Header Ads

कोरोना संसर्गापासून बचावासाठी लस घेणे आवश्यक - जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर - 27 vaccination is must to avoid corona infection



कोरोना संसर्गापासून बचावासाठी लस घेणे आवश्यक - जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर

वाशिम, दि. २७ (www.jantaparishad.com) : कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेंतर्गत जिल्ह्यात १८ वर्षांवरील सर्व व्यक्तींचे लसीकरण सुरु आहे. याकरिता कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन या दोन लसी उपलब्ध करून देण्यात आल्या असून दोन्ही लसी सुरक्षित आहेत. कोव्हॅक्सिन लसीचा दुसरा डोस २८ दिवसानंतर, तसेच कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस ८४ दिवसांनी दिला जातो. कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी पुरेशी रोगप्रतिकारकशक्ती तयार होण्यासाठी लसीचे दोन्ही डोस घेणे आवश्यक आहे. तरी पात्र व्यक्तींनी आपल्या नजीकच्या लसीकरण केंद्रावर जावून उपलब्ध लस घ्यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांनी केले आहे.

कोरोनापासून बचाव करण्यासाठी कोरोनावरील लस हा प्रभावी उपाय आहे. त्यामुळे कोरोना संसर्गाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी जिल्ह्यात जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्यावर भर दिला जात आहे. लसीबद्दल मनात असलेला गैरसमज दूर करून १८ वर्षावारील प्रत्येकाने कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी पुढे यावे. कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड या दोन्ही लसी सुरक्षित असून त्या सारखेच काम करतात. रुग्णाला लस दिल्यानंतर दोन्ही लसीचा फायदासुद्धा एकसारखाच होतो. कोरोना लसीसंदर्भात पसरत असलेल्या अफवांवर विश्वास ठेवू नका. ज्यांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे, त्यांनी विहित कालावधीत दुसरा डोस घेवून स्वतःला सुरक्षित करावे. तसेच अद्याप एकही डोस न घेतलेल्या नागरिकांनी नजीकच्या लसीकरण केंद्रावर जावून लस घ्यावी.

कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर कोरोना विषाणू संसर्गाशी लढण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती आपल्या शरीरात निर्माण होते. पुरेशा प्रमाणात रोगप्रतिकारशक्ती निर्माण होण्यासाठी लसींचे दोन्ही डोस विहीत कालावधीत घेणे गरजेचे आहे. त्यामुळे कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस घेतलेल्या नागरिकांनी २८ दिवसानंतर कोव्हॅक्सिन लसीचा दुसरा डोस, तसेच कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेतलेल्या नागरिकांनी ८४ दिवसांनी कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस घ्यावा. जिल्ह्यात सध्या पहिल्या व दुसऱ्या डोससाठी पुरेशा लसी उपलब्ध आहेत, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आहेर यांनी सांगितले.

No comments

Powered by Blogger.