National helpline number 14567 for senior citizens
ज्येष्ठ नागरीकांच्या मदतीसाठी राष्ट्रीय हेल्पलाईन क्रमांक 14567
वाशिम, दि. 15 www.jantaparishad.com: ज्येष्ठ नागरीकांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता त्यांना मदत करण्यासाठी शासनाने पहिली अखिल भारतीय टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक 14567 सुरु केला आहे. या हेल्पलाईनला ऐल्डर लाईन Elder line असे नाव देण्यात आले आहे. या हेल्पलाईनच्या आधारे ज्येष्ठ नागरीकांच्या पेंशनविषयक समस्या, कायदेशीर समस्या यासोबतच घरातील अत्याचारांना वाचा फोडण्यासाठी निराधार व वृध्दांकरीता ही हेल्पलाईन आधारवड ठरणार आहे.
भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालयाने देशातील ज्येष्ठ नागरीकांच्या विविध समस्यांच्या निवारणासाठी सर्व राज्यात 14567 हा हेल्पलाईन क्रमांक सुरु केला आहे. राष्ट्रीय समाज रक्षण संस्थान, राज्य शासनाचा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि जनसेवा फाऊंडेशनच्या वतीने राज्यात हेल्पलाईन चालविण्यात येत आहे. ज्येष्ठ नागरीकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविणे हा या हेल्पलाईनचा उद्देश आहे.
अत्याचारग्रस्त व बेघर वृध्द व्यक्तींची काळजी घेण्यासाठी व इतर सेवांसाठी वेळोवेळी त्यांना सहकार्याची गरज भासणार आहे. हेल्पलाईनची वेळ सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत असेल. वर्षभरात ही हेल्पलाईन 361 दिवस सुरु राहणार आहे. केवळ 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 2 ऑक्टोबर आणि 1 मे या दिवशी हेल्पलाईनची सेवा बंद राहील. या हेल्पलाईनमार्फत आरोग्य जागरुकता, निदान, उपचार, निवारा, वृध्दाश्रम घरे, डे केअर सेंटर, पोषण विषयक ज्येष्ठांसह संबंधित उत्पादने, सांस्कृतिक, आध्यात्मिक, कला, करमणुक, मार्गदर्शन, नातेसंबंधी विषयक व्यवस्थापन, मृत्युसंबंधी शोक, जीवन व्यवस्थापन आणि मृत्युपूर्वीचे दस्ताऐवजीकरण आदी बाबींचा यामध्ये समावेश राहणार असल्याची माहिती समाज कल्याणचे सहायक आयुक्त मारोती वाठ यांनी दिली.
Post a Comment