Header Ads

सोयाबीन पिकावरील कीड, रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करा make preventive measures for soyabean from insect and diseases




सोयाबीन पिकावरील कीड, रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करा

वाशिम, दि. २२ जुलै २०२१ (www.jantaparishad.com) : जिल्ह्यात सोयाबीन पीक वाढीच्या अवस्थेत असून काही ठिकाणी फुलोरा अवस्थेत आहे.  अशातच मागील आठवड्यात पावसास सुरुवात झाली असून रिमझिम पाऊस आणि सतत ढगाळ वातावरणामुळे सोयाबीन पिकावर ताबेंरा, पानावरील ठिपके यासारख्या बुरशीजन्य रोगांचा, तसेच पाने खाणाऱ्या अळीचा, रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या पिकावरील कीड व रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार यांनी केले आहे.

हिरवी अळी व तंबाखूवरील पाने खाणाऱ्या अळीच्या प्रादुर्भावाची पातळी समजण्यासाठी सर्वेक्षणाकरीता प्रति हेक्टरी हिरवी अळीसाठी ५ व तंबाखूवरील पाने खाणाऱ्या अळीसाठी ५ कामगंध सापळे शेतामध्येत लावावेत. तसेच इंग्रजी  ‘टी’ आकाराचे हेक्टरी १० ते १५ पक्षी थांबे शेतात लावावेत. पेरणीनंतर २५ दिवसापर्यंत ५ टक्के निंबोळी अर्काची पहीली फवारणी करावी. निरीक्षणे घेण्याकरीता हेक्टरी ५ कामगंध सापळे लावून नियमित नि‍रीक्षणे घ्यावीत व आर्थिक नुकसान पातळीच्यावर किडीची संख्या आढळल्याक तत्काळ शिफारस केलेल्या किटकनाशकाची फवारणी करावी.

चक्रीभुंगा प्रति मिटर ३ ते ४ अळ्या, खोडमाशी १० टक्के प्रादुर्भावग्रस्त  झाडे, हिरवी उंट अळी ४ लहान अळ्या प्रति मिटर ओळीत, स्पोडोप्टेरा (तंबाखुवरील पाने खाणारी अळी) ३ ते ४ अळ्या प्रति मिटर ओळीत यापेक्षा जास्त आढळल्यास नियंत्रणासाठी उपाययोजना कराव्यात. त्यानंतर तंबाखुवरील पाने खाणाऱ्या (स्पोडोप्टेरा) अळीच्या व्यवस्थापनासाठी एस.एल.एन.पी.व्ही. ५०० एल ई विषाणूची २ मिली प्रति लिटर पाणी किंवा नोमोरीया रिलाई या बुरुशीची ४ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. रासायनिक घटकांची फवारणी करत असतांना शेतकरी बंधूनी सर्व सुरक्षा विषयक किटचा वापर करावा. वारा शांत असतांना सकाळी किंवा सायंकाळी फवारणी करावी. फवारणी करीत असतांना धुम्रपान किंवा मद्यपान करु नये.

जिल्ह्यात सतत पाऊस सुरु असून काही ठिकाणी शेतामध्ये पाणी साचल्याचे आढळून येत आहे. त्यामुळे सोयाबीन पीक पिवळे पडत असून वाढ खुंटताना दिसत आहे. अशा ठिकाणी साचलेले पाणी शेताबाहेर काढून द्यावे. वापसा येताच खुरपणी करावी.

काही भागात सोयाबीन तसेच इतर संत्रावर्गीय फळझाडावर गोगलगायीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. गोगलगाय हा मृदकाय व उदरपाद वर्गात येणारा प्राणी आहे. गोगलगायीच्या शरीरावर कवच असते, यालाच शंख म्हणतात. गोगलगायीचे नियंत्रण मोहीम स्वरुपात सर्व शेतकऱ्यांनी एकाच वेळी केल्यास चांगल्या पध्दतीने नियंत्रण करता येते. नियंत्रणाकरीता मशागतीय पध्दत, रासायनिक पध्दत, जैविक पध्दतीचा अवलंब करावा. गोगलगायी मुख्यतः रात्रीच्या वेळी कोवळे पाने, कंद फळे यांना छिद्र पाडून खातात. त्यामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते.

महाराष्ट्रात गोगलगायी प्रामुख्यानने जुन ते सप्टेंबर या काळात अत्यंत सक्रिय असतात व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. हा उपद्रव टाळण्यासाठी शेता भोवती दोन मीटर रुंदीच्या पट्टया राख पसरावी व त्यावर मोरचुद व कळीचा चुना २ : ३ प्रमाणात मिसळून त्याचा थर राखेवर द्यावा. अशा ठिकाणी गोगलगाय येत नाही. उन्हाळ्यात जमीनीची खोलवर नांगरट करावी, प्रादुर्भावग्रस्त क्षेत्रात कोंबड्या सोडाव्यात. प्रादुर्भावग्रस्त शेतात ठराविक अंतरावर गवताचे छोटे-छोट ढिग करावे. त्याखाली गोगलगायी जमा होतील व जमा झालेल्या गोगलगायी नष्ट  कराव्यात. १५ टक्के मिठाचे द्रावण करुन त्यातमध्ये गोणपाटाचे तुकडे भिजवुन प्रादुर्भावग्रस्त भागामध्ये एकरी दहा गोणपाट ठेवावे. म्हणजे दिवसा गोगलगायी गोणपाटाखाली लपण्याकरीता येतील व मिठाच्यात संपर्कात आल्यामुळे नष्ट होतील. संत्रावर्गीय फळझाडाला दरवर्षी बोर्डोपेस्ट लावावे. फळझाडाच्या खोडास पत्र्याचे अडथळे निर्माण केल्यास गोगलगायी झाडावर चढणार नाहीत. तसेच लसणाचा अर्क काढून फवारणी केल्यास गोगलगायीचे नियंत्रण करता येते. रासायनिक पध्दतीने नियंत्रण करावयाचे झाल्यास वेगवेगळ्या कंपन्यांचे स्नेयलकिलर बाजारात उपलब्ध‍ आहेत, त्याचा वापर करावा, असे आवाहन श्री. तोटावार यांनी केले आहे.

सोयाबीन पिकावरील किडींसाठी शिफारशीत किटकनाशके

अ.क्र.

किडी

किटकनाशक

प्रमाण/ एकर (२००लिटर पाणी)

पाने खाणाऱ्या अळ्या

 (उंट अळी, केसाळ अळी, घाटे अळी, तंबाखुवरील पाने खाणारी अळी)

प्रोफेनोफोस ५० ई.सी. किंवा

४०० मिली

क्‍लोरॅनट्रानीलीप्रोल १८.५ एस.सी. किंवा

६० मिली

इन्‍डोक्‍झाकार्ब १५.८ ई.सी.

१४० मिली

चक्री भुंगा (गर्डल बिटल)

क्‍लोरॅनट्रानीलीप्रोल १८.५ एस.सी. किंवा

६० मिली

थायक्‍लोप्रीड २१.७ एस.सी. किंवा

३०० मिली

इथीऑन ५० ईसी किंवा

६०० मिली

थायमिथाक्‍झाम १२.६ + लॅमडा साहॅलोथ्रीन ९.५ झेड.सी.

५० मिली

खोडमाशी (स्‍टेमफ्लाय)

क्‍लोरॅनट्रानीलीप्रोल १८.५ एस.सी. किंवा

६० मिली

इथीऑन ५० ईसी किंवा

६०० मिली

गोगलगाय(स्‍नेल)

ऑर्यन फॉस्‍फेट किंवा मेटाअल्‍डेहेड्स २.५ टक्‍के

 

१५ टक्‍के मिठाच्‍या द्रावणाची फवारणी

 

लसून अर्क काढुन फवारणी करणे

 

 

सोयाबीन पिकावरील रोगांसाठी शिफारशीत बुरशीनाशके

अ.क्र.

रोग

बुरशीनाशक

मात्रा १० लिटर पाण्‍यात

ताबेंरा

हेक्‍साकोनाझोल ५ टक्‍के इ.सी. किंवा

१० ग्रॅम

क्रसॉक्‍सीम मिथील ४४.३ एस.सी.

१० मिली

प्रोपीकोनाझोल २५% ई.सी

१० ग्रॅम

पानावरील ठिपके किंवा शेंगावरील करपा

पायरॅक्‍लास्‍ट्रॉबीन २०% डब्‍लु. जी.

८ ते १० ग्रॅम

टेब्‍युकोनाझोल २५.९% ई.सी.

१२ मिली

टेब्‍युकोनाझोल १०% + सल्‍फर ६५% डब्‍लु जी

२५ ग्रॅम

     

 

******

No comments

Powered by Blogger.