Header Ads

वाशिम दि ०५ मे २०२१ - जिल्ह्यात बँक कामकाजाबाबत सुधारित आदेश जारी - bank timings revised in district

वाशिम जिल्ह्यात बँक कामकाजाबाबत सुधारित आदेश जारी
दुध संकलन व विक्रीच्या वेळेतही बदल

वाशिम, दि. ०५ (जिमाका) : कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात १५ मे रोजीच्या सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. संचारबंदीच्या नियमावलीमध्ये बदल करून जिल्ह्यातील सर्व बँका सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत आणि ‘एटीएम’ मशीन सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. तसेच बँकांमधील गर्दी टाळण्यासाठी खाते क्रमांकाच्या शेवटच्या अंकानुसार ग्राहकांना प्रवेश देण्याचे आदेश आता केवळ बचत (सेव्हिंग) खातेधारक यांना लागू राहणार असून चालू खाते धारकांना यामधून सूट देण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी आज, ५ मे रोजी जारी केले आहेत.

या आदेशानुसार बचत (सेव्हिंग) खातेधारक ग्राहकांना बँकेमध्ये प्रवेश देताना त्यांच्या बचत खाते क्रमांकाच्या शेवटच्या अंकानुसार दिवस ठरवून देण्यात आले आहेत. खाते क्रमांकाचा शेवटचा अंक ० अथवा १ असल्यास सदर ग्राहकांना बँकेत केवळ सोमवारी प्रवेश मिळेल. त्याचप्रमाणे खाते क्रमांकाचा शेवटचा अंक २ किंवा ३ असल्यास मंगळवारी, ४ किंवा ५ असल्यास बुधवारी, ६ किंवा ७ असल्यास गुरुवारी आणि ८ किंवा ९ असल्यास शुक्रवारी बँकेत प्रवेश दिला जाईल. तसेच प्रत्येक महिन्यातील पहिला, तिसरा व पाचवा शनिवार बँकेच्या अंतर्गत कामकाजाचा दिवस राहील. त्यादिवशी ग्राहकांना त्यांच्या कामासाठी बँकेत प्रवेश असणार नाही, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

दुध संकलन व विक्री वेळेत बदल

३० एप्रिल २०२१ रोजीच्या आदेशानुसार जिल्ह्यात संचारबंदी काळात दुध संकलन व विक्रीकरीता सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत व सायंकाळी ५ ते ७ वाजेपर्यंत वेळ निश्चित करण्यात आली होती. या वेळेमध्ये अंशतः बदल करण्यात आला असून दुध संकलन व विक्रीची वेळ आता सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत आणि सायंकाळी ६ ते रात्री ८ वाजेपर्यंत राहणार आहे.

No comments

Powered by Blogger.