Header Ads

प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाची विक्री व वापर करु नये -जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन - stop sell and use of plastic national flag



प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाची विक्री व वापर करु नये -जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

वाशिम, दि. १२ (जिमाका) : १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन या राष्ट्रीय सणाच्या दिवशी विद्यार्थी व लहान मुले प्लास्टिकपासून तयार केलेले राष्ट्रध्वज खरेदी करतात. दुसऱ्या दिवशी हे राष्ट्रध्वज इतरत्र फेकून दिले जातात. तथापि प्लास्टिकपासून तयार झालेले हे राष्ट्रध्वज लवकर नष्ट होत नसल्यामुळे बरेच दिवस तसेच पडून राहतात. त्यामुळे आपल्या हातून नकळत राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. ते टाळण्यासाठी प्लास्टिकपासून बनलेल्या लहान राष्ट्रध्वजाची विक्री व वापर करु नये, असे आवाहन जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी केले आहे.

विविध कार्यालये,प्रतिष्ठाने, प्राधिकरणे व इतर संस्थांनी ध्वजारोहणाच्या वेळी राष्ट्रध्वज वापरण्याबाबत भारतीय संहितेमध्ये दिलेल्या तरतुदीचे काटेकोरपणे पालन करावे.तसेच वापरात उपयुक्त नसलेले,फाटलेले,जीर्ण व  खराब झालेले किंवा रस्त्यावर,मैदानात पडलेले राष्ट्रध्वज गोळा करून ते तालुका व जिल्हास्तरीय निर्माण करण्यात आलेल्या यंत्रणेकडे सुपुर्द करावेत. अशाप्रकारे गोळा केलेले राष्ट्रध्वज तालुका पातळीवर तहसील कार्यालय व जिल्हा पातळीवर जिल्हाधिकारी कार्यालय येथे जमा करावेत.यासाठी सर्व शाळा, महाविद्यालये, शासकीय व निमशासकीय कार्यालये, स्वयंसेवी संस्था, पालक व सर्वसामान्य नागरिकांनी प्रयत्न करावेत. असे आवाहन देखील जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

१५ ऑगस्ट २०२१ रोजी वाशिम येथील ध्वजारोहण कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात प्रमाणित वेळेनुसार सकाळी ९.०५ वाजता  होणार आहे. ज्या कार्यालयांना अथवा संस्थेला राष्ट्रध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करायचे असेल त्यांनी शासन परिपत्रकानुसार सकाळी ८.३५ वाजेपूर्वी किंवा सकाळी ९.३५ नंतर आयोजित करावा.सकाळी ८.३५ ते ९.३५ वाजता दरम्यान कोणत्याही कार्यालयाने अथवा संस्थेने ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करू नये, असे जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने कळविण्यात आले आहे.

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.