Header Ads

१३ ऑगस्टला देशभक्तीपर विशेष कार्यक्रम - Special program on patriotism on 13th August

azadi ka amrit mahotsav


१३ ऑगस्टला देशभक्तीपर विशेष कार्यक्रम

जिल्हा प्रशासनाचा पुढाकार

  •  नागरिकांना सहभाग घेता येईल
  •  केवळ देशभक्तीवरील कार्यक्रम सादर करण्यास मुभा
  •  नाशिकचा ऑर्केस्ट्रा वेधणार लक्ष
  •  विशेष सादरीकरणासाठी पुरस्कार

        वाशिम, दि. 10 www.jantaparishad.com (जिमाका) : येत्या 15 ऑगस्ट रोजी भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पुर्ण होत आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान घरोघरी तिरंगा हा उपक्रम राबविण्यात येत आहे. भारतीय स्वातंत्र्याप्रती नागरिकांच्या मनात स्वातंत्र्याची भावना सतत तेवत रहावी यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. घरोघरी तिरंगा हे अभियान जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहचावे यासाठी विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणुन जिल्ह्यात तिरंगा ध्वजाची विविध स्टॉलच्या माध्यमातून विक्री करण्यात येत आहे. याशिवाय काही फिरती विक्री केंद्र लवकरच कार्यान्वित करण्यात येणार आहे. नागरिकांनी घरोघरी तिरंगा या अभियानाला चांगला प्रतिसाद दिला आहे.

          जिल्हाधिकारी कार्यालयातून आतापर्यंत ७५ हजारपेक्षा अधिक तिरंगा ध्वजाची विक्री करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासह जिल्हयातील इतरही शासकीय ईमारतीवर आकर्षक विद्यूत रोषणाई करण्यात आली आहे. गावोगावी प्रभातफेरी काढण्यात येत आहे. येत्या 12 ऑगस्ट रोजी जिल्हयातील गावांमध्ये प्रभातफेरीचे आयोजन करुन जनजागृती करुन घरोघरी तिरंगा या उपक्रमासाठी नागरीकांना प्रोत्साहित करण्यात येणार आहे. १२ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता वीरमाता व विरपत्नी यांची मिरवणूक जिल्हाधिकारी कार्यालयातून काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीत ७५ पोलीस, ७५ होमगार्डस, ७५ राष्ट्रीय छात्र सेनेचे विद्यार्थी, ७५ माजी सैनिक, पोलिस बॅन्ड, विद्यार्थी व नागरीक सहभागी होणार आहेत. या रॅलीच्या माध्यमातुन जिल्ह्यातील ज्या सुपुत्रांनी देशासाठी प्राणाची आहुती दिली अशा वीर सैनिकांच्या कुटुंबियांची मिरवणुक काढुन देशप्रेम व राष्ट्रीय एकात्मता मनात तेवत राहावी यासाठी प्रोत्साहित करण्यात येणार आहे.

         १३ ऑगस्ट रोजी तिरंगा सायकल रॅली काढण्यात येणार आहे. त्याच दिवशी सायंकाळी ६ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परीसरात भव्य असा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमात जास्तीत जास्त जिल्हावासियांनी आपला सहभाग नोंदवावा. असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. या कार्यक्रमात केवळ देशभक्तीवर आधारीत नाटक, गीत, नृत्य व एकांकिका सादर करणे अपेक्षित आहे. त्यासाठी वयाची कोणतीही अट नाही. ग्रुपमध्ये सुध्दा भाग घेता येईल. ग्रुपचे वा वैयक्तिक सादरीकरण करण्यासाठी नोंदणी करणे बंधनकारक आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन शाखेत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, शाहू भगत (9049589693) यांचेकडे नोंदणी करावी. नोंदणी करण्यात आल्यानंतर १२ ऑगस्टला सायंकाळी नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय येथे दुपारी ४ वाजतापासुन सादरीकरणाची पडताळणी होणार आहेत. या पडताळणीनंतर योग्य सादरीकरणाला १३ ऑगस्ट रोजी होणाऱ्या भव्य कार्यक्रमात आपले सादरीकरण करण्याची संधी सादरकर्त्यांना मिळणार आहे. उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या चमुला/व्यक्तीला पुरस्कार देवुन गौरविण्यात येणार आहे. सहभागी होणाऱ्या कलाकारांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. हा कार्यक्रम सुरु असतांना प्रत्येक प्रेक्षकाच्या हाती तिरंगा ध्वज देण्यात येणार आहे. त्याची व्यवस्था जिल्हा प्रशासनाकडुन करण्यात आली आहे.

          या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण नाशिक येथील ऑर्केस्ट्रा राहणार आहे. यामध्ये जिल्ह्यातील मुलां-मुलींचा सुध्दा समावेश राहणार आहे. स्वातंत्राचा अमृत महोत्सवानिमित्त नागरीकांनी 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान घरोघरी तिरंगा या उपक्रमांतर्गत प्रत्येक घरावर तिरंगा लावून मोठ्या उत्साहात हा उपक्रम साजरा करावा. असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments

Powered by Blogger.