Header Ads

कोरोना संसर्गाबाबतचे गैरसमज दूर होणे आवश्यक - एड.यशोमती ठाकूर : डॉ.साबू कुटुंबियांची भेट घेवून साधला संवाद

Adv Yashomati Thakur

कोरोना संसर्गाबाबतचे गैरसमज दूर होणे आवश्यक - एड. यशोमती ठाकूर

 डॉ. साबू कुटुंबियांची भेट घेवून साधला संवाद

कोरोना संसर्गाबाबत गैरसमज दूर करण्यासाठी पुढाकार

     वाशिम  दि.०९  - कोरोना विषाणू संसर्ग झालेल्या व्यक्तीला लवकरत लवकर बरे होण्यासाठी मानसिक आधाराची गरज असते. तसेच कोरोनावर मात करून परतल्यानंतर सुद्धा समाजाने त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याची आवश्यकता आहे. मात्र, कोरोना संसर्गाबाबत असलेल्या गैरसमजामुळे असे होत नाही. त्यामुळे या आजाराबाबत लोकांच्या मनात असलेले सर्व गैरसमज दूर होणे आवश्यक असल्याचे मत महिला व बाल विकास मंत्री एड. यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केले.
     कोरोनावर यशस्वी मात करून परतलेल्या शहरातील डॉ. शुभांगी साबू यांच्या सदिच्छा भेटी दरम्यात त्या बोलत होत्या. डॉ. शुभांगी साबू यांनी ‘कोरोना’वर यशस्वीपणे मात केली आहे, तरीही काही लोक त्यांच्याविषयी गैरसमज पसरवित असल्याची माहिती मिळाल्यानंतर महिला व बाल विकास मंत्री एड. ठाकूर यांनी स्वतः पुढाकार घेत ८ जुलै रोजी डॉ. साबू कुटुंबियांची घरी जावून सदिच्छा भेट घेवून संवाद साधला व त्यांना धीर दिला. यावेळी आमदार अमित झनक, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. श्याम गाभणे, शिक्षण सभापती चक्रधर गोटे, डॉ. रोशन बंग, डॉ. विवेक साबू, डॉ. सोना नेनवाणी यांची प्रमुख उपस्थिती होती.
एड. श्रीमती ठाकूर म्हणाल्या, लोकांच्या मनामध्ये अनेक गैरसमज आहेत. त्यामुळे कोरोना बाधित रुग्ण अथवा त्यांच्या कुटुंबीयांकडे लोकांचा पाहण्याचा दृष्टीकोन बदलून जातो. कधी कधी तर जवळचे नातेवाईक सुद्धा अशा व्यक्तींना दूर लोटतात. त्यामुळे कोरोना बाधितांना मानसिक त्रास सहन करावा लागतो. योग्य उपचारानंतर कोरोना बाधित व्यक्ती बरी होवून घरी परतली तरी अनेकजण त्यांच्याविषयी गैरसमज पसरवितात, हे पूर्णतः चुकीचे आहे. अशा काळात कुटुंबीय, नातेवाईक यांनी कोरोना बाधितांना मानसिक आधार देवून त्यांना आजारातून बरे होण्यासठी मदत करायला हवी. आपल्याला लढायचे आजारासोबत, आजारी व्यक्तीसोबत नाही, हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. एकदा कोरोना झाला की तो आयुष्यभर राहतो, हा गैरसमज असून तो दूर झाला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
     डॉ. श्रीमती साबू म्हणाल्या, कोरोना विषाणू संसर्गाची भीती असतानाही आम्ही रुग्ण सेवा करीत होतो. मात्र, पूर्णतः काळजी घेवूनही मला संसर्ग झाला. दवाखाना बंद ठेवून आम्ही घरी बसलो असतो, तर कदाचित ही वेळ आली नसती. कोरोना संसर्ग झाल्यानंतर लोकांच्या आमच्या कुटुंबीयांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला, असे त्यांनी सांगितले.

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.