Header Ads

जिनोमिक सिक्वेंसिंगमध्ये आणखी २० डेल्टा प्लस रुग्ण आढळले - total 65 patient of delta plus variant in maharashtra till today



जिनोमिक सिक्वेंसिंगमध्ये आणखी २० डेल्टा प्लस रुग्ण आढळले
राज्यात आतापर्यंत ६५ डेल्टा प्लस रुग्ण

मुंबई, दि.११: कोरोना प्रतिबंध आणि नियंत्रण उपाययोजनांचा एक अविभाज्य भाग म्हणून कोरोना विषाणूचे जनुकीय क्रमनिर्धारण ( जिनोमिक सिक्वेंसिंग) नियमित स्वरुपात करण्यात येत आहे. आज सी. एस. आय. आर. आय जी आय बी प्रयोगशाळेने आणखी २० डेल्टा प्लस रुग्ण शोधले असून त्यामुळे राज्यात आतापर्यंत आढळलेल्या डेल्टा प्लस रुग्णांची संख्या ६५ झाली आहे. नव्याने आढळलेले २० रुग्ण हे मुंबई ७, पुणे ३, नांदेड, गोंदिया, रायगड, पालघर प्रत्येकी २, चंद्रपूर आणि अकोला प्रत्येकी १ रुग्ण आढळून आले आहेत.

या जनुकीय क्रमनिर्धारण तपासणीतून राज्यात ८० टक्केहून अधिक नमुन्यांमध्ये डेल्टा व्हेरियंट आढळत असल्याचे दिसून येते आहे. या सर्वेक्षणातून राज्यात आतापर्यंत ६५ डेल्टा प्लस व्हेरीयंटचे रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंत राज्यात आढळलेल्या ६५ डेल्टा प्लस रुग्णांपैकी ३२ पुरुष असून ३३ स्त्रिया आहेत.

सर्वाधिक ३३ डेल्टा प्लस रुग्ण १९ वर्षे ते ४५ वर्षे वयोगटातील आहेत तर त्या खालोखाल ४६ ते ६० वर्षे वयोगटातील १७ रुग्ण आहेत. या मध्ये १८ वर्षांखालील ७ बालके असून ६० वर्षांवरील ८ रुग्ण आहेत.

६५ रुग्णांपैकी ज्या रुग्णांची माहिती आतापर्यंत प्राप्त झाली आहे त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यातील एक मृत्यू वगळता डेल्टा प्लस रुग्णांमधील आजाराचे स्वरुप सौम्य ते मध्यम स्वरुपाचे आहे.

विषाणूने आपली जनुकीय रचना बदलत राहणे, हा विषाणूच्या नैसर्गिक जीवनक्रमाचा भाग असून या संदर्भात जनतेने कोणतीही भीती न बाळगता कोविड अनुरुप वर्तनाचा अंगिकार करणे गरजेचे आहे, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

जनुकीय क्रमनिर्धारण हे प्रयोगशालेय सर्वेक्षणाचा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. हे जनुकीय क्रमनिर्धारण दोन प्रकारे करण्यात येत आहे

१) सेंटीनल सर्वेक्षण राज्यातील ५ प्रयोगशाळा आणि ५ रुग्णालयांची निवड सेंटीनल सेंटर म्हणून करण्यात आलेली आहे. हे प्रत्येक सेंटीनल सेंटर दर पंधरवडयाला १५ प्रयोगशालेय नमुने जनुकीय क्रमनिर्धारणासाठी राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था आणि राष्ट्रीय पेशी विज्ञान संस्था या पुणे स्थित संस्थांना पाठवते.

२) जनुकीय क्रमनिर्धारणासाठी सी. एस. आय. आर. सोबत समन्वय महाराष्ट्र शासनाने जनुकीय क्रमनिर्धारण सर्वेक्षणास गती मिळावी यासाठी कौंसिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रीयल रिसर्च संस्थे अंतर्गत काम करणाऱ्या इन्स्टिट्यूट ऑफ जिनोमिक्स अॅड इंटिग्रेटेड बायोलॉजी या प्रयोगशाळेसोबत करार केला असून या नेटवर्कद्वारे दर महिन्याला प्रत्येक जिल्ह्यातून १०० प्रयोगशाळा नमुन्यांची तपासणी करण्यात येते.

No comments

Powered by Blogger.