Header Ads

पशुसंवर्धन विभागाकडून जनावरांतील लम्पी त्वचारोगाबाबत प्रतिबंधात्मक सूचना जारी - Lumpy Dermatitis in animals preventive measures

Lumpy skin disease


पशुसंवर्धन विभागाकडून जनावरांतील लम्पी त्वचारोगाबाबत प्रतिबंधात्मक सूचना जारी

Lumpy Dermatitis in animals preventive measures 

मुंबई, दि.4 : गुजरात राज्यामधील काही जिल्ह्यामध्ये लम्पी त्वचा रोगाचा (Lumpy skin disease) प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झालेला आहे. या रोगाचा प्रादुर्भाव महाराष्ट्रात विशेषतः गुजरात राज्याच्या सीमेलगत असलेल्या जिल्ह्यांमध्ये होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबतच्या सूचना पशुसंवर्धन विभागातील क्षेत्रीय अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. Lumpy Dermatitis in animals preventive measures. 

लम्पी त्वचा रोग हा गोवंश व महिष वर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचारोग आहे. या आजारासाठी कारणीभूत असणारे विषाणू हे देवी विषाणू गटातील कॅप्रील्पॉक्स (CapriPlox) या प्रवर्गात मोडतात. या साथीच्या आजाराची प्रमुख लक्षण

म्हणजे जनावरांच्या शरीरावर कडक व गोल आकाराच्या गाठी येतात. या आजाराचे पक्के निदान भोपाळ येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्था या प्रयोगशाळे मार्फत केले जाते, याकरिता आजारी जनावरांचा उपचार करण्यापूर्वी प्रयोगशाळा तपासणी करिता नमुने घेणे आवश्यक आहे.

या विषाणूचे शेळ्या मेढ्यांमधील देवीच्या विषाणूशी साधर्म्य आढळून येत असले तरी हा आजार शेळ्या मेंढ्यांना होत नाही. हा आजार जनावरांपासून मानवाकडे संक्रमित होत नाही. ह्या आजाराची देशी वंशाच्या जनावरापेक्षा संकरित जनावरांना लागण होण्याची जास्त शक्यता असते.

संक्रमण झाल्यानंतर एक ते दोन आठवडे हा विषाणू रक्तामध्ये राहतो व त्यानंतर शरीराच्या इतर भागात संक्रमित होतो. संक्रमित जनावरांचे विविध स्त्राव, डोळ्यातील पाणी, नाकातील स्त्राव, लाळ इत्यादींमधून, चारा व पाणी दूषित होऊन जनावरांना या आजाराची लागण होते. वीर्यामधूनही हा विषाणू बाहेर पडत असल्यामुळे कृत्रिम रेतन किंवा नैसर्गिक संयोग याद्वारेही याची लागण होऊ शकते. तसेच या आजाराचा प्रसार बाह्यकीटकांद्वारे (डास, माशा, गोचीड इ.) होतो. त्वचेवरील खपल्यांमध्ये हा विषाणू अंदाजे १८ ते ३५ दिवस जिवंत राहतो.

लम्पी त्वचा रोगामध्ये जनावरांना ताप येऊन त्वचेखाली विशेषत: डोके, मान, पाय, कास इ. ठिकाणी गाठी येतात, तसेच तोंडात, घशात व श्वसन नलिकेत, फुफ्फुसात पुरळ व फोड येतात. जनावरांच्या तोंडातून मोठ्या प्रमाणात लाळ गळती होते. जनावरांना अशक्तपणा येतो व भूक मंदावते, डोळ्यामध्ये जखमा तयार होतात. या रोगामुळे गाभण जनावरामध्ये गर्भपात होऊ शकतो. पायास सूज येते.

हा संसर्गजन्य रोग असल्याने उपचार करण्यापेक्षा रोग येऊ नये या करिता प्रतिबंधात्मक उपाययोजना व रोग आल्यास त्याचा प्रसार होऊ नये याकरिता पशुपालकांनी आवश्यक ती काळजी घेणे जास्त महत्त्वाचे आहे.

  • १. बाह्य कीटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी गोठ्यांची व्यवस्थित स्वच्छता राखावी.
  • २. निरोगी जनावरांना बाधित जनावरापासून वेगळे बांधावे. गायी व म्हशींना एकत्रित ठेवण्यात येऊ नये.
  • ३. जनावरामध्ये हा आजार अत्यंत संसर्गजन्य असल्यामुळे लंम्पी स्किन डिसीज सदृश लक्षणे आढळल्यास जवळच्या पशुवैद्यकीय संस्था प्रमुखांना तातडीने संपर्क साधावा.
  • ४. बाधित गावांमध्ये बाधित जनावरांच्या पिण्याच्या पाण्याकरिता व तसेच चराईकरिता स्वतंत्र व्यवस्था करावी. साथीच्या काळात बाधित भागातील जनावरे व मानवाचा निरोगी भागात प्रवेश टाळावा. तसेच गोठ्यात त्रयस्थाच्या भेटी टाळाव्यात.
  • ५. बाधित परिसरात स्वच्छता करावी व निर्जंतुक द्रावणाची परिसरात फवारणी करावी. त्याकरिता १ टक्के फॉर्मलीन किंवा २.३ टक्के सोडियम हायपोक्लोराईट, फिनॉल २% यांचा वापर करता येईल.
  • ६. या रोगाने ग्रस्त जनावरांचा मृत्यू झाल्यास मृतदेहाची शास्त्रीय पद्धतीने कमीत कमी ८ फूट खोल खड्डयात गाडून विल्हेवाट लावावी व त्यावर मृत जनावरांच्या खाली व वर चुन्याची पावडर टाकण्यात यावी.
  • ७. या रोगाचा प्रसार बाह्य कीटकाद्वारे (डास, माशा, गोचीड इ.) होत असल्याने आजारी नसलेल्या सर्व जनावरांवर तसेच गोठ्यात बाह्य कीटकांच्या निर्मुलनासाठी औषधांची प्रमाणात फवारणी करावी.
  • ८. रोग नियंत्रणासाठी लसीकरण करणे आवश्यक असून बाधित गावांमध्ये व बाधित गावापासून ५ किलोमीटर त्रिज्येत येणाऱ्या सर्व गावांमधील ४ महिने वयावरील गाय व महिष वर्गातील जनावरांना नजीकच्या पशुवैद्यकाच्या सल्ल्याने लसीकरण करावे तसेच बाधित जनावरांना औषधोपचार करून घ्यावे.
  • ९. रोगप्रादुर्भाव झाल्यास जनावरांची खरेदी-विक्री थांबवावी. योग्य त्या जैवसुरक्षा उपाययोजनांची अंमलबजावणी, बाधित जनावरांचे तात्काळ व योग्य औषधोपचार केले आणि अबाधित क्षेत्रात १०० टक्के लसीकरण केले तर या रोगाचे प्रभावीपणे नियंत्रण करता येते, अशी माहिती राज्याचे पशुसंवर्धन आयुक्त डॉ. डी. डी. परकाळे यांनी दिली आहे.

No comments

Powered by Blogger.