Header Ads

कोवीड- 19 संसर्गजन्य परिस्थीतीमुळे गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा होणार - Ganeshotsav 2021 will be celebrated in a simple manner in washim district due to corona


कोवीड- 19 संसर्गजन्य परिस्थीतीमुळे गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा होणार

जिल्हादंडाधिकारी षन्मुगराजन एस. यांचे आदेश 

वाशिम, दि. 24 (जिमाका) : राज्यात कोवीड- 19 च्या संसर्गजन्य परिस्थीतीचा विचार करता विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहे. त्यामुळे यावर्षीचा गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हयात कोराना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एकभाग म्हणून जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष षन्मुगराजन एस. यांनी जिल्हयातील गणेशोत्सव- 2021 च्या अनुषंगाने पुढील आदेश पारीत केले आहे.

सार्वजनिक गणेशोत्सवासाठी गणेशोत्सव मंडळांनी नगरपालीका/ नगरपंचायत/ स्थानिक प्रशासन यांची त्यांच्या धोरणानुसार पुर्व परवानगी घेणे आवश्यक आहे. कोवीड संसर्ग परिस्थीतीचा विचार करता नगरपालीका तसेच संबंधित स्थानिक प्रशासनाने मंडपाबाबतचे धोरण यांचेशी सुसंगत असे मर्यादित स्वरुपाचे मंडप उभारण्यात यावे. यावर्षीचा गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करणे अपेक्षीत असल्याने घरगुती तसेच सार्वजनिक गणपतीची सजावट करतांना त्यामध्ये भपकेबाजी नसावी.

सार्वजनिक मंडळाकरीता श्रीगणेशाची मुर्ती 4 फुट व घरगुती गणपतीकरीता 2 फुटाच्या मर्यादेत असावी. यावर्षी शक्यतो पारंपारीक गणेशमुर्ती ऐवजी घरातील धातू/संगमरवर आदी मुर्तीचे पुजन करावे. मुर्ती शाडूची/ पर्यावरण पुरक असल्यास त्याचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे. विसर्जन घरी करणे शक्य नसल्यास जवळच्या कृत्रिम विसर्जनस्थळी विसर्जन करावे. गणेशोत्सवाकरीता वर्गणी/देणगी स्वेच्छेने दिल्यास त्याचा स्विकार करावा. जाहिरातींच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही असे बघावे. आरोग्य विषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शीत करण्यास पसंती देण्यात यावी.

सांस्कृतीक कार्यक्रमाऐवजी आरोग्य विषयक उपक्रम/ शिबीरे आयोजित करण्यास प्राधान्य दयावे. त्याव्दारे कोरोना, मलेरीया, डेंग्यू इत्यादी आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय व स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात यावी. कोरोना संसर्ग साखळी तोडण्यासाठी वेळोवेळी लागू करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार निर्बंध कायम राहतील. गणेशोत्सवानिमित्त कोणतेही शिथीलता देता येणार नाही. आरती, भजन, किर्तन वा अन्य धार्मीक कार्यक्रम आयोजित करतांना गर्दी होणार नाही याची दक्षता घेवून प्रदूषणासंदर्भातील नियमांचे व तरतुदींचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे.

श्रीगणेशाच्या दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईड व फेसबुक इत्यादीव्दारे उपलब्ध करुन देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करण्यात यावी. गणेश मंडपामध्ये निर्जतुकीकरणाची तसेच थर्मल स्क्रिनींगची पर्याप्त व्यवस्था करण्यात यावी. प्रत्यक्ष येऊन दर्शन घेवू इच्छिणाऱ्या भाविकांसाठी शारिरीक अंतराचे तसेच स्वच्छतेचे नियम पाळण्याकडे विशेष लक्ष दयावे. श्रीच्या आगमन व विसर्जन मिरवणूका काढण्यात येवू नये. विसर्जनाच्या पारंपारीक पध्दतीने विसर्जनस्थळी होणारी आरती घरीच करुन विसर्जनस्थळी कमीत कमी वेळ थांबावे. लहाण मुले आणि वरिष्ठ नागरीकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जनस्थळी जाणे टाळावे. संपूर्ण इमारतीतील सर्व घरगुती गणेशमुर्तीच्या विसर्जनाची मिरवणूक एकत्रितरित्या काढण्यात येवू नये.

नगरपालीका, विविध मंडळे, गृहनिर्माण संस्था, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था इत्यादीच्या मदतीने गणेश मुर्तीच्या विसर्जनाकरीता कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात यावी. कोवीड-19 या विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकिय शिक्षण विभाग तसेच संबंधित नगरपालीका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहीत केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती, संस्था अथवा समूह आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अन्वये आणि भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 अन्वये शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल. असे जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, वाशिम यांच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.   

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.