Header Ads

पशुसंवर्धन विभाग - वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करावे - Department of Animal Husbandry - Apply online for personal benefit schemes



पशुसंवर्धन विभाग - वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करावे

अर्ज करण्यासाठी आता मोबाईल ॲपची सुविधा

वाशिम, दि. 03 (जिमाका) :  ग्रामीण भागातील सुशिक्षीत बेरोजगार युवकांसह पशुपालक व शेतकरी बांधवांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करुन देत, त्यांना शाश्वत अर्थाजनाचा पर्याय उपलब्ध करुन देणाऱ्या पशुसंवर्धन विभागाने विविध वैयक्तिक लाभाच्या योजनांची प्रक्रीया अधिक पारदर्शक करण्यासाठी गेली तीन वर्षे ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविणे व लाभार्थ्यांची निवड करण्याची पध्दत सुरु केली आहे. याच बरोबर जिल्हास्तरीय विविध योजनांसाठी संगणक प्रणाली लागू करण्यात येत आहे. एखादया योजनेसाठी अर्ज केल्यानंतर त्यास दरवर्षी पुन्हा पुन्हा अर्ज करावे लागू नये, यासाठी तयार केलेली प्रतिक्षा यादी पुढील पाच वर्षापर्यंत लागू ठेवण्याची सोय केली आहे. 

नाविन्यपूर्ण राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजनेअंतर्गत दुधाळ गाई, म्हसींचे गट वाटप करणे, शेळी-मेंढी गट वाटप करणे, 1 हजार मांसल कुक्कुट पक्षांच्या संगोपनासाठी निवारा शेड उभारणीस अर्थ सहाय्य देणे, 100 कुक्कुट पिलांचे वाटप व 25 अधिक 3 तलंगा गट वाटप या योजनांसाठी ऑनलाईन पध्दतीने लाभार्थी निवड प्रक्रीया सन 2021-22 या वर्षात राबविली जाणार आहे. पशुपालकांना डेअरी, पोल्ट्री किंवा शेळी पालन यापैकी ज्या बाबींमध्ये अर्ज करावयाचा आहे त्याची निवड करण्याची सुविधा देखील उपलब्ध करुन देण्यात आली आहे. पशुपालक/ शेतकरी बांधव, सुशिक्षीत बेरोजगार युवक-युवती व महिलांनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. ऑनलाईन अर्ज https://ah.mahabms.com या संकेतस्थळावर करावे. अँड्रॉईड मोबाईल ॲप्लीकेशन AH-MAHABMS हे गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. अर्ज करण्याचा कालावधी 4 ते 18 डिसेंबर 2021 पर्यंत आहे. टोल-फ्री क्रमांक 1962 किंवा 1800-233-0418 यावर संपर्क साधावा.

योजनांची माहिती तसेच अर्ज करण्याची पध्दत याबाबतचा संपूर्ण तपशिल या संकेतस्थळावर तसेच मोबाईल ॲपवर उपलब्ध आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पध्दतीनेच स्विकारले जातील. या संगणक प्रणालीमध्ये अर्ज भरणे अत्यंत शुलभ करण्यात आले असून अर्जामधील माहिती कमीत कमी टाईप करावी लागेल. बहुतांशी माहितीबाबत पर्याच निवडण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यामुळे पशुपालकांनी अर्ज भरण्यासाठी स्वत:च्या मोबाईलचा वापर करावा. अर्ज भरतांना अर्जदारांने नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकावर अर्जाच्या स्थितीबाबत संदेश पाठविण्यात येणार असल्याने कोणत्याही परिस्थितीत अर्जदाराने योजनेअंतर्गत आपला मोबाईल क्रमांक बदलवू नये. अधिक माहितीसाठी टोल-फ्री क्रमांकावर किंवा तालुक्याच्या पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी अथवा जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय, तालुका लघु पशुवैद्यकीय सर्व चिकीत्सालय अथवा नजीकच्या पशु वैद्यकीय केंद्रावर संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विनोद वानखेडे यांनी केले आहे.   

No comments

Powered by Blogger.