Header Ads

२५ ऑगस्टपूर्वी पात्र शेतकऱ्यांनी ई-केवायसी करावी - PMKSY complete kyc before 25 Aug



प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना

२५ ऑगस्टपूर्वी पात्र शेतकऱ्यांनी ई-केवायसी करावी

२१ ऑगस्टला विशेष शिबीर

         वाशिम, दि. 20  www.jantaparishad.com (जिमाका) : जिल्ह्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत १ लक्ष ८९ हजार ३४४ लाभार्थी यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे. त्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी पोर्टलवर ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ लक्ष १८ हजार ३०५ शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण केलेली आहे. अद्यापही ७१ हजार ३९ लाभार्थी शेतकरी यांची ई-केवायसी पूर्ण करणे बाकी आहे.     

          ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांनी कॉमन सर्विस सेंटर (सीएससी)/आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन आधारकार्ड आधारकार्डला लिंक असलेला मोबाईल क्रमांक (आधार कार्डला मोबाईल क्रमांक लिंक नसेल तर दुसरा मोबाईल क्रमांक) लिंक करावा.

          प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा पुढचा हप्ता हा लाभार्थी शेतकऱ्याने ई-केवायसी पूर्ण केल्याशिवाय मिळणार नाही. ई-केवायसी करण्याकरीता आपल्या गावातील आपले सरकार सेवा केंद्र (सीएससी) केंद्रात जाऊन प्रक्रीया पुर्ण करावी. जिल्ह्यातील प्रत्येक गावात किंवा नजीकच्या गावात असलेल्या सर्व सेतु/सुविधा केंद्रात २१ ऑगस्ट रोजी विशेष शिबिराचे आयोजन आपले सरकार सेवा केंद्र (सीएससी) मार्फत करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये जाऊन शेतकऱ्यांनी या योजनेच्या १२ व्या हप्त्याचा लाभ मिळण्यासाठी ई-केवायसी पूर्ण करावी.

          प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील १ लक्ष ८९ हजार ३४४ लाभार्थी शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्यांपैकी १ लक्ष ५३ हजार ७६१ लाभार्थ्यांनी बँक खात्यास आधार जोडणी (केवायसी) पूर्ण केले आहे. उर्वरित ३२ हजार ९३८ लाभार्थी शेतकऱ्यांचे बँक खात्यास आधार जोडणी (केवायसी) करणे बाकी आहे. ज्या लाभार्थी शेतकऱ्यांची बँक खात्यास आधार क्रमांक जोडणी करणे (केवायसी) बाकी असेल अशा लाभार्थ्यांनी ज्या बँकेत खाते असेल त्याठिकाणी आधारकार्ड आणि बँक पासबुकची झेरॉक्स जमा करुन आपल्या बँक खात्यास आधारकार्ड जोडणी पूर्ण करावी. सदर ई-केवायसी आणि बँक खात्यास आधार क्रमांकाची जोडणी (केवायसी) पूर्ण केल्याशिवाय शेतकऱ्यांना माहे, ऑगस्ट २०२२ नंतरचे या योजनेचे अनुदान/हप्ते मिळणार नाही.

          जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी वर नमूद केलेल्या ठिकाणी जाऊन आपल्या आधार कार्डची ई-केवायसी व बँकेत जाऊन बँक खात्यास आधार क्रमांकाची जोडणी २५ ऑगस्टपूर्वी करुन घ्यावी. असे निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे (Resident Deputy Collector Shailesh Hinge) यांनी कळविले आहे.

No comments

Powered by Blogger.