Header Ads

मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर Special brief revision program of voter list announced

Election commission of india

 

मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर

  • १ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध होणार प्रारूप मतदार यादी
  • ३० नोव्हेंबरपर्यंत दावे व हरकती स्वीकारणार

वाशिम, दि. ११ (www.jantaparishad.com) : भारत निवडणूक आयोगाने सर्व विधानसभा मतदार संघांच्या मतदार याद्यांचा १ जानेवारी २०२२ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित केला आहे. त्यानुसार ९ ऑगस्ट ते ३१ ऑक्टोबर २०२१ दरम्यान दुबार अथवा समान नोंदी, एकापेक्षा अधिक नोंदी, तार्किक त्रुटी दूर करणे, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याद्वारे घरोघरी भेट देवून तपासणी, पडताळणी, योग्यप्रकारे विभाग, भाग तयार करणे आणि मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण व प्रमाणीकरण करण्यात येणार आहे.

१ नोव्हेंबर २०२१ रोजी एकत्रिकृत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार असून १ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०२१ या कालावधीत दावे व हरकती स्वीकारण्यात येतील. प्रारुप मतदार याद्यांमध्ये ज्या पात्र मतदारांची नावे समाविष्ट केलेली नसतील, असे मतदार तसेच ज्यांचे वय १ जानेवारी २०२२ ला अठरा वर्ष पूर्ण होतील, अशा सर्व पात्र व्यक्तींना नाव नोंदणीसाठी विहित नमुन्यात अर्ज करु शकतील. तसेच या याद्यांतील नावांबाबत आक्षेप असतील किंवा त्यामध्ये दुरुस्ती, सुधारणा करावयाच्या असल्यासही दावे व हरकती प्रत्येक विधानसभा मतदारसंघांच्या मतदार नोंदणी अधिकारी (ईआरओ) व सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार यांच्या कार्यालयात स्वीकारल्या जाणार आहेत. तसेच संबंधित बीएलओ यांच्याकडे देखील अर्ज सादर करता येणार आहेत. २० डिसेंबर २०२१ पर्यंत दावे व हरकती निकालात काढण्यात येईल. तसेच ५ जानेवारी २०२२ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी दिली.

मतदार नोंदणीसाठी विशेष मोहीम

पुनरिक्षण कार्यक्रमादरम्यान प्रत्यक्ष मतदान केंद्रांच्या ठिकाणी दोन विशेष मोहिमांचे (स्पेशल कॅम्पेन) आयोजनही करण्याच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत. या दिवशी प्रत्येक मतदान केंद्रावर बीएलओ स्वतः हजर राहून अर्ज व छायाचित्र स्वीकारण्याची कार्यवाही करणार आहेत.

सर्व राजकीय पक्षांनी ‘बीएलए’ची नियुक्ती करावी

मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमासाठी सर्व राजकीय पक्षांनी प्रत्येक मतदान केंद्राकरीता त्यांच्या मतदान केंद्रस्तरीय अभिकर्त्याची (बूथ लेव्हल एजन्ट- बीएलए) नेमणूक करावी आणि शासनाच्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बूथ लेव्हल ऑफीसर- बीएलओ) यांच्या मदतीने मतदार याद्या अधिक अचूक व परिपूर्ण करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी षण्मुगराजन एस. यांनी केले आहे.

No comments

Powered by Blogger.