Header Ads

सर्वच पात्र व्यक्तींना आता लस घेणे बंधनकारक - राज्य शासनाचे आदेश : All eligible persons are now required to get vaccinated - State Government orders:


सर्वच पात्र व्यक्तींना आता लस घेणे बंधनकारक - राज्य शासनाचे आदेश

प्रत्येक पात्र नागरीकाने कोविड लस घ्यावी - जिल्हा प्रशासनाचे आवाहन

वाशिम, दि. 03 (जिमाका) www.jantaparishad.com -   कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत असतांना देशात ओमिक्रॉन या विषाणूच्या संसर्गाचा नविन धोका निर्माण झाला आहे. या विषाणूची तिव्रता मोठया प्रमाणात आहे. कोविड लसीकरण मोहिमेअंतर्गत 18 वर्षावरील सर्वच पात्र व्यक्तींचे लसीकरण करणे आता बंधनकारक करण्यात आले आहे. फक्त डॉक्टरांनी ज्यांना सल्ला दिला आहे त्यांनीच लस घेवू नये. इतर सर्व पात्र व्यक्तींनी कोविड लस घेणे आवश्यक आहे.

महसूल व वन, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाने 27 नोव्हेंबर रोजी याबाबतचे आदेश काढले आहे. सर्व सार्वजनिक परिवहन सेवांमध्ये ज्या व्यक्तींचे संपूर्ण लसीकरण केलेले आहे, अशाच व्यक्तींना प्रवासाची मुभा राहणार आहे. राज्य शासनाने तयार केलेला युनिव्हर्सल पास (https://epassmsdma.manait.org  किंवा telegram-mahaGovUniversalPassBot) हा संपुर्ण लसीकरण झाल्याचा वैध पुरावा राहणार आहे. छायाचित्र असलेले वैध ओळखपत्र असलेले कोविन प्रमाणपत्र देखील वैध असल्याचा पुरावा मानण्यात येणार आहे.

ज्या व्यक्तिंनी कोविड लसीचे दोन्हीही डोस घेतलेले आहे आणि त्या व्यक्तीला लसीचा दूसरा डोस घेवून 14 दिवस झाले आहे, ती व्यक्ती संपुर्ण लसीकरण झालेली आहे असे समजण्यात येईल. एखादया ठिकाणी सेवा घेण्यासाठी अथवा ग्राहक म्हणून गेलेल्या व्यक्तीला तसेच साहित्य, वस्तू विक्री करणारा दुकान मालक, आस्थापना चालकांना तसेच तेथे काम करणाऱ्या व्यक्तींचे देखील लसीकरण झालेले असावे. दुकान, आस्थापना, मॉल, समारंभ व संमेलनाचे आयोजन करणारे आणि त्यामध्ये सहभागी होणाऱ्या सर्व व्यक्तींचे लसीकरण झाले असणे आवश्यक आहे. लसीकरण झालेल्या व्यक्तीकडूनच अशा ठिकाणचे व्यवस्थापन करण्यात यावे. तसेच तेथे येणारे सर्व अभ्यागत आणि ग्राहक यांचे देखील संपूर्ण लसीकरण झालेले असावे.

चित्रपटगृह, नाट्यगृह, मंगल कार्यालय व सभागृह यासारख्या बंदिस्त जागेत घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमाच्या बाबतीत जागेच्या क्षमतेच्या 50 टक्के लोकांना तर खुल्या जागेत होणाऱ्या कार्यक्रमाच्या बाबतीत जागेच्या क्षमतेच्या 25 टक्के लोकांनाच परवानगी देण्यात येणार आहे. याबाबतची क्षमता  ठरविण्याचा अधिकार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास राहणार आहे.

कोरोनाचा प्रसार रोखून प्रसाराची ही साखळी तोडण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने व संस्थेने कोविड अनुरुप  वर्तनविषयक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. पालन न करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला नियमाचे उल्लंघन केल्याच्या प्रत्येक प्रसंगी 500 रुपये दंड तर संस्था किंवा आस्थापनांना सुध्दा 10 हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. संस्था किंवा आस्थापनामध्ये येणारे अभ्यागत, ग्राहक यांनी देखील नियमितपणे उल्लंघन केल्याचे लक्षात आल्यास कोविड अधिसूचना अंमलात असेपर्यंत संबंधित संस्था किंवा आस्थापना बंद करण्यात येणार आहे. कोविड मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यास कसूर केल्यास संबंधित संस्था किंवा आस्थापनेला प्रत्येक प्रसंगात 50 हजार रुपये दंड आकारला जाईल. वारंवार कोविड मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन केल्यास ही अधिसूचना अंमलात असेपर्यंत ती संस्था किंवा आस्थापना बंद करण्यात येईल.

टॅक्सी तसेच खाजगी वाहतूक करणाऱ्या वाहनात किंवा बसमध्ये कोविड नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आल्यास संबंधित व्यक्तीला 500 रुपये दंड तर सेवा पुरविणारे वाहन चालक, मदतनीस किंवा वाहक यांना देखील 500 रुपये दंड आकारण्यात येईल. बसेसच्या बाबतीत मालक परिवहन एजन्सीला कसूर केल्याच्या प्रत्येक प्रसंगी 10 हजार रुपये दंड आकारण्यात येईल. वारंवार कसुर केल्याचे दिसून आल्यास कोविड- 19 ची अधिसूचना अंमलात असेपर्यंत मालक एजन्सीचे लायसन्स काढून घेण्यात येईल. किंवा तिचे परिचालन बंद करण्यात येणार आहे. ओमिक्रॉन व्हायरसची तिव्रता मोठया प्रमाणात असल्यामुळे आणि देशात या वायरसने शिरकाव केल्यामुळे जिल्हयातील पात्र नागरीकांचे कोविड लसीकरणासाठी जिल्हा प्रशासन आग्रही आहे. आपल्या आरोग्याचा विचार करता प्रत्येक पात्र नागरीकाने कोविड लस घ्यावी. असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.  

No comments

Powered by Blogger.