Header Ads

वाशिम जिल्ह्यात सहा ‘फिव्हर क्लिनिक’

ताप, सर्दी, खोकल्यावर उपचारासाठी 

वाशिम जिल्ह्यात सहा ‘फिव्हर क्लिनिक’

# २२ एप्रिलपासून नागरिकांच्या सेवेत 

#  प्रत्येक तालुक्यात एक ‘फिव्हर क्लिनिक’

ताप, सर्दी, खोकला असेल तर ‘फिव्हर क्लिनिक’मध्येच या !


जिल्हाधिकारी हृषिकेश मोड़क यांचे जनतेला आवाहन 



     वाशिम, दि. २० (जिमाका) : जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यात सहा स्वतंत्र ‘फिव्हर क्लिनिक’ सुरु करण्यात आली आहेत. ताप, सर्दी आणि खोकल्याचा त्रास असलेल्या रुग्णांची याठिकाणी तपासणी करून त्यांच्यावर उपचार केले जाणार आहेत. त्यामुळे असा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी आपल्या नजीकच्या ‘फिव्हर क्लिनिक’मध्ये जावून तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी केले आहे.

     जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग झालेला एकमेव रुग्ण सापडला असला तरी यापुढेही जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होवू नये, यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत खबरदारीच्या उपाययोजना करण्यात येत आहेत. ताप, सर्दी व खोकला हे तसे नेहमीचे आजार आहेत, मात्र, कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या व्यक्तींमध्ये सुद्धा अशी लक्षणे दिसतात. त्यामुळे अशी लक्षणे दिसणाऱ्या व्यक्तींची तपासणी व उपचार करण्यासाठी जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात एक याप्रमाणे सहा  ‘फिव्हर क्लिनिक’ सुरु करण्यात आली आहेत. याठिकाणी नियुक्त करण्यात आलेल्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक प्रशिक्षण व साहित्य, औषधे उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

     ताप, सर्दी व खोकला आदी लक्षणे दिसणाऱ्या व्यक्तींची तपासणी, उपचार करण्यासोबतच त्यांच्या प्रवासाची नोंद सुद्धा ‘फिव्हर क्लिनिक’मध्ये घेतली जाणार आहे. २२ एप्रिलपासून रोज सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत ही ‘फिव्हर क्लिनिक’ सुरु राहतील, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास सोनटक्के व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांनी दिली आहे.
येथे आहेत ‘फिव्हर क्लिनिक’
१)     वाशिम तालुका- अनुसूचित जाती मुलींची निवासी शाळा, हिंगोली रोड, सुरकंडी
२)     रिसोड तालुका- अनुसूचित जाती मुलांची निवासी शाळा, सवड
३)     मालेगाव तालुका- नवीन तहसील कार्यालय, मुख्य इमारत, मालेगाव
४)   मंगरूळपीर तालुका- अल्पसंख्याक वसतिगृह, मंगरूळपीर
५)    कारंजा तालुका- एम.बी. आश्रम, मुर्तीजापूर रोड, झाशी राणी चौक जवळ, चंदनवाडी
६)     मानोरा तालुका- औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), मानोरा

ताप, सर्दी, खोकला असेल तर ‘फिव्हर क्लिनिक’मध्येच या !
     कोरोना विषाणू संसर्ग झाल्यानंतर होणाऱ्या कोविड-१९ आजाराच्या लक्षणांमध्ये सुद्धा ताप, सर्दी व खोकला या लक्षणांचा समावेश आहे. त्यामुळे असा त्रास असलेल्या रुग्णांची स्वतंत्र तपासणी करून त्यांच्यावर योग्य उपचार करणे, कोरोना विषाणू संसर्ग झालेल्या रुग्णांचा शोध घेण्यासाठी प्रत्येक तालुक्यात एक ‘फिव्हर क्लिनिक’ सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ज्या नागरिकांना ताप, सर्दी व खोकला असा त्रास आहे, त्यांनी उपचारासाठी इतर कुठेही न जाता आपल्या नजीकच्या ‘फिव्हर क्लिनिक’मध्येच येवून तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी केले आहे.

No comments

Powered by Blogger.