Header Ads

दि.२३ एप्रिल २०२१ - जिल्ह्यात संचारबंदीची कडक अंमलबजावणी करा -जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. Strictly follow the restrictions - Washim DM order

जिल्ह्यात संचारबंदीची कडक अंमलबजावणी करा -जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.

  • तालुकास्तरीय यंत्रणा प्रमुखांची आढावा सभा
  •  प्रमुख चौक, मार्गांवर नागरिकांची कोरोना चाचणी

वाशिम, दि. २३ (जिमाका) : जिल्ह्यात संचारबंदीची नवीन नियमावली २२ एप्रिल रोजीच्या रात्री ८ वाजेपासून लागू करण्यात आली आहे. कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी या नियमावलीची शहरी व ग्रामीण भागात कडक अंमलबजावणी होणे आवश्यक असून सदर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर नियमानुसार कठोर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी दिले. उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी आणि पोलीस निरीक्षक यांच्या दुरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित आढावा सभेत ते बोलत होते.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, उपजिल्हाधिकारी संदीप महाजन, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर हे या बैठकीमध्ये सहभागी झाले होते.

जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. म्हणाले, गर्दी रोखणे हा कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रभावी उपाय आहे. जिल्ह्यातील वाढत्या संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी संचारबंदी नियमांची कडक अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. अत्यावश्यक बाबींची दुकाने सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास मुभा आहे. मात्र, या कालावधीत सुद्धा कोणत्याही ठिकाणी गर्दी होणार नाही, याची दक्षता घ्यावी. सदर दुकाने, आस्थापनांच्या बाहेर यासाठी योग्य व्यवस्था करावी. शहरी व ग्रामीण भागात विशेष पथके तयार करून सकाळी ११ वाजेनंतर सुरु राहणाऱ्या दुकानांवर कारवाई करावी. सकाळी ११ वाजेनंतर कोणीही वैध कारणाशिवाय रस्त्यावर फिरताना दिसल्यास त्यांच्यावर नियमानुसार कठोर कारवाई करावी. तसेच शहरी व ग्रामीण भागामध्ये प्रमुख रस्ते, चौकांमध्ये रॅपिड एँटिजेन टेस्ट सुरु कराव्यात. यामध्ये कोरोना बाधित आढळणाऱ्या व्यक्तींची विलगीकरणात रवानगी करावी.

शहरी व ग्रामीण भागातील फळे, भाजीपाला विक्रीसाठी विकेंद्रित ठिकाणी जागा उपलब्ध करून द्यावी. कोणत्याही परिस्थितीत एकाच ठिकाणी गर्दी होणार नाही, याची दक्षता घ्यावी. ग्रामीण भागात ग्रामस्तरीय समितीच्या माध्यमातून संचारबंदी नियमांची काटेकोर अंमलबजावणी करावी. तसेच प्रतिबंधित क्षेत्रात सुद्धा नियमांचे पालन होईल, याची दक्षता घ्यावी. पुढील १५ दिवस जिल्ह्यासाठी अत्यंत महत्वाचे असून सर्व यंत्रणांनी समन्वयाने व अतिशय सतर्क राहून काम करावे. यामध्ये कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा होणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या. बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांची जिल्ह्याच्या सीमेवरच कोरोना चाचणी करण्यासाठी संबंधित तालुकास्तरीय यंत्रणांनी नियोजन करावे. तसेच कोरोना बाधितांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेणे, कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यास प्राधान्य द्यावे. जिल्ह्यात आज ६ हजार लसींचे वितरण करण्यात आले आहे. तसेच उद्या सकाळी आणखी १० हजार लसी वितरीत केल्या जाणार आहेत. लसीकरणाचे योग्य नियोजन करून ४५ वर्षांवरील जास्तीत जास्त लोकांना लसीकरण करावे, अशा सूचनाही जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी दिल्या.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती पंत म्हणाल्या, ग्रामीण भागातही कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत आहे. या पार्श्वभूमीवर संचारबंदी नियमांची ग्रामीण भागात कडक अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामस्तरीय समितींच्या माध्यमातून विशेष प्रयत्न होणे आवश्यक आहे. तसेच ग्रामीण भागात सुद्धा बाधितांचे नजीकचे संपर्क शोधून त्यांची कोरोना चाचणी करण्यावर विशेष भर द्यावा.

निवासी उपजिल्हाधिकारी श्री. हिंगे यांनी संचारबंदीच्या नवीन नियमावलीविषयी माहिती दिली. तसेच या नियमांच्या अंमलबजावणीसाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना दिल्या.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आहेर यांनी जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या सद्यस्थितीची माहिती देवून कोरोना चाचण्या वाढविणे व लसीकरण मोहिमेला गती देण्याविषयी मार्गदर्शन केले.

No comments

Powered by Blogger.