Header Ads

१७ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता होणार समूह राष्ट्रगीत गायन - Samuh Rashtragit Gayan on 17 august

 



१७ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता होणार समूह राष्ट्रगीत गायन

क्रीडा संकुल येथे मुख्य कार्यक्रम : २ हजार विद्यार्थी राहणार उपस्थित 

प्रत्येक नागरिकाने दिनांक १७ ऑगस्ट रोजी सकाळी ११.०० ते ११.०१ या वेळेत आहे त्या ठिकाणी थांबून राष्ट्रगीत गायन करावे 

        वाशिम दि.१५ www.jantaparishad.com (जिमाका) - भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त स्वराज्य सप्ताहाअंतर्गत समूह राष्ट्रगीत गायन १७ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता आयोजित केले आहे (Samuh Rashtragit Gayan on 17 august at 11.00AM). समूह राष्ट्रगीत गायनाचा हा जिल्हास्तरीय मुख्य कार्यक्रम जिल्हा क्रीडा संकुल येथे होणार आहे. या कार्यक्रमाला जवळपास २ हजार विद्यार्थी उपस्थित राहणार आहे.

              समूह राष्ट्रगीत गायना च्या उपक्रमासाठी शासनाने सूचना दिल्या आहेत. १७ ऑगस्टला सकाळी ११ वाजता एकाच वेळी सर्वत्र समूह राष्ट्रगीत गायन (Samuh Rashtragit Gayan) होणार आहे. राष्ट्रगीत गायनासाठी सर्व खाजगी,शासकीय तसेच इतर सर्व प्रकारच्या शाळा/ महाविद्यालये / शैक्षणिक संस्थेमधील विद्यार्थी व शिक्षक यांचा सहभाग राहणार आहे. सकाळी ११ वाजता समूह राष्ट्रगीत सुरु होईल. सकाळी ११ ते ११ : ०१ या एका मिनिटामध्ये राष्ट्रगीत गायन अपेक्षित आहे.समूहाने राष्ट्रगीताचे गायन करतांना जाणते-अजाणतेपणे राष्ट्रगीताचा अवमान होणार नाही याबाबत नागरिकांनी दक्षता घ्यावी. सर्व पातळीवरुन याबाबत जाणीव जागृती निर्माण करण्यासाठी विशेष काळजी घ्यावी.

  • सर्व संबंधित यंत्रणांनी सर्व नागरिकांना दिनांक १७ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता आहे त्या ठिकाणी थांबून राष्ट्रगीत गायन करावे. 
  • खाजगी आस्थापना,व्यापारी प्रतिष्ठाने, संस्था,शासकीय व निमशासकीय कार्यालये,केंद्र शासन व राज्य शासनाशी संबंधित कार्यालयातील अधिकारी/ कर्मचारी यांनी या उपक्रमात सक्रीय सहभागी होणे आवश्यक आहे.
  • शाळा,महाविद्यालये व शैक्षणिक संस्थेत या उपक्रमाबाबत सर्व विद्यार्थ्यांना विस्तृत माहिती देण्यात यावी.
  • सरकारी,खाजगी शाळा, महाविद्यालये,सर्व प्रकारच्या शैक्षणिक संस्था,शासकीय व निमशासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या उपक्रमात सहभागी होणे अनिवार्य आहे. 
  • राष्ट्रगीत गायनासाठी विद्यार्थ्यांनी मोकळे पटांगण,वर्ग खोली, किंवा हॉल या ठिकाणी एकत्रित उपस्थित राहावे. तसेच शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व शैक्षणिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनीही राष्ट्रगीत गायनाच्या या उपक्रमात सक्रिय सहभागी होणे आवश्यक आहे.

           वाशिम येथील जिल्हा क्रीडा संकुल येथे होणाऱ्या मुख्य समूह राष्ट्रगीत गायन उपक्रमात शहरातील विविध शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी होणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी श्री.तांगडे यांनी दिली.जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी क्रीडा संकुलात होणाऱ्या या उपक्रमात सहभागी व्हावे,असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

No comments

Powered by Blogger.