Header Ads

पालकमंत्र्यांच्या हस्ते ‘योजना’ घडीपुस्तिकेचे तथा भित्तीपत्रकांचे प्रकाशन


पालकमंत्र्यांच्या हस्ते ‘योजना’ घडीपुस्तिकेचे तथा भित्तीपत्रकांचे प्रकाशन


शासनाच्या अनेक लोककल्याणकारी योजनांची माहिती  


     वाशिम, दि. २९ (जिमाका) : शासनाच्या विविध योजनांची माहिती जिल्ह्यातील नागरिकांना व्हावी व त्यामाध्यमातून त्यांनी योजनांचा लाभ घ्यावा, यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाने जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेतून तयार केलेल्या ‘योजना’ या घडीपुस्तिकेचे तथा भित्तीपत्रकांचे प्रकाशन पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते आज, २९ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात करण्यात आले.
     यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, आमदार राजेंद्र पाटणी, आमदार अमित झनक, जिल्हाधिकारी हृषीकेश हृषीकेश मोडक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, प्रभारी जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांची प्रमुख उपस्थिती होती.
     ‘योजना’ नावाच्या घडीपुस्तिकेमध्ये माझी कन्या भाग्यश्री, शुभमंगल सामुहिक विवाह योजना, प्रधानमंत्री आवास योजना, मनोधैर्य योजना, प्रधानमंत्री मातृवंदन योजना, जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजना, ग्रामीण व शहरी भागातील युवक मंडळांना आर्थिक सहाय्य योजना, जननी शिशु सुरक्षा योजना, मच्छिमार सहकारी संस्थांना अर्थसहाय्य, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, मागेल त्याला शेततळे, दुधाल जनावरांचे गट आणि कृषि यांत्रिकीकरण उपअभियान आदी योजनांची माहिती देण्यात आली आहे. तसेच योजनेचे स्वरूप, योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रतेचे निकष, आवश्यक कागदपत्रे आणि संबंधित योजनेचा लाभ घेण्यासाठी संपर्क कोणत्या विभागाच्या अधिकाऱ्यांशी करावा, याबाबत माहिती नमूद करण्यात आली आहे.
     घडीपुस्तिकेतील योजनांच्या माहितीच्या आधारे जिल्ह्यातील नागरिकांना विविध योजनांची माहिती मिळण्यास मदत होणार असून त्याआधारे त्यांना योजनांचा लाभ घेणे सोयीचे होणार आहे. अनेकांसाठी ‘योजना’ ही घडीपुस्तिका उपयुक्त ठरणार आहे.

   शासनाच्या अनेक लोककल्याणकारी योजना आहेत.या योजनांची माहिती नागरिकांना तसेच लाभार्थ्यांना झाली तर त्या योजनांचा लाभ घेऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे.अशा काही योजनांची भिंतीपत्रकांच्या माध्यमातून गावोगावी प्रसिद्धी व्हावी यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाने जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजना सन २०१९-२० या वर्षात योजनांवर आधारित सचित्र माहिती असलेले भित्तीपत्रके तयार केली आहे. या भिंतीपत्रकांमध्ये मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, मनोधैर्य योजना, माझी कन्या भाग्यश्री, ग्रामीण व शहरी भागातील युवक मंडळांना आर्थिक सहाय्य, दुधाळ जनावरांचे गट वाटप, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, मच्छिमार सहकारी संस्थांना अर्थसहाय्य आणि मागेल त्याला शेततळे आदी योजनांचा समावेश आहे.

No comments

Powered by Blogger.