Header Ads

प्रधानमंत्री पीक विमा योजना - प्रस्ताव 31 जुलैपर्यंत सादर करण्याची मुदत - Pradhanmantri pik vima yojana 31 July last date



प्रधानमंत्री पीक विमा योजना

प्रस्ताव 31 जुलैपर्यंत सादर करण्याची मुदत

खरीप हंगामासाठी शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावा

कृषी विभागाचे आवाहन

      वाशिम, दि. 06 (www.jantaparishad.com) : सन २०२२-२३ च्या खरीप हंगामाकरीता प्रधानमंत्री पिक विमा योजना राबविण्यास १ जुलै २०२२ शासन निर्णयानुसार मान्यता मिळाली आहे. या योजनेनुसार अंमलबजावणी करण्याकरीता खरीप हंगाम २०२२-२३ करीता भारतीय कृषी विमा कंपनी, मुंबई यांना वाशिम जिल्हयामध्ये पीक विमा राबविण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. उभ्या पिकास दुष्काळ, पुर, भुस्खलन, चक्रीवादळ, अतिवृष्टी, किड, रोगराई, पावसातील खंड, नैसर्गिक आग, विज कोसळणे इत्यादी नैसर्गिक आपत्तीपासून होणाऱ्या पीक नुकसानीस संरक्षण देणे हा या योजनेचा उददेश आहे.

        जिल्हयात खरीप हंगामात प्रामुख्याने घेण्यात येणाऱ्या सोयाबीन, कापूस, तूर, मूंग, उडीद व खरीप ज्वारी या पिकांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे. ही योजना जिल्हयातील सर्व तालुक्यातील सर्व मंडळांना लागू करण्यात आलेली आहे. तसेच अधिसूचीत क्षेत्रात अधिसूचीत पिके घेणारे (कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसह) सर्व शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत.

        या योजनेअंतर्गत सर्व पिकांसाठी जोखीमस्तर ७० टक्के असा निश्चीत करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता खरीप हंगामासाठी २ टक्के, रब्बी हंगामासाठी १.५ टक्के व नगदी पिकांसाठी ५ टक्के असा मर्यादित ठेवण्यात आला आहे. अधिसूचीत क्षेत्रातील अधिसूचीत पिकांचे उंबरठा उत्पन्न हे मागील ७ वर्षाचे सरासरी उत्पन्न (नैसर्गिक आपत्ती जाहीर झालेले २ वर्ष वगळून) गुणीला त्या पिकाचा जोखीमस्तर विचारात घेऊन निश्चीत केले जाईल. ही योजना कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना एैच्छिक राहील. विमा संरक्षित रक्कम खरीप ज्वारी या पिकांसाठी 3० हजार रुपये असून शेतकऱ्यांनी प्रती हेक्टरी भरावयाचा विमा हप्ता १५०० रुपये आहे. सोयाबीन या पिकांसाठी विमा संरक्षित रक्कम ५४ हजार रुपये असून शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता १०८० रुपये आहे. मुग व उडीद या पिकांसाठी विमा संरक्षित रक्कम प्रत्येकी २२ हजार ८०० रुपये असून शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता प्रत्येकी ४५६ रुपये इतका आहे. तुर या पिकांसाठी विमा संरक्षित रक्कम ३६ हजार ८०२ रुपये असून शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता ७३६.०४ रुपये आहे. कापुस या पिकांसाठी विमा संरक्षित रक्कम ५१ हजार ६०० रुपये असून शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता २५८० रुपये इतका आहे.

        प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत विमा हप्त्यासह प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत बिगर कर्जदार व कर्जदार शेतकऱ्यांसाठी ३१ जुलै २०२२ आहे. त्याकरीता शेतकऱ्यांनी विहीत प्रपत्रात विमा प्रस्ताव विमा हप्त्यासह अंतिम मुदतीपूर्वी विमा प्रस्ताव दाखल करण्यासाठी नजिकच्या आपले सरकार सेवा केंद्र, प्राथमिक सहकारी संस्था व बँकांकडे सादर करणे आवश्यक आहे. प्रस्तावासोबत ७/१२ उतारा, आधारकार्ड, मोबाईल क्रमांक, बँक खात्याचा तपशिल इत्यादी जोडणे आवश्यक आहे. पीक पाहणी झाली असल्यास पिकांची पेरणी केलेले स्वयं घोषणापत्र सादर करून प्रत्यक्ष ईलेक्ट्रॉनिक स्वाक्षण करणे बंधनकारक असून विमा प्रस्तावासोबत जोडणे आवश्यक आहे. तसेच योजनेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्यांचे त्या बँकेत खाते असणे आवश्यक आहे.

        बिगर कर्जदार शेतकरी विमा संरक्षणासाठी वेब पार्टलव्दारे थेट अर्ज भरू शकतील. त्यासाठी पीक विमा पोर्टलवर (www.pmfby.gov.in) या संकेतस्थळावर शेतकऱ्यांठी ऑनलाईन अर्ज उपलब्ध केलेला आहे. विमा हप्त्याची रक्कम ही पेमेंट गेटवेव्दारे ऑनलाईन भरायची आहे. एका क्षेत्राचा विमा दोन वेगवेगळया कंपन्यांकडून विमा काडून घेउ नये. प्रतिकुल हवामान घटकामुळे पेरणी/उगवन न होणे, हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत झालेले नुकसान, पीक पेरणी पासुन काढणी पर्यंतच्या कालावधीत पिकाच्या उत्पादनात येणारी घट, स्थानीक नैसर्गीक आपत्ती व काढणी पश्चात नुकसान इत्यादी बाबींना विमा संरक्षण राहील.

        या योजनेव्दारे शेतकऱ्यांना वैयक्तीक पातळीवर विमा संरक्षण लागू करण्यात आले असून पिकास दुष्काळ, पुर, भुस्खलन, चक्रीवादळ, अतिवृष्टी किड, रोगराई, पावसातील खंड, नैसर्गिक आग, विज कोसळणे इत्यादीमुळे होणारे नुकसान हे विमा कंपनी व राज्य शासनाचे अधिकारी यांच्या संयुक्त पाहणीनुसार विमा कंपनीमार्फत वैयक्तीक स्तरावर पंचनामे करून नुकसानीचे प्रमाण व दयावयाची नुकसान भरपाई ठरविली जाईल. जर अधिसूचीत क्षेत्रातील अधिसूचीत पिकांचे अपेक्षित उत्पन्न हे त्या पिकांच्या उंबरठा उत्पन्नाच्या 50 टक्केपेक्षा कमी असेल तर सर्व अधिसूचीत विमा क्षेत्र हे या मदतीसाठी पात्र राहतील. यासाठी स्थानिक आपत्तीमुळे योजनेत सहभागी शेतकऱ्यांची वैयक्तीकरीत्या नुकसान झाल्यास सदर शेतकऱ्यांनी ज्या वित्तीय संस्थेमार्फत योजनेत भाग घेतला आहे. त्या संबंधीत वित्तीय संस्थेस, विमा कंपनी, कृषि/महसुल विभाग किंवा टोलफ्री क्रमांकाव्दारे, मोबाईल अॅपव्दारे कोणत्याही परिस्थीतीत नुकसान झाल्यापासून ७२ तासात नुकसानग्रस्त अधिसूचित पिकाची माहीती, नुकसानीचे कारण व प्रमाण कळविणे आवश्यक आहे. तसेच शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईचा दावा दाखल करण्याठी विहीत नमुन्यातील अर्ज आवश्यक कागदपत्रासह (७/१२, पिकांची नोंद असलेला विमा हप्ता भरल्याचा पुरावा इत्यादी) विमा कंपनीस सादर करणे आवश्यक आहे. शेतकरी परीपुर्ण माहीतीसह विहीत नमुन्यातील अर्ज सादर करू न शकल्यास उपलब्ध माहीतीच्या आधारे अर्ज सादर करू शकतील. परंतू अर्जातील उर्वरीत माहीती ७ दिवसाच्या आत विमा कंपनीस सादर करणे आवश्यक आहे. पिक नुकसानीचा पुरावा म्हणून संगणक प्रणालीव्दारे घेतलेली छायाचित्रे देता येतील.

        ही योजना ऐच्छिक असून कर्जदार शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी व्हायचे नसल्यास विहीत प्रपत्रात माहिती भरुन पिक कर्ज घेतलेल्या बँकेच्या शाखेला कळविणे आवश्यक राहील. तरी जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी या योजनेचा लाभ घ्यावा. विमा प्रस्ताव दाखल करण्यासाठी नजिकच्या सामुहीक सुविधा केंद्र व बँकाकडे जावे. अधिक माहीतीसाठी विमा कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी, तालुका प्रतिनिधी, बँका, तालुका कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी, कृषि पर्यवेक्षक व कृषि सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा. असे आहवान जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार यांनी केले आहे.

No comments

Powered by Blogger.