Header Ads

दि.६ एप्रिल २०२१ - रेमडेसिवीर इंजेक्शनच्या उपलब्धतेसाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाययोजना


रेमडेसिवीर इंजेक्शनच्या उपलब्धतेसाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाययोजना

वाशिम, दि. ०६ (जिमाका) : कोरोना बाधितावरील उपचारासाठी प्रभावी ठरणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा जिल्ह्यात पुरेसा पुरवठा व्हावा, तसेच हे इंजेक्शन गरजू रुग्णांना सहज व योग्य दरात उपलब्ध व्हावे, यासाठी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या सूचनेनुसार जिल्हा प्रशासनामार्फत विविध उपाययोजना करण्यात येत आहे. या अनुषंगाने निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे आणि अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त वि. द. सुलोचने यांच्या उपस्थितीत आज, ६ एप्रिल रोजी आढावा बैठक झाली. यावेळी जिल्ह्यातील रेमडेसिवीर इंजेक्शन विक्रेत्यांनी इंजेक्शनचा साठा व विक्री किंमत याविषयीची माहिती दर्शनी भागात फलकावर लावणे बंधनकारक राहील, असा निर्णय घेण्यात आला.

निवासी उपजिल्हाधिकारी श्री. हिंगे म्हणाले, जिल्ह्यातील कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता. रेमडेसिवीर इंजेक्शनचा वापर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाने ही इंजेक्शन पुरेशा संख्येने व नियमितपणे जिल्ह्यातील औषध विक्रेत्यांकडे उपलब्ध होतील, याची दक्षता घ्यावी. तसेच या इंजेक्शनची विक्री चढ्या दराने होवू नये, यासाठी सर्व संबंधित औषध विक्रेत्यांना आल्या मेडिकलच्या दर्शनी भागामध्ये इंजेक्शनचा उपलब्ध साठा तसेच त्याची किंमत नमूद असलेला फलक लावण्याबाबत सूचित करावे. जिल्ह्यात उपलब्ध रेमडेसिवीर इंजेक्शनच्या साठ्याची माहिती सर्वसामान्य नागरिकांना एकाच ठिकाणी उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. त्याकरिता संबंधित औषध विक्रेत्यांनी आपल्याकडे उपलब्ध रेमडेसिवीर इंजेक्शनची माहिती प्रत्येक दोन तासांनी जिल्हा प्रशासनाला उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना श्री. हिंगे यांनी दिल्या. तसेच रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा व त्याच्या किंमतीबाबत तपासणी करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय स्तरावर समिती स्थापन करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

सहाय्यक आयुक्त श्री. सुलोचने म्हणाले, जिल्ह्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरेसा साठा उपलब्ध असून जिल्ह्यातील विक्रेत्यांच्या मागणीनुसार आणखी इंजेक्शन उपलब्ध करून देण्यासाठी अन्न व औषध प्रशासनामार्फत कार्यवाही सुरु आहे. वाशिम जिल्ह्यातील विक्रेत्यांकडे उपलब्ध असलेल्या इंजेक्शनच्या साठ्याची माहिती जिल्हा प्रशासनाला उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित विक्रेत्यांना सूचित करण्यात येईल. तसेच मेडिकलमध्ये उपलब्ध असलेल्या औषध साठ्याची व विक्री किंमतीची माहिती मेडिकलच्या दर्शनी भागात लावण्याबाबत सर्व संबंधित विक्रेत्यांना तातडीने सूचना देण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.

No comments

Powered by Blogger.