Header Ads

कोविड नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना होणार दंड जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शक सूचना जारी strict action against the person and institutions for breaking the rule




कोविड नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना होणार दंड

जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शक सूचना जारी

वाशिम दि. 30 (जिमाका) - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग नियंत्रण कायदयातील तरतूदींची अंमलबाजवणी 13 मार्च 2020 पासून करण्यात येत आहे. याबाबतची नियमावली प्रसिध्द करुन जिल्हाधिकारी यांना सक्षम प्राधिकारी घोषीत केले आहे. राज्य शासनाने आर्थिक, सामाजिक, मनोरंजन व सांस्कृतीक क्षेत्रावरील निर्बंध पुर्णत: लसीकरण झालेल्या व्यक्तींसाठी उठविण्याबाबत सुधारीत सुचना निर्गमित केल्या आहेत. जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष श्री. षण्मुगराजन एस. यांनी जिल्हयातील लसीकरण झालेल्या व्यक्तींसाठी सुधारीत मार्गदर्शक सुचना निर्गमित केल्या आहेत.

राज्य व केंद्र सरकारने वेळोवेळी निर्धारीत केलेल्या कोविड अनुरुप वर्तनाचे सेवा प्रदाते, जागांचे मालक, परवानाधारक व आयोजक इत्यादींसह सर्वांनी तसेच सर्व अभ्यागत, सेवा घेणारे ग्राहक व अतिथी इत्यादींनी काटेकोर पालन करावे. कोणत्याही कार्यक्रमाच्या, समारंभाच्या किंवा प्रयोगाच्या आयोजनाशी तिकीट असलेल्या किंवा नसलेल्या सर्व व्यक्ती तसेच सर्व सेवा प्रदाते व सहभागी होणाऱ्या व्यक्ती, अभ्यागत पाहुणे ग्राहक यांनी लसीकरण केलेले असावे. दुकान, आस्थापना, मॉल, समारंभ, संमेलन इत्यादी ठिकाणी संपूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तीव्दारे व्यवस्थापन करण्यात यावे. याठिकाणी येणारे सर्व अभ्यागत, ग्राहक यांचे संपूर्ण लसीकरण झालेले असावे. सार्वजनिक परिवहन सेवांमध्ये संपूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींनाच परवानगी राहील.

राज्य शासनाने तयार केलेल्या युनिर्व्हसल पास https://epassmsdma.mahait.org किंवा telegram-mahagovuniversalpass bot हा संपूर्ण झाल्याच्या स्थितीत वैध पुराव असेल. अन्यथा छायाचित्र असलेले वैध ओळखपत्र असलेले कोविन प्रमाणपत्र देखील त्यासाठी वैध पुरावा मानला जाईल. जेथे सर्वसामान्य जनतेतील कोणतीही व्यक्ती भेट देत नाही अशी कार्यालय व इतर आस्थापना तसेच खाजगी परिवहन सेवा यांच्यासाठी संपूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तीसाठी त्या खुल्या असण्याची अट नसली तरी देखील संपूर्ण लसीकरण करणे आवश्यक आहे.

राज्यात येणाऱ्या सर्व प्रवाशांचे लसीकरण करण्यात यावे. किंवा 72 तासासाठी वैध असलेले आरटी- पीसीआर चाचणी सोबत बाळगावे लागेल. चित्रपटगृह, नाटयगृह, मंगल कार्यालय, सभागृह इत्यादी बंधिस्त जागेत घेण्यात येणाऱ्या कोणत्याही कार्यक्रमाच्या/ समारंभाच्या/ उपक्रमाच्या बाबतीत जागेच्या क्षमतेच्या 50 टक्के लोकांना परवानगी दिली जाईल. कोणत्याही समारंभासाठी किंवा संमेलनासाठी संपूर्ण खुल्या असलेल्या जागेच्या बाबतीत जागेच्या क्षमतेच्या 25 टक्के लोकांना परवानगी दिली जाईल. कोणत्याही संमेलनासाठी उपस्थित असलेल्या एकूण लोकांची संख्या 1 हजारापेक्षा अधिक असेल तर याबाबतची माहिती स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला दयावी लागेल. स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे निरीक्षक हे तेथील पर्यवेक्षण करण्यासाठी त्यांचे प्रतिनिधी पाठवतील व नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात असल्याचे खात्री करतील. कोविड-19 चा धोका लक्षात घेता कोविड अनुरुप वर्तनाचे उल्लंघन होत असल्याचे दिसून आल्यास कार्यक्रम संपूर्ण किंवा अंशत: बंद करण्याचे आदेश स्थानिक प्राधिकरण देतील.

लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या आहेत आणि दुसरी मात्रा डोस घेतल्यानंतर 14 दिवस झालेले आहे अशी व्यक्ती संपूर्ण लसीकरण झालेली आहे असे समजण्यात येईल. कोविड- 19 विषाणूचा प्रतिबंध करण्यासाठी साखळी खंडीत करण्यासाठी प्रत्येक व्यक्ती व संस्थेने पालन करणे गरजेचे आहे. प्रत्येकांने कोविड अनुरुप वर्तनाचे पालन करावे. सर्व संस्थांच्या सर्व कर्मचारी, त्यांच्या परिसरात भेट देणारे अभ्यागत, ग्राहक किंवा संस्थेच्या कोणत्याही कार्यक्रमात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सहभागी होणारी कोणतीही व्यक्ती यांनी पालन करावे. पालन करण्यासाठी आवश्यक असलेल्या हँड सॅनिटायझर, साबण व पाणी आणि तापमापक इत्यादी गोष्टी देखील उपलब्ध्‍ा करुन दयाव्यात. नेहमी योग्य पध्दतीने मास्क परीधान करावे. नाक व तोंड नेहमी मास्कने झाकलेले असावे. जेथे शक्य असेल तेथे नेहमी 6 फुट सामाजिक अंतर अंतर राखावे. सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळावी. स्पर्श न करता नमस्कार करावा. खोकतांना किंवा शिंकतांना टिश्यू पेपरचा वापर करुन तोंड व नाक झाकावे.

अपेक्षित असलेल्या कोविड अनुरुप वर्तनाचे पालन न करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला कसूर केला म्हणून प्रत्येक प्रसंगी 500 रुपये इतका दंड आकारावा. संस्थेच्या किंवा आस्थापनेच्या कोणत्याही जागेत (वास्तूत) जर एखादया व्यक्तींने कसूर केल्याचे दिसून आले तर त्या व्यक्तीवर दंड लादण्याव्यतिरिक्त अशा संस्थांना किंवा आस्थापनांना सुध्दा 10 हजार रुपये दंड आकारण्यात येईल. एक आपत्ती म्हणून वारंवार कसूर करीत असेल तर कोविड-19 ची अधिसूचना अंमलात असेपर्यंत अशी संस्था किंवा आस्थापना बंद करण्यात येईल. एखादया संस्थेने किंवा आस्थापनेने स्वत:च कोविड अनुरुप वर्तनाचे पालन करण्यात कसूर केला तर प्रत्येक प्रसंगी 50 हजार रुपये इतका दंड ठोठावण्यात येईल. ही संस्था किंवा आस्थापना अधिसूचना अंमलात असेपर्यंत बंद करण्यात येईल. टॅक्सी किंवा खाजगी वाहतूक करणाऱ्या वाहनात किंवा कोणत्याही बसमध्ये कोविड अनुरुप वर्तनात कसूर केल्याचे आढळून आले तर कसूर करणाऱ्या व्यक्तीला 500 रुपये इतका दंड आकारण्यात येईल. तसेच सेवा पुरविणारे वाहन चालक, मदतनिस किंवा वाहक यांना देखील 500 रुपये इतका दंड आकारण्यात येईल. बसेसच्या बाबतीत मालक परिवहन एजन्सीज कसूर केल्याच्या प्रत्येक प्रसंगी 10 हजार रुपये इतका दंड करण्यात येईल. वारंवार कसूर केल्यास मालक एजन्सीचे लायसन किंवा त्याचे परिचालन अधिसूचना अंमलात असेपर्यंत बंद करण्यात येईल.


कोविड अनुरुप वर्तणुकीसंबंधी वर नमुद केलेल्या नियमांचे अनिवार्यपणे पालन करणे आवश्यक आहे. त्याचे उल्लंघन केल्यास दंड व शास्ती करण्यात येईल. आपत्ती व्यवस्थापन अधिनियमानुसार कोणत्याही आपत्ती व्यवस्थापन कायद्याव्दारे उल्लंघन करणाऱ्यांवर इतर कोणताही दंड किंवा शास्ती लादण्यात येईल. सदर मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन केल्यास भारतीय दंड संहिता 1860 (45) चे कलम 188, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 51 ते 60 व फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 मधील तरतुदीनुसार पात्र राहील. जिल्हाधिकाऱ्यांचे हे आदेश 30 नोव्हेंबर 2021 पासून जिल्हयातील ग्रामीण व शहरी भागासाठी लागू राहतील

No comments

Powered by Blogger.