सोयाबीन पेरणीची घाई करू नका ! - वाशिम जिल्हा कृषि विभागाचे आवाहन do not hurry to sow soybeans
सोयाबीन पेरणीची घाई करू नका ! - वाशिम जिल्हा कृषि विभागाचे आवाहन
८० ते १०० मि.मी. पाऊस पडल्यानंतरच पेरणी करा
वाशिम, दि. ०७ (जिमाका) : खरीप हंगामामध्ये सोयाबीन पिकाची पेरणी करताना शेतकऱ्यांनी काळजी घेणे आवश्यक आहे. जो पर्यंत जिल्ह्यामध्ये ८० ते १०० मि.मी. पाऊस पडत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणी करू नये, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार यांनी केले आहे.
कृषि विद्यापीठाच्या निर्देशानुसार बियाणे उगवणीसाठी जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असणे गरजेचे आहे. त्यासाठी सरासरी ८० ते १०० मि.मी. पाऊस पडणे आवश्यक आहे. यापेक्षा कमी पाऊस पडल्यानंतर शेतकऱ्यांनी पेरणी केल्यास पुरेशा प्रमाणात ओलावा नसल्याने जमिनीच्या उष्णतेमुळे बियाणे अतिशय कमी प्रमाणात अंकुरते व बियाणे जाळण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुपार बियाणे पेरण्याची वेळ येवू शकते. यामध्ये त्यांचे पैसे आणि वेळ पण अधिक खर्च होतो, याचा विपरीत परिणाम उत्पादनावर होवून उत्पादनात घट होते.
बियाण्याची उगवण क्षमता तपासा; बीजप्रक्रिया करा
शेतकऱ्यांनी पेरणी करतांना बियाण्याची उगवण क्षमता तपासणे तसेच बीजप्रक्रिया करणे अत्यंत महत्वाचे आहे. पारंपारिक पेरणी पद्धतीला फाटा देवून आधुनिक पेरणी पद्धतीचा अवलंब करावा. जसे, पेरणी करतांना बी.बी.एफ. यंत्राचा वापरा करावा, जेणेकरून बियाणे योग्य खोलीवर आणि अंतरावर पडते. त्यामुळे एकसमान उगवण होते, पिकला पावसाचे योग्य पाणी मिळते. तसेच कमी पाण्यात पिक तग धरून राहते, असे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार यांनी म्हटले आहे.
Post a Comment