Header Ads

शासनाचे निर्देशानंतरच कापूस खरेदी सुरु होणार


शासनाचे निर्देशानंतरच कापूस खरेदी सुरु होणार 

महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ चे स्पष्टीकरण 

कारंजा (जनता परिषद) दि.१२ - राज्यात कापूस खरेदी करणारी महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ हे सोमवार पासून कापूस खरेदी करणार असल्याची बातमी WhatsApp द्वारे पसरविली जात आहे. ती धादांत खोटी आहे, असे एका पत्रकाद्वारे महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघचे अध्यक्ष अनंत रा. देशमुख व विष्णूपंत सु.सोळंके यांनीे कळविले असल्याचे कारंजा बाजार समितीचे सचीव निलेश भाकरे यांनी सांगितले आहे. 
सध्या सर्वत्र कोरोना आजाराचे थैमान माजले आहे. कापूस खरेदी करणे, त्यावर प्रक्रिया करणे तसेच सरकी व गाठीची डिलेव्हरी करणे यासाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ लागते. हे कार्य करतांना शासनाने घालून दिलेल्या प्रतिबंधात्मक उपाय योजनांचे पालन करणे कठीण आहे. त्यामुळे अद्याप पावेतो कापूस खरेदी सुरु करण्याबाबतचे अधिकृत धोरण जाहिर करण्यात आलेले नाही. शासनाद्वारे याबाबत जोपर्यंत आदेश प्राप्त होत नाही, तो पर्यंत खरेदी सुरु करण्यात येणार नसल्याचे या पत्रकाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे. 
२३ मार्च २०२० पर्यंत ५४.०६ लाख क्विंटल कापसाची खरेदी महासंघाने केली आहे. याच कापसावर प्रक्रियेचे कामकाज सुरु आहे. आजमितीला सर्वच जिनिंग प्रेसिंग फॅक्टरी मधील मजूरवर्ग कोरोना ह्या रोगाचे भितीने स्वगावी गेले आहेत. मजूर अभावी प्रक्रिया कामात मोठ्या प्रमाणात व्यत्यय येतो आहे. नव्याने कापूस खरेदी करतेवेळी मनुष्यबळ प्राप्त होणे गरजेेच आहे. तसेच खरेदी केेलेल्या कापसावर तातडीने प्रक्रिया न केल्यास मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होण्याची संभावना आहे. तसेच कापूस खरेदी करतांना शेतकरी, सर्वच कर्मचारी, मजूर वर्ग यांना कोरोनाची बाधा होवू नये, याबाबी लक्षात घेता शासनाचे तत्‌संबंधी आदेश आल्यावर कापूस खरेदी पुन्हा कार्यरत करण्यात येईल, असे कापूस पणन महासंघाने कळविले असल्याची माहिती कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचीव निलेश भाकरे यांनी दिली आहे. 

No comments

Powered by Blogger.