लसीबाबत गैरसमज न बाळगता पात्र व्यक्तींनी उपलब्ध लस घ्यावी - डॉ अविनाश आहेर don't follow Misconceptions about vaccines
लसीबाबत गैरसमज न बाळगता पात्र व्यक्तींनी उपलब्ध लस घ्यावी - जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अविनाश आहेर
वाशिम, दि. ०२ (जिमाका) : जागतिक महामारी ठरलेल्या कोरोना या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जगातील अनेक देशातील वैज्ञानिक संशोधकांनी दिवस-रात्र मेहनत संशोधनाअंती कोरोनाला प्रतिबंध करणारी लस तयार केली. कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी लसीकरणासाठी पात्र व्यक्तींनी पहिला कोरोना प्रतिबंध लसीचा डोज घेतांना लसीबाबत गैरसमज न करता लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेली लस घ्यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांनी केले आहे.
पहिल्यांदा लस घेणाऱ्या पात्र व्यक्तीने मला कोविशिल्ड किंवा कोवॅक्सिन यापैकी कोणत्या एका लसीचा आग्रह धरू नये, असे सांगून डॉ आहेर म्हणाले, कारण ह्या दोन्ही लसी कोरोना प्रतिबंधक आहे. ज्यांनी पहिला डोज ज्या लसीचा घेतला आहे, त्यांनी त्याच लसीचा दुसरा डोज घेणे आवश्यक आहे. पहिल्यांदा जे पात्र व्यक्ती लस घेतात ते लस घेताना एका विशिष्ट लसीचा आग्रह धरतात हे अत्यंत चुकीचे आहे. कारण सध्या आपल्याकडे उपलब्ध असलेल्या दोन्ही लसीमध्ये कोरोनाला प्रतिबंध करण्याची क्षमता जवळपास सारखीच आहे. कुणाच्या सांगण्यावरून तशी आपली मानसिकता तयार करून आपण हीच लस घेतली पाहिजे, असा आग्रह धरणे चुकीचे असल्याचे ते म्हणाले.
जिल्ह्यात ग्रामीण व शहरी भागात पात्र व्यक्तींसाठी लसीकरण शिबिरे आयोजित करण्यात येत आहे. तेव्हा पात्र व्यक्तींनी लसीकरण केंद्रावर पहिल्यांदा लस घेताना जी लस उपलब्ध आहे ती घ्यावी. त्याबाबत कोणतेही गैरसमज करून घेऊ नये.
कोविशिल्ड लसीचा पहिला डोज घेतल्यानंतर दुसरा डोज ८४ दिवसांनी घ्यायचा आहे. तर कोवॅक्सिन पहिला डोज घेतल्यानंतर दुसरा डोज २८ दिवसानंतर घ्यायचा आहे. सध्या जिल्ह्यात ४५ वर्षावरील पात्र व्यक्तींचे लसीकरण करण्यात येत आहे. पहिल्यांदा जे पात्र व्यक्ती लसीकरण करणार आहेत त्यांनी आपल्या नजीकच्या लसीकरण केंद्रावर जाऊन उपलब्ध असलेल्या लसीचा डोज घ्यावा. लसीबाबत गैरसमज करून घेऊ नये. ज्या पात्र व्यक्तींनी पहिला डोज ज्या लसीचा घेतला असेल त्याच लसीचा दुसरा डोज ठराविक दिवसानंतर घ्यावा. जिल्ह्यात कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी पात्र व्यक्तींनी लस घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांनी केले आहे.
Post a Comment