Header Ads

१४ वर्षाखालील बालकास कामावर ठेवू नये bal kamgar virodhi diwas

bal kamgar virodhi diwas


१२ जूनला बाल कामगार विरोधी दिवस

१४ वर्षाखालील बालकास कामावर ठेवू नये

कामगार विभागाचे आवाहन

वाशिम, दि. 11  (जिमाका) : राष्टीय बालहक्क संरक्षण आयोगाच्या निर्देशानुसार 12 जून हा दिवस जागतिक बालकामगार विरोधी दिन म्हणून सर्वत्र पाळण्यात येतो. या दिवसाचे औचित्य साधून सरकारी कामगार अधिकारी यांनी सर्व दुकाने, हॉटेल्स व व्यापारी संस्था तसेच कारखाने मालक यांना आवाहन करुन त्यांनी 14 वर्षाखालील बालकास कामावर ठेवू नये. धोकादायक व्यवसाय व प्रक्रियेशी संबंधीत उद्योग मालकांनी 18 वर्षाखालील किशोरवयीन कामगारास कामावर न ठेवण्याचे व संबंधित व्यवसायाच्या मालक संघटनांनी याची नोंद घेवून त्यांच्या सभासदांना संघटनांमार्फत अवगत करुन जनजागृती करण्याचे आवाहन केले आहे.

सरकारी कामगार अधिकारी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात गेल्या वर्षभरात एकूण 13 धाडसत्रांचे आयोजन करण्यात आले. यादरम्यान 222 आस्थापनांना भेटी देऊन 14 बाल व किशोरवयीन कामगारांना मुक्त करण्यात आले. 6 आस्थापनांच्या मालकाविरुध्द संबंधित पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद नोंदविण्यात आली.

तरी उद्योग/व्यवसायात कार्यरत कामगार संघटना, स्वयंसेवी संस्था यांनी नोंद घेऊन बालकामगार काम करतांना आढळल्यास 1098 या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवावी. असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी गौरव नालिंदे यांनी केले आहे. 

No comments

Powered by Blogger.