावे. ज्या गावांमध्ये पाळीव जनावरांची संख्या जास्त आहे, त्या गावांना पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी नियमित भेटी दयाव्यात व गुरांची तपासणी करावी. तालुकास्तरीय समितीची सभा तहसिलदारांनी तातडीने आयोजित करावी. अशी सूचना त्यांनी यावेळी केली.  

         श्रीमती पंत म्हणाल्या, ग्रामीण भागात पशुपालकांमध्ये या आजाराविषयी जाणीव जागृती करण्यात येईल. गावपातळीवरील पशुधनाचे गोठे स्वच्छ ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. गोठयांच्या फवारणीसाठी लागणारी औषधे खरेदी करण्यासाठी ग्रामपंचायतीवर जबाबदारी सोपविण्यात येईल. जर या आजाराने एखादया पाळीव जनावराचा मृत्यू झाल्यास त्याची योग्यप्रकारे विल्हेवाट लावण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार कार्यवाही करण्यात येईल. असे त्यांनी यावेळी सांगितले.

         डॉ. श्री. बोरकर म्हणाले, विशेषत: गायवर्गीय गुरे व म्हैस प्रजातीतील पाळीव जनावरांना या लम्पी आजारामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी तसेच या रोगाचा प्रसार टाळण्यासाठी पशुपालकांमध्ये माहिती देण्यात येईल. पशुधनाबाबत पशुपालक जागरुक रहावे. रोगाचा प्रसार रोखण्यासाठी आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहे. जिथे संसर्ग बाधित जनावरे आहेत, त्या गावातील तसेच त्या परिसरातील 5 किलोमिटर परिघातील गावातील गुरांची काळजी घेण्यात येत आहे. तेथील गुरांचे लसीकरण करण्यात येत असून गुरांच्या गोठयांची फवारणी करण्यात येत आहे. या आजारामध्ये गुरांना ताप येतो. उपचार न केल्यास अंगावर गाठी येतात. डोळयातून व नाकातून स्त्राव येतो. अशा प्रकारचे लक्षणे गुरांमध्ये दिसून येतात. जिल्हयात या रोगाला प्रतिबंध करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

         डॉ. वानखेडे म्हणाले, जिल्हयात या आजाराला प्रतिबंध करण्यासाठी 10 हजार लस प्राप्त झाली आहे. आजारी जनावरांवर तात्काळ उपचार करण्यात येत आहे. गोठे फवारणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. या आजाराबाबत पशुपालकांमध्ये जाणीव जागृती करण्यात येत आहे. जिल्हयात पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची कमतरता लक्षात घेता प्रशिक्षीत असलेल्या 80 ते 90 व्यक्तींकडून गायी व म्हशीचे लसीकरण करण्यात येईल. जर एखादा पशु या आजाराने मृत्युमुखी पडला तर त्याला 7 ते 8 फुट खोल खड्डयात पुरविण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

No comments

Powered by Blogger.