१४ जून पासून जिल्ह्यात लागू होणार नवीन नियमावली new rule from 14 june in Washim district
१४ जून पासून जिल्ह्यात लागू होणार नवीन नियमावली
- ‘ब्रेक दि चेन’ अंतर्गत लागू केलेले निर्बंध हटविले
- आस्थापना, दुकाने नियमितपणे सुरु करण्यास मुभा
- मॉल, सिनेमागृहे ५० टक्के क्षमतेने सुरु होणार
- सर्व आस्थापना, दुकानातील कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी बंधनकारक
वाशिम, दि. ११ (जिमाका) : जिल्ह्याचा ‘पॉझिटिव्हीटी रेट’ २.२५ टक्केपर्यंत असून फक्त ९.०१ टक्के ऑक्सिजन बेडवर रुग्ण उपचार घेत आहेत. जिल्ह्याचा समावेश राज्य शासनाने जारी केलेल्या नियमावलीनुसार पहिल्या टप्प्यात होत आहे. त्यामुळे ‘ब्रेक दि चेन’ अंतर्गत लागू करण्यात आलेले निर्बंध हटविण्यात आले असून १४ जून २०२१ पासून पुढील आदेशापर्यंत जिल्ह्यात नवीन नियमावली लागू करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी आज, ११ जून रोजी निर्गमित केले आहेत.
या आदेशानुसार अत्यावश्यक सेवा व इतर सेवांची दुकाने नियमित सुरु राहतील. या दुकानांमधील गर्दी कमी करण्याच्यादृष्टीने जास्तीत जास्त ‘होम डिलिव्हरी’द्वारे वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी दुकानदारांनी नियोजन करावे. त्याकरित दुकानदारांनी स्वतःचा व्हॉटसअप क्रमांक दर्शनी भागात प्रसिद्ध करावा. तसेच ग्राहकांचे व्हॉटसअप कार्मांक घेवून त्यांना घरपोच वस्तू पुरवठा करण्यास प्राधान्य द्यावे. तसेच दुकानांमध्ये ग्राहकांशी बोलतांना सुरक्षेच्या उपाययोजना म्हणून पारदर्शक काच, प्लास्टिक कव्हर किंवा इतर शिल्ड साहित्य ठेवावे. तसेच इलेक्ट्रॉनिक पेमेंट पद्धतीचा वापर करावा. दुकानासमोर ग्राहकांना योग्य सामाजिक अंतर राखून उभे राहण्यासाठी स्पष्ट दिसतील असे वर्तुळ करण्यात यावे. दुकानासमोर पार्किंगच्या जागेत व ओट्यावर साहित्य ठेवण्यात येवू नये. जेणेकरून याठिकाणी ग्राहकांना उभे राहता येईल व गर्दी होणार नाही.
कोविड त्रिसूत्रीचे पालन होण्याच्या अनुषंगाने व दोन व्यक्तींमध्ये योग्य सामाजिक अंतर राहण्यासाठी सिनेमागृहे ५० टक्के क्षमतेने सुरु करण्यास मुभा देण्यात आली आहे. ज्या खुर्च्यांचा वापर करावयाचा नाही, त्या खुर्च्यांना सेलोटेप, रिबन व स्टीकर लावून त्या वापरत नाहीत, असे दर्शविणे बंधनकारक आहे. तसेच सिनेमागृहात गर्दी होणार नाही, याची दक्षता ग्घेने आणि नियमित निर्जंतुकीकरण करणे बंधनकारक राहील व याची जबाबदारी व्यवस्थापकाची राहील.
रेस्टॉरंट नियमित सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, याठिकाणी गर्दी होणार नाही, ह्याची दक्षता रेस्टॉरंट मालक, चालकांनी घ्यावी. तसेच नियमित निर्जंतुकीकरण करणे बंधनकारक असून दोन ग्राहकांमध्ये सुरक्षित सामाजिक अंतर राखण्याच्यादृष्टीने आसनांची रचना करावी. रेस्टॉरंट मालक, चालकांनी स्वतःचा व्हॉटसअप क्रमांक दर्शनी भागात प्रसिद्ध करावा. तसेच ग्राहकांचे व्हॉटसअप क्रमांक घेवून त्यांना घरपोच वस्तू पुरवठा करण्यास प्राधान्य द्यावे. जेणेकरून रेस्टॉरंटमधील गर्दी कमी होईल.
जीम, सलून, ब्युटी पार्लर, स्पामध्ये गर्दी होणार नाही, याची दक्षता घ्यावी. ग्राहकांना टोकन पद्धतीने, मोबाईल एस.एम.एस., व्हॉटसअप संदेशाद्वारे सेवेबाबत माहिती द्यावी. जेणेकरून आस्थापनेमध्ये गर्दी होणार नाही. याठिकाणी कोविड त्रिसूत्रीचे पालन, सॅनिटायझर किंवा हँडवॉशने नियमित हातांची स्वच्छता बंधनकारक राहील. प्रत्येक ग्राहकानंतर खुर्ची व वापरण्यात येणाऱ्या साहित्याचे निर्जंतुकीकरण करणे बंधनकारक राहील.
कोविड त्रिसूत्रीचे पालन, सॅनिटायझर किंवा हँडवॉशने हातांच्या नियमित स्वच्छतेच्या अटीवर कृषि विषयक बाबी, बांधकामे, ई-कॉमर्स व्यवहार, सार्वजनिक वाहतूक, कार्गो वाहतूक, निर्यातक्षम क्षेत्रातील उद्योग नियमित सुरु राहतील. आंतर जिल्हा प्रवास नियामिपणे सुरु राहील. मात्र, २० टक्केपेक्षा अधिक ‘पॉझिटिव्हीटी रेट’ असलेल्या जिल्ह्यातून येतांना ई-पास बंधनकारक राहील.
मैदाने सुरु ठेवण्यास मुभा; मात्र नियमांचे पालन बंधनकारक
सार्वजनिक जागा, खुली मैदाने, वॉकिंग, सायकलिंग नियमित सुरु राहील. मात्र सामाजिक अंतर विषयक नियमांचे पालन करणे तसेच कोविड प्रतिबंधात्मक वर्तणूक (कोविड अॅप्रोप्रीएट बिहेविअर) व कोविड त्रिसूत्रीचे पालन करणे बंधनकारक राहील. एकाच ठिकाणी जास्त गर्दी होणार नाही, याची दक्षता नागरिकांनी घ्यावी. शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पात्र नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, तसेच कोविड सदृश्य लक्षणे असणाऱ्या नागरिकांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार कोविड चाचणी करून घ्यावी. तसेच आवश्यक उपचार घ्यावेत, सार्वजनिक जागा, खुली मैदाने इत्यादी ठिकाणी बाहेर जाणे टाळावे. सार्वजनिक जागा, खुली मैदाने, वॉकिंग, सायकलिंगसाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांकडून नियमाचे पालन होत असल्याची दक्षता संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांनी घ्यावी, लोकांना नियमांचे पालन करण्याबाबत सूचित करावे. तसेच आवश्यकता असल्यास उचित दंडात्मक कारवाई करण्याचे आदेशित करण्यात आले आहे.
क्रीडासंबंधित बाबी नियमित सुरु राहतील. मात्र, एकाच ठिकाणी गर्दी होणार नाही, याची दक्षता खेळाडूंनी घ्यावी. पुढील आदेशापर्यंत प्रेक्षकांची गर्दी करून क्रीडा स्पर्धांचे आयोजन करता येणार नाही. खेळाडूंना खेळण्यासाठी प्रतिबंध राहणार नाही, परंतु कोविड प्रतिबंधात्मक वर्तणूकचे पालन करणे बंधनकारक राहील. क्रीडा विभाग व संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था यांनी नियमांचे पालन होण्याच्या अनुषंगाने आवश्यक दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
सभागृहाच्या ५० टक्के क्षमतेत सांस्कृतिक कार्यक्रम, समारंभ, शासकीय बैठकांना मुभा
सांस्कृतिक कार्यक्रम, समारंभ यांना सभागृह, हॉलच्या एकूण आसन क्षमतेच्या ५० टक्के क्षमतेने परवानगी राहील. हॉलमधील ज्या खुर्च्यांचा वापर करावयाचा नाही, त्या खुर्च्यांना सेलोटेप, रिबन व स्टीकर लावून त्या वापरात नाहीत, असे दर्शविणे बंधनकारक करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी गर्दी होणार नाही, याची दक्षता घ्यावी. कोविड त्रिसूत्रीचे पालन, सॅनिटायझर किंवा हँडवॉशने नियमित हातांची स्वच्छता बंधनकारक राहील.
कोविड त्रिसूत्रीचे पालन होण्याच्या अनुषंगाने हॉलमध्ये ५० टक्के आशान क्षमतेने शासकीय कार्यालयांच्या स्थानिक बैठका, निवडणूक कार्यक्रम घेता येईल. हॉलमधील ज्या खुर्च्यांचा वापर करावयाचा नाही, त्या खुर्च्यांना सेलोटेप, रिबन व स्टीकर लावून त्या वापरात नाहीत, असे दर्शविणे बंधनकारक राहील. बैठका, निवडणूक कार्यक्रमांच्या ठिकाणी गर्दी होणार नाही, याची दक्षता घ्यावी. कोविड त्रिसूत्रीचे पालन, सॅनिटायझर किंवा हँडवॉशने नियमित हातांची स्वच्छता बंधनकारक राहील.
लग्न समारंभात ५० व्यक्ती, अंत्यविधीला २० व्यक्तींना उपस्थित राहण्यास मुभा
लग्न समारंभ ५० व्यक्तींच्या उपस्थितीत नियमित सुरु राहतील. या उपस्थितीच्या मर्यादेत मंगल कार्यालये, हॉल, लॉन तसेच घरी लग्न समारंभ आयोजित करता येतील. मंगल कार्यालये, हॉल, लॉन येथे सामाजिक अंतर राखण्याच्यादृष्टीने ज्या खुर्च्यांचा वापर करावयाचा नाही, त्या खुर्च्यांना सेलोटेप, रिबन व स्टीकर लावून त्या वापरात नाहीत, असे दर्शविणे बंधनकारक करण्यात आले आहे. अंत्ययात्रेला २० व्यक्तींच्या उपस्थितीत मुभा देण्यात आली असून या काळात कोविड त्रिसूत्रीचे पालन, सॅनिटायझर किंवा हँडवॉशने नियमित हातांची स्वच्छता बंधनकारक राहील.
या नियमांचे उल्लंघन केल्यास दुकाने, आस्थापनांवर होणार दंडात्मक कारवाई
अत्यावश्यक सेवा व इतर सेवांची दुकाने, सिनेमागृहे, मॉल, रेस्टॉरंट, सभागृह, मंगल कार्यालये, लॉनचे मालक, चालक तसेच येथे काम करणारे कर्मचारी व होम डिलिव्हरी सेवा पुरविणारे सर्व कर्मचारी यांनी लसीकरण करून घेणे अथवा कोविड चाचणी निगेटिव्ह असल्याचा अहवाल सोबत बाळगणे बंधनकारक राहील. कोविड चाचणीचा अहवाल १५ दिवसांसाठी वैध राहील. लसीकरण केले नसल्यास किंवा कोरोना चाचणी अहवाल सोबत नसल्यास पहिल्या वेळेस १०० रुपये दंड व त्यानंतर प्रत्येक वेळेस २०० रुपये दंड आकरण्यात येईल.
अत्यावश्यक सेवा व इतर सेवांची दुकाने, सिनेमागृहे, मॉल, रेस्टॉरंट, जीम, सलून, ब्युटी पार्लर, स्पाचे मालक, चालक तसेच येथे काम करणारे कर्मचारी, ग्राहक अथवा तेथे येणारी प्रत्येक व्यक्ती यांनी मास्क लावणे, सामाजिक अंतर, सॅनिटायझर किंवा हँडवॉशने नियमित हातांची स्वच्छता इत्यादी कोविड त्रिसूत्रीचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक राहील. या नियमांचे उल्लंघन केल्यास पहिल्या वेळेस ५ हजार रुपये दंड व त्यानंतर प्रत्येक वेळेस १० हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. तसेच सभागृह, मंगल कार्यालये, लॉनमध्ये या नियमांचे उल्लंघन झाल्यास पहिल्यांदा २५ हजार रुपये व त्यानंतर प्रत्येक वेळेस ५० हजार रुपये दंड आकारण्यात येईल व योग्य प्रशासकीय कारवाई करण्यात येईल.
‘नो मास्क, नो एन्ट्री’चा फलक दर्शनी भागात लावा
अत्यावश्यक सेवा व इतर सेवांची दुकाने, सिनेमागृहे, मॉल, रेस्टॉरंट, सभागृह, मंगल कार्यालये, लॉन, जीम, सलून, ब्युटी पार्लर, स्पा आदी ठिकाणी दर्शनी भागात ‘नो मास्क, नो एन्ट्री’ (मास्क नाही, प्रवेश नाही) असे बोर्ड, फलक लावून नागरिकांना कोविड त्रिसूत्रीचे पालन करण्याचे आवाहन करावे, असे आदेशात म्हटले आहे.
प्रत्येक व्यक्तीने मास्कचा वापर करणे बंधनकारक
‘ब्रेक दि चेन’ अंतर्गत निर्बंउध उठविले असले तरी प्रत्येक व्यक्तीने मास्कचा वापर करणे बंधनकारक राहणार असून मास्कचा वापर न करणाऱ्याकडून ५०० रुपये दंड वसूल केला जाईल. नगरपरिषद, नगरपंचायत व ग्रामपंचायत यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात सुरु असलेल्या अत्यावश्यक व इतर सेवांच्या दुकानदाराकडून वस्तूंची विक्री ‘होम डिलिव्हरी’द्वारे जास्तीत जास्त प्रमाणत होईल, यासाठी नियोजन करावे. यामध्ये ग्रामस्तरीय समिती व शहरातील प्रभागस्तरीय समिती यांनी सक्रीयरीत्या काम करून जास्तीत जास्त ग्राहक ‘होम डिलिव्हरी’ व इतर सेवांचा लाभ घेतील, याबाबत कार्यवाही करावी. याकरिता आवश्यकतेनुसार स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य घ्यावे.
Post a Comment