Header Ads

वाशिम, दि. २७ - कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांची माहिती ३१ मे पर्यंत संकलित करा - जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. washim District level task force review meeting

कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांची माहिती ३१ मे पर्यंत संकलित करा - जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.

जिल्हास्तरीय कृती दलाची आढावा बैठक

washim District level task force review meeting

वाशिम, दि. २७ (जिमाका) : कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे पालकांचा मृत्यू झाल्याने अनाथ झालेल्या १८ वर्षाच्या आतील बालकांची माहिती ३१ मे पर्यंत संकलित करावी. जेणेकरून अशा बालकांची काळजी घेण्यासाठी घेण्यासोबतच त्यांचे न्याय हक्क मिळवून देणे, योग्य प्रकारे संगोपन करण्याची कार्यवाही करणे शक्य होईल, असे जिल्हाधिकारी षन्मुगराजन एस. यांनी सांगितले. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर गठीत जिल्हा कृती दलाच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात आज, २७ मे रोजी झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक वसंत परदेशी, सहायक जिल्हाधिकारी कुलदीप जंगम, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, जिल्हा नगर पालीका प्रशासन अधिकारी दिपक मोरे, जिल्हा बाल कल्याण समितीच्या अध्यक्ष डॉ. जयश्री गुट्टे, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) संजय जोल्हे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक बोंद्रे, प्रभारी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी भगवान ढोले, समितीचे सचिव तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुभाष राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती.

१८ वर्षाच्या आतील बालकांच्या पालकांचा जिल्ह्यात आणि जिल्हाबाहेर कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, त्यांचा शोध घेण्याची जबाबदारी जिल्हा शल्य चिकित्सकांनी अन्य जिल्हयातील जिल्हा शल्य चिकित्सकांशी समन्वय साधून पार पाडावी, असे सांगून जिल्हाधिकारी षन्मुगराजन एस. म्हणाले, जिल्हा परिषदेचा पंचायत विभाग आणि शहरी भागातील नगरपालीकांनी कोरोनामुळे पालक गमावल्यामुळे अनाथ झालेल्या बालकांचा शोध घेण्यासाठी योग्य प्रकारे सर्व्हेक्षण करुन त्या बालकांचा शोध घ्यावा. नगरपरिषदेकडे कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींची नोंद असल्याने त्या कुटूंबाचा शोध घेवून त्यांची १८ वर्षाच्या आतील बालके अनाथ झाली असल्यास माहिती संकलीत करुन माहिला व बाल कल्याण विभागाला द्यावी. तसेच महिला व बाल कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी देखील त्या कुटूंबाला भेट देवून माहिती घ्यावी, असे त्यांनी सांगितले.


जिल्हाधिकारी षन्मुगराजन एस. म्हणाले, कोरोनाच्या संसर्गामुळे ज्या महिलेच्या पतीचा मृत्यू झाल्याने बालकांच्या व महिलेच्या उदरनिर्वाहचा प्रश्न निर्माण झाला असेल तर त्या महिलेला उपजिविकेची साधने उपलब्ध करुन देण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण देवून त्यांना स्वयंरोजगार उपलब्ध करुन द्यावा. कोरोनामुळे आई वडिलांचा किंवा दोघापैकी एकाचा मृत्यू झाला असेल अशा बालकांची नावे व यादी तातडीने तयार करावी. त्यामुळे त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देणे सोईचे होईल. गावपातळीवर अनाथ बालकांचा शोध घेण्यासाठी अंगणवाडी सेविकेने योग्य प्रकारे काम करावे, असे ते म्हणाले.

जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्री. राठोड म्हणाले, जिल्हयातील प्रत्येक कोविड सेंटरमध्ये १८ वर्षाखालील बालकांच्या संरक्षणासाठी व त्यांच्या हितासाठी चाईल्ड हेल्पलाईनचा १०९८ हा टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक आहे. सद्यास्थितीत जिल्ह्यातील सर्व कोविड सेंटरमधून कोविडमुळे ज्यांचे एक पालक मृत्यू पावले असे १६ बालके तर ज्यांचे दोन्ही पालक मृत्यू पावले असे ५ बालके अशी एकूण २१ बालकांची माहिती प्राप्त झाली आहे. चाईल्ड लाईन मार्फत गृहचौकशी करुन त्यांना बाल संगोपन योजना मंजूर करण्यात आली आहे. सद्यस्थितीत सर्व बालके नातेवाईकांकडे राहत असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाच्या संसर्गामुळे १८ वर्षाच्याआतील बालकांना आपले आई-वडिल किंवा यापैकी एक पालक गमावण्याची वेळ आली आहे, त्या बालकांचा शोध ग्रामपंचायत स्तरावर व गावपातळीवर ग्रामपंचायत आणि अंगणवाडी सेविकेच्या माध्यमातून घेण्यात येत आहे. ती यादी येत्या ३१ मे पर्यंत उपलब्ध होणार असल्याची माहिती श्री. जोल्हे व श्री बोंद्रे यांनी दिली.

बैठकीला चाईल्ड लाईनचे समन्वयक महेश राऊत, संरक्षण अधिकारी आलोक अग्रहरी, एम.के. जऊळकर यांची उपस्थिती होती.   

No comments

Powered by Blogger.